Saturday, May 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून...

Devendra Fadnavis : जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली

वर्ध्यातून पंजा गायब करणा-या शरद पवारांचे आभार – फडणवीस

वर्धा : ‘काल पवार साहेब (Sharad Pawar) या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या. नगरपालिका जिंकलो, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्ध्यातून पंजा गायब करून दाखवला. जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं,’ अशा खोचक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांवर टीका केली.

वर्ध्यात आज महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली.

ते पुढे म्हणाले की, ज्या महात्मा गांधींचे नाव सांगून काँग्रेसने इतकी वर्ष राजकारण केले. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचे काम शरद पवार साहेबांनी करून दाखवले. म्हणून आपण सगळे त्यांचे मनापासून आभार मानू.

आता काय दिवस आले पहा, काँग्रेस तर हद्दपार झालीच, आता त्यांना उमेदवार सुद्धा सापडत नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे गांधींजींचं वर्धा ना काँग्रेसचं ना शरद पवारांचं ते मोदींजींचं आणि भाजपाचं यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, महायुतीने वर्धा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रामदास तडस यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

रामदास तडस कायम सामान्य माणसांत फिरत राहिले. हा असा एक खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता. त्यामुळे जनतेचे प्रेम त्यांना मिळाले. तसेही रामदास तडस पहिलवान आहेत. त्यात राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी कुणाचं पॅनेल हरवलं माहिती आहे का. इतकी वर्ष ज्यांच्याकडे राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचं नेतृ्त्व होतं त्या शरद पवारांचं पॅनल. आमच्या पहिलवानानं असा डाव टाकला की त्यांच्या हातातून कुस्तीगीर परिषद निसटली आणि तडस साहेबांच्या हातात आली. सर्व डावपेच त्यांना माहिती आहेत. चेहरा भोळा आहे पण त्यावर जाऊ नका. वेळप्रसंगी असा धोबीपछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचे कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -