Sunday, May 19, 2024
Homeदेशकाँग्रेसच्या पापाचा घडा भरला!

काँग्रेसच्या पापाचा घडा भरला!

मला ९१ वेळा शिव्या दिल्या, त्यांनी आंबेडकर-सावरकरांनाही सोडले नाही; मोदींचा हल्लाबोल

बिदर : काँग्रेसच्या पापाचा घडा भरला आहे. काँग्रेसने मला ९१ वेळा शिवीगाळ केली, पण प्रत्येक वेळी जनतेने त्यांना नाकारले. सामान्य माणसाबद्दल बोलणाऱ्या, भ्रष्टाचार उघड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करते. मोठमोठे महापुरुषही त्यांच्या तिरस्काराचे बळी ठरले आहेत. त्यांच्या (काँग्रेस) शिव्या खाणारा मी एकटाच नाही. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांसारख्या महापुरुषांना शिव्या दिल्या. तेच लोक मोदींनाही शिव्या देत आहेत पण मला फरक पडत नाही, मी जनतेची सेवा करणार आणि भ्रष्टाचा-यांचे पितळ उघड करणार, असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर साधला.

पंतप्रधान मोदी यांनी आज बिदर, हुमनाबाद (कर्नाटक) येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत मी बिदरमधून प्रचाराला सुरुवात करत आहे, हे माझे भाग्य आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने येथे येऊन तुम्ही संपूर्ण देशाला संदेश दिला आहे की, यावेळीही भाजपचेच सरकार येणार आहे. ही निवडणूक कर्नाटकला देशातील नंबर-१ राज्य बनवण्याची निवडणूक आहे. काँग्रेसने मला कितीही शिव्या दिल्या, तरी मी जनतेसाठी काम करत राहीन. मला कर्नाटकसाठी आणखी सेवा करायची आहे. कर्नाटकच्या विकासासाठी पूर्ण बहुमत असलेले कायमस्वरूपी सरकार हवे आहे, असेही मोदी म्हणाले.

कर्नाटकात गेल्या पाच वर्षात सामान्य माणसाने किती विकास केला, हे आपण पाहिले आहे. तुमची ही स्वप्नं पूर्ण करण्याचे काम भाजपने हाती घेतले आहे. कर्नाटकला देशातील नंबर १ राज्य बनवायचे असेल, तर येथे डबल इंजिनचे सरकार असणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आम्ही पीएम किसान सन्मान निधीची सुरुवात केली, तेव्हा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार होते. त्यांनी लाभार्थी शेतकर्‍यांची यादी केंद्र सरकारला पाठवली नाही. इतका शेतकऱ्यांचा द्वेष कशासाठी? छत्तीसगड आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असाही मोदींनी हल्लाबोल केला.

कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागांच्या निवडणुकीसाठी १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसने ८० आणि जेडीएसने ३७ जागा जिंकल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -