चेंबूर एज्युकेशन सोसायटी

Share

शिबानी जोशी

साधारणपणे ७०-८० वर्षांपूर्वीची मुंबई ही आजच्या मुंबई इतकी पसरली नव्हती. मुंबईमध्ये कुलाब्यापासून माहीम आणि सायनपर्यंत भाग धरला जात असे. त्यानंतर उपनगरे वाढू लागली. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई बेटावर उत्तर पूर्वेकडे चेंबूर, मानखुर्द, माहुल यांसारख्या गावांचा समावेश असलेला एक परिसर होता. हा परिसर म्हणजे खरं तर गावंच होती. छोट्या छोट्या वाड्यांतून वसलेल्या चेंबूरची त्यावेळची लोकसंख्या ४०००० होती. दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, माध्यमिक शिक्षणाची जवळपास सोयच नाही. त्यामुळे चेंबूरवासीयांना पुढील शिक्षणासाठी सायन, कुर्ला, दादरपर्यंत जावे लागत असे. प्रसंगी शिक्षणासाठी पायपीट करावी लागायची. चेंबूर भागातील संघ, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनात ही अडचण दूर करावी, असा विचार आला आणि हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून विचारपूर्वक तो प्रत्यक्षात आणणारे तिथले कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यातूनच सांडू कंपनीच्या आवारात प्रथम काही वर्ग सुरू करण्यात आले. असं म्हटलं जातं की, सांडू कंपनीच्या आवारातील गोठ्यामध्ये प्रथम हे वर्ग सुरू झाले; त्यानंतर हळूहळू राजकीय, सामाजिक कार्यातील मतभेद बाजूला ठेवून आलेले अनेक कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी आणि शिक्षक यांच्या श्रमदानातून आणि देणग्यांमधून नंतर शाळा उभी राहिली.

सांडू कंपनीच्या आवारातील विद्यार्थी संख्या वाढू लागल्यावर जागा कमी पडू लागली आणि त्यामुळे संस्थेच्या मालकीची जागा असणे आवश्यक वाटू लागल. शासनाकडे शाळेच्या जागेसाठी मागणी करण्यात आली आणि पाच वर्षं पाठपुरावा केल्यानंतर जागा मिळाली. चेंबूरमधील दानशूर व्यक्ती, छोटे-मोठे उद्योजक, कारखानदार यांच्या मदतीतून चेंबूर एज्युकेशन सोसायटीची स्वतंत्र इमारत उभी राहिली. अगदी शिक्षक, विद्यार्थी यांच्या श्रमदानाने विद्यार्थ्यांसाठी एका मैदानात स्टेडियमसुद्धा तयार करण्यात आले. या संस्थेने अगदी अल्पावधीतच शिशुवर्ग, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, रात्र शाळा, मराठी व इंग्रजी माध्यमातून बीएड, डीएड कॉलेज, पूर्व प्राथमिक शाळा तसेच विविध तांत्रिक अभ्यासक्रमांचे शिक्षण अशा सोयी उपलब्ध करून दिल्या. डीएड, बीएड कॉलेज साधारण वीस वर्षांपूर्वी सुरू झालं आणि आज ते या क्षेत्रातलं नावाजलेलं कॉलेज गणलं जातं. आज चेंबूर एज्युकेशन सोसायटी चेंबूर परिसरातील एक अग्रेसर संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. अर्थात, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास १६ वर्षांचा कालावधी लागला.

शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मुंबईत फारच दुर्मीळ असणारी ही गोष्ट म्हणजे शाळेला मोठं पटांगण लाभल्यामुळे शाळेतून अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत, ज्यांना शिवछत्रपती तसेच अनेक राज्य पुरस्कारही मिळाले आहेत. क्रीडा क्षेत्राकडे शाळा विशेष लक्ष पुरवत असते. महेंद्र चेंबूरकर, मनोज मोरे असे अनेक नामवंत खेळाडू शाळेतून घडले आहेत. भविष्यामध्ये शाळेला मिळालेल्या भव्य पटांगणाचा तरुण पिढीला उपयोग व्हावा, यासाठी स्पोर्ट्स अॅकॅडमी सुरू करण्याचा संस्थेचा मानस होता. मराठी शाळेतल्या होतकरू मुलांना अगदी अल्पदरात क्रीडा प्रशिक्षण मिळावं, हाच हेतू यामागे संस्थेचा आहे. चेंबूर परिसरातील कोणीही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूनेच विचारपूर्वक एक-एक उपक्रम प्रत्यक्षात आणणारे कार्यकर्ते संस्थेला मिळाले म्हणूनच संस्था अल्पावधीत इतके सारे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करू शकली. आजही शाळेत मराठी माध्यमातूनच शिक्षण दिलं जातं आणि शिक्षक, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थी संख्येत आजही घट झालेली नाही, ही खरोखरच मराठी लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

संस्था स्थापनेपासून कार्यरत असलेले, स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले वि. ना. पुरव, नारायणराव आचार्य, केशव मोकल, रामजी भाई पेथळ, शांताबाई आंब्रे, भाऊराव चेंबूरकर, बाबासाहेब सांडू, केशवराव करंबेळकर, रामनाथ पाठारे, भिकमचंद जैन ही मंडळी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नारळकर, खानोलकर, वसंतराव प्रधान, भाऊ रानवडे, न. का. जोशी, आचरेकर, फाटक, पंत यांच्यामुळे ही संस्था सुरू होऊन नंतर नावारूपालाही आली. आज शाळेत जवळपास तेराशे विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

क्रीडा प्रकाराव्यतिरिक्त इतरही विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवलं जातं आणि अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये पारितोषिक मिळवतात. कोटक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे शाळेमध्ये मुलांचे स्पोकन इंग्लिशचे वर्ग चालतात. ग्लोबल स्कॉलर नावाची एक आंतरराष्ट्रीय स्कीम विद्यार्थ्यांसाठी चालते. त्यात दहा देशांचे विद्यार्थी सहभागी आहेत. त्यामध्ये भारत देशातील मुंबईमधून या शाळेची निवड झाली असून इथले विद्यार्थी इतर देशातील विद्यार्थ्यांशी इंग्रजीमधून संवाद साधतात. भारतीय संस्कृती, खाद्यसंस्कृती याविषयीची देवाण-घेवाण या उपक्रमात होत असते. उमंग या उपक्रमाअंतर्गत स्पोकन इंग्लिशचे वर्ग घेतले जातात तसेच विविध स्पर्धा, परीक्षांत ही मुलं उतरतात.
चेंबूर हायस्कूलची यशोगाथा सतत उंचावली आहे. शाळेला संस्कृती संवर्धनचा ‘विशेष उल्लेखनीय शाळा’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षण विभागाचा उपक्रमशील शाळा पुरस्कार, विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरीय सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक शरद वाबळे यांना, राज्यस्तरीय नवोपक्रमशील पुरस्कार अनिता लुगडे यांना, जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट शैक्षणिक साधन पारितोषिक किसन मोरे यांना, पॉवर लिफ्टिंग क्षेत्रात मानाचा शिवछत्रपती पुरस्कार शाळेचा माजी विद्यार्थी मनोज मनोहर मोरे यांना, मल्लखांब व जिम्नॅस्टिकमधील भरीव कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार माजी विद्यार्थी सुनील गंगावणे यांना, तर संस्कार भारतीचे ‘उत्कृष्ट वक्ता’ म्हणून सलग ३ वर्षे प्रथम क्रमांक पटकवणारी विद्यार्थिनी आसावरी लुगडे हिला मिळालं आहे. आयडियल जल्लोष, पोवाडा सादरीकरण, लेझीम स्पर्धेत पारितोषिके मिळाली आहेत.

संस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मुंबईमध्येच मराठी शाळांची पटसंख्या कमी होत असताना चेंबूरच्या या शाळेत मात्र दरवर्षी पटसंख्या कायम राहिली आहे. शाळेत होत असलेले अभिनव उपक्रम तसेच शिक्षणाचा दर्जा पाहून चेंबूर भागातील मराठी लोक आजही आपल्या मुलांना या मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा प्राधान्य देत असतात. ‘उद्धरेदात्मनात्मानं’ हे भगवद्गीतेतील वचन आपले ब्रीदवाक्य असलेले चेंबूर हायस्कूल ६८ वर्षं पूर्ण करीत आहे. ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे या शाळेचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत आहे.
joshishibani@yahoo.com

Recent Posts

मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी…तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद….

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…

19 seconds ago

राम मंदिरात जाण्यावरुन पक्षाचा विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा…

श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत…

30 mins ago

ICC Women’s T20 World Cup महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असणार भारताचे सामने

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप…

35 mins ago

खोके, पेट्यांवर जगणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करू नये, नारायण राणेंचा उबाठावर हल्लाबोल…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझा कार्यक्षेत्र मुंबई होते. बाळासाहेबांनी मला…

50 mins ago

PBKS vs CSK : पंजाबचा विजयी सिक्सर हुकला, चेन्नईने २८ धावांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: पंजाब किंग्स(punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) यांच्यात आयपीएल २०२४चा(ipl 2024) ५३वा…

2 hours ago

Jason Holton : ब्रिटनमधील सर्वात वजनदार व्यक्तीचा वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू!

तब्बल ३१८ किलो वजन; अतिरिक्त चरबीमुळे अवयव झाले निकामी लंडन : ब्रिटनमधील सर्वात वजनदार माणूस…

4 hours ago