Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीमहायुतीत काही जागांबाबत पेच कायम?

महायुतीत काही जागांबाबत पेच कायम?

संकटमोचक महाजन आणि अजितदादांमध्ये पुण्यात तासभर चर्चा

पुणे : पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली तरी सत्ताधारी महायुतीमधील काही मतदार संघातील उमेदवरांचा पेच सुटलेले नाही. नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी कल्याण व मुंबईतील काही मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर होऊ शकलेले नाहीत. तसेच, काही मतदारसंघात महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी आहेत. काही मतदारसंघावर तीनही पक्षांनी दावा केला असल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे अडलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. या वेळी धाराशिवचे राणा जगजितसिंह पाटील हेही उपस्थित होते.

विरोधकांच्या महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण होऊन आघाडीचे नेते व उमेदवार प्रचाराला लागले आहेत. सांगली आणि मुंबईतील काही मतदारसंघावरून महाआघाडीत कुरबुरी आहेत. मात्र, इतर मतदारसंघात आघाडीचा प्रचार सुरू झाला आहे. इकडे सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये काही मतदार संघाच्या जागावाटपावरून मतैक्य होऊ शकलेले नाही. नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, कल्याण व मुंबई आदींचा त्यात समावेश आहे.

उमेदवार जाहीर झालेल्या काही मतदारसंघात कुरबुरी आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या उमेदवाराला मदत करीत नसल्याची तक्रार खुद्द उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह आमदार जयकुमार गोरे आणि राहुल कुल यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली हेाती.

माढ्यात रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपला मदत करणार नसतील तर आम्हीही बारामतीत सुनेत्रा पवार यांना मदत करणार नाही, अशी भूमिका दौंडचे आमदार राहुल कुल यांनी घेतल्याची चर्चा आहे. मात्र, फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निंबाळकर यांनी काही प्रश्न चर्चेतून मार्गी लागतील, अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत माढ्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, ज्या जागांसाठी अद्याप उमेदवार ठरले नाही, अशा मतदार संघाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली. चर्चेवेळी तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे उपस्थित होते, त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदासंघाबाबतही काही अडचण आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या भेटीबाबत महाजन म्हणाले, मी पुण्यात रात्री दादा पुण्यात आहेत, असे समजल्यावर त्यांना भेटायला आलो होतो. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीमधील जागा वाटप जाहीर होईल. नाशिकच्या जागेबाबत आता सांगणं कठीण आहे. पण, येत्या दोन दिवसांत महायुतीचे जागा वाटप जाहीर होईल. बारामतीच्या जागा सुनेत्रा पवार ह्याच जिंकणार आहेत, यात आमच्या मनात शंका नाही, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -