Tuesday, May 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदिलखुलास दिवाळीला बाजाराची साथ!

दिलखुलास दिवाळीला बाजाराची साथ!

वैष्णवी कुलकर्णी

वसुबारसपासून भाऊबिजेपर्यंत आपण वेगवेगळ्या देवतांच्या पूजा करत असलो तरी खरी तयारी ‘स्व’पासून सुरू होते. घरादाराची स्वच्छता झाल्यानंतर सौंदर्योपचार, केसापासून पायापर्यंतचे अवयव सुशोभीत करणारी प्रावरणं आणि दागिने, जगणं सुसह्य आणि अधिक रंजक, वेधक करणारी विविध उपकरणं, गॅझेट्स अशी एक ना अनेक प्रकारची खरेदी स्वांतसुखासाठीच केली जाते. आताही अशाच खरेदीत्सुकांनी बाजार गजबजला आहे.

दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी… म्हणत आनंदवर्षावात भिजण्याची तब्बल दोन-अडीच वर्षांनंतर आलेली सुवर्णसंधी तना-मनाबरोबरच बाजारातही चैतन्य निर्माण करत आहे. गेली दोन वर्षं दारासमोर पणत्या तेवल्या. पण त्यात तेज नव्हतं, अंगणात आकाशकंदील लागले पण त्यातून पाझरणाऱ्या शलाका अंमळ क्लांत होत्या. प्रत्येक घरात नवे कपडे, गोडाधोडाचे जिन्नस आलेच असं नाही. मात्र तम दूर झाला आणि प्रकाशाचा मार्ग प्रशस्त झाला. या प्रसन्न मार्गावरून दमदार पावलं सदिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण आहेच, पण तो केवळ सण नसून आप्तस्वकियांबरोबरच स्वत:वरही प्रेम करण्याची पर्वणी आहे.

वर्षभर आपल्या उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक सजीव-निर्जीव घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक दिवस आपण साजरे करतो. आपलं जगणं सुखकर करणाऱ्या घटकांना मान-सन्मान प्रदान करतो. पण दिवाळी हा आपल्या ‘जगण्याचा उत्सव’ असतो. वर्षभर काम केल्यानंतर संचिताचा विनियोग प्रामुख्यानं याच उत्सवपर्वात होतो. घरातल्या स्वकियांप्रमाणेच स्वत:चेही लाड पुरवून घेणं प्रत्येकाला आवडतं. थोड्या दबक्या आवाजात आजी-आजोबाही साडीचोळी आणि शर्ट-पँट अथवा धोतरासारख्या काही छोट्या-मोठ्या मागण्यांचा उल्लेख करून जातात आणि त्या पुरवल्यानंतर त्यांच्या मुखावरही बालसुलभ हसू विलसतं. हे सगळं अंतरात्म्याचं सुखावणंच नसतं का? ते लोभस हसू आत्मप्रेमापोटीच उमललेलं नसतं का?

आपण काकड आरतीने देवाला उठवतो, मुख प्रक्षाणन करवून अभिषेक घालतो. षोडशोपचारे पूजा करतो. रुचकर पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतो आणि स्तवनं-स्तोत्र म्हणून त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. देवी-देवतांची ही दिवाळी रोज साजरी होत असते. मग फुलबाज्यांची वर्तुळं नाचवत अभ्यंगस्नानावेळी होणारं औक्षण त्याच्याशी साधर्म्य राखणारंच तर नाही का? ही आपल्या हृदयात दडलेल्या देवाची आरतीच तर असते! मखमलीचे मऊ मऊ नवीन कपडे हे देवानं दिलेल्या या सुंदर देहाची वेशभूषा असते, दागिने घालून सजणं-धजणं हा देहाचा शृंगार असतो तर पंचपक्वान्नाचं जेवणं हे जठराग्नीत पडणाऱ्या मंगल आहुतीसमान असतं. जीवनसरितेला वाहिलेलं ते मंगलमय अर्घ्य असतं. रम्य रांगोळ्यांनी सजलेल्या पंगतीमध्ये मिठास पक्वान्नांचा घास घेताना केवळ जीभ नव्हे तर आत्मा सुखावतो. म्हणूनच तो अंतरात्म्याचा नैवेद्य असतो. असंही रोज आपण जेवतोच, पण त्यात आणि दिवाळीतल्या पंक्तीत कमालीचा फरक असतो. पहाटेचं अभ्यंगस्नान, देवदर्शन, न्याहरी, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, वामकुक्षी, तिन्हीसांजेची पूजा आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर गप्पा मारत वा एखादी सुरेल मैफल अनुभवत येणारी शांत झोप ही शरीर-मन-श्रुती-दृष्टी, वाचा, स्पर्श, संवेदना आदींची दिवाळीच तर असते. म्हणूनच दिवाळी ही फक्त देवाची नव्हे, तर देहाची पूजाही ठरते. शरीरातल्या पंचमहाभुतांना तो प्रणाम ठरतो!

त्यामुळेच की काय, वसुबारसपासून भाऊबिजेपर्यंत आपण वेगवेगळ्या देवतांच्या पूजा करत असलो तरी खरी तयारी ‘स्व’पासून सुरू होते. घरादाराची स्वच्छता झाल्यानंतर फेशियल आदी सौंदर्योपचार, दागिने, जगणं सुसह्य आणि अधिक रंजक, वेधक करणारी विविध उपकरणं, अद्ययावत गॅझेट्स, गाड्या अशी एक ना अनेक प्रकारची खरेदी स्वांतसुखासाठीच केली जाते. आताही अशाच खरेदीत्सुकांनी बाजार गजबजला आहे. अलीकडेच देशात

‘५ जी’चं आगमन झाल्यामुळे तर तरुणाई उत्साहाने सळसळते आहे. कमालीचा वेग, विविधता आणि नावीन्य घेऊन आलेलं हे तंत्रज्ञान त्यांच्या कार्यालयीन आणि सुखासीन जगण्याच्या कक्षा रुंदावणार आहे. त्यामुळे या तंत्राने युक्त मोबाइल, संगणक, स्मार्टवॉच, टॅब यांसारख्या अनेक उपकरणांच्या खरेदीकडे त्यांची पावलं वळत आहेत. प्रत्येकाची ऑफलाइन किंवा ऑनलाइन दिवाळी शॉपिंग लिस्ट भरगच्च आहे. आता दिवाळीत लागणारं पूजासाहित्यही ऑनलाइन मिळत आहे. दिवाळीचे प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे विधी आहेत. त्याप्रमाणे आवश्यक त्या गोष्टी लिहून ठेवायच्या आणि दीपावली खरेदी सूचीमध्ये नोंदवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यामुळे कोणतीही महत्त्वाची गोष्ट चुकणार नसल्याची खात्री मिळते. पूजेच्या एक दिवस आधी किंवा पूजेच्या दिवशी फुले आणि मिठाईदेखील ऑनलाइन पद्धतीने मागवली जात आहे.

दिवाळीत प्रत्येक घरात रांगोळी काढणं आवश्यक आहे. रंग किंवा फुलांनी रांगोळी काढण्याची आवड असल्यास किंवा स्टीकर्स चिकटवून सजवायची असल्यास विविध पर्याय उपलब्ध आहेत. रांगोळी ही दिवाळीच्या सजावटीमधून कधीच बाहेर पडत नाही. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत काही सुंदर आणि रंगीबेरंगी रांगोळी काढण्याचा विचार करत असाल, तर काही वस्तू खरेदी करणं आवश्यक आहे. आवडीचे रंग मिळवण्यासाठी दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीचा पर्यायही उपलब्ध आहे. रंग वापरण्याच्या मूडमध्ये नसल्यास फुलं, खडू पावडर, रंगीत पास्ता किंवा एप्सम मीठ वापरता येईल. फक्त गरजेनुसार योग्य रांगोळी निवडून सजावट वाढवण्यासाठी एक सुंदर रांगोळी रेखाटायची. यंदाच्या दिवाळीत लाइट्स खरेदी करायचे असल्यास दिवे, तोरणातले असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. शॉपिंग चेकलिस्टमध्ये पडदे असतील तर त्यातही असंख्य प्रकार ऑनलाइन आणि ऑफलाइन सजावटीमध्ये चांगले मिसळणारे पडदे निवडता येतील. निवड करताना एकूण लुकला शोभणारे रंग खरेदी करावेत. ते मोहक आणि डोळ्यांना आनंद देणारे असल्याचं ध्येय ठेवावं. टेबलमॅट्स, सोफा कव्हर्स आणि रग्जदेखील यादीत समाविष्ट करता येतील.

पोशाखाशिवाय दिवाळीची खरेदी अपूर्ण आहे. नवीन पोशाख खरेदी करणं ही जुनी परंपरा आहे. आवडता लेहेंगा, सलवार सूट, साडी किंवा घागरा निवडत वेस्टर्न लूककडे जाण्याचा पर्यायही दिवाळीत उपलब्ध आहे. पण इव्हेंटसाठी पारंपरिक कपडे सर्वोत्तम ठरतात, हे कायमस्वरूपी वास्तव! खेरीज सध्या बुटीकची चलती आहे. काही छोटे उद्योजक देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकप्रिय प्रिंट आणि कापड आणून वैशिष्ट्यपूर्ण कलेक्शन बुटीकमध्ये सादर करतात. ‘मिक्स अॅण्ड मॅच’चीही सोय तिथे असते. बऱ्याच ठिकाणी पेहराव कस्टमाईज करून मिळतात. आपल्याला हवी तशी किनार, हवा त्या रंगाचा मुख्य भाग, हवा त्या फॅशनचा ब्लॉऊज असा एकत्रित संचही मिळतो. तिथेच त्या पेहरावाला साजेसं फुटवेअर, ज्वेलरी, पर्स अथवा बटवाही मिळू शकतो.

असं ‘वन स्टाप शॉप’ही अनेकींच्या पसंतीस उतरत आहे. सध्या रेडिमेड ब्लाऊजची बाजारपेठ बहरली आहे. हे स्टायलिश ब्लाऊज आधीच्या साड्यांवरही मिस्क अॅण्ड मॅच पद्धतीनं वापरता येतात. तेव्हा साडीखरेदी टाळायची असेल, तर असं रेडिमेड ब्लाऊजच्या खरेदीनं नव्या साडीला नवी झळाळी देता येईल.

दिवाळी आणि दागिने हे तर खूप जुनं नातं. सोनं हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. यामुळेच या शुभ मुहूर्तावर लोक सोन्याचे दागिने खरेदी करतात. हा विचार करणाऱ्यांनी जड नेकलेस विकत घेण्याची गरज नाही. त्यासाठी किंमत मोजण्याची तयारी नसेल, तर लाईटवेट ज्वेलरीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चांदी, सोने, प्लॅटिनममधल्या दागिन्यांमध्येही प्रचंड वैविध्य आहे. घरगुती उपकरणं खरेदी करण्यासाठी दिवाळी हा उत्तम मुहूर्त. तेव्हा जुनी स्टीलची भांडी, स्टोरेज कंटेनर टाकून देऊन नवीन घेता येतील. बाजारात सहज विकल्या जाणाऱ्या ऊर्जाबचत उपकरणांसह स्वयंपाकघराला चांगला बदल देता येईल. जवळपासच्या बाजारपेठांमधून किंवा ऑनलाइन स्टोअरमधून ते वाजवी किमतीत सहज मिळवता येईल. याचबरोबर सजावटीच्या असंख्य वस्तूंनी घर सजवता येईल.

दिवाळी ही वाचनप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते. या काळात ग्रंथालयांमध्ये गर्दी करणाऱ्यांची संख्या वाढते. स्टॉलवर वेगवेगळे दर्जेदार दिवाळी अंक दाखल होतात. प्रकाशनं नवनवी पुस्तकं सादर करतात. तेव्हा दिवाळीत यालाही चांगली मागणी बघायला मिळते. विशेषत: देशाने स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पूर्ण केल्यानंतर, कोरोनाचा काळ संपल्यानंतर, जग एका वेगळ्या वळणावरून प्रवास करत असताना त्याचं प्रतिबिंब असणारं समृद्ध लेखन यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये वाचायला मिळणार हे नक्की. चला तर मग, या सगळ्यांचा आनंद लुटू या. उत्सवपर्वाला आनंदानं सामोरं जाऊ या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -