Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडी'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

मुंबई : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबला आहे. बिपरजॉय (Biporjoy) चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD)धोक्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, देशात या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आले असून ते वेगाने उत्तरेकडे सरकताना दिसत आहे.

हे चक्रीवादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, पालघर या भागात २४ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील खोल दाब क्षेत्र ४ किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले असून ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तीव्र झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ बुधवारी गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे ९२० किमीवर तर मुंबईच्या १०५० किमी नैऋत्य, पोरबंदरपासून ११३० किमी दक्षिण-नैऋत्येस होते.

पूर्वमध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळ गेल्या ६ तासांमध्ये ६ किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकते आहे. या चक्रीवादळामुळे केरळ-कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप-मालदीव आणि कोकण, गोवा किनारपट्टीवर ८ ते १० जूनपर्यंत समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्रात उतरलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यांमुळे केरळ किनारपट्टीच्या दिशेने सरकणारा मान्सून लांबला आहे. आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने याचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. मात्र, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख हवामान विभागाने दिलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -