शिक्षण व्यवस्था फिनलँडच्या दिशेने नेता येईल का?

Share

अॅड. विलास पाटणे

जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड, उत्तर युरोपामध्ये आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. रत्नागिरी तालुक्याची लोकसंख्या ५६ लाख आहे व असे भारतात ५६५० तालुके आहेत. थोडक्यात फिनलँड किती चिमुकला देश आहे, याची कल्पना येते. इथली शिक्षण व्यवस्था जगातली सर्वात चांगली मानली जाते. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनाही त्याने मागे टाकले आहे. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अानुषंगानं परीक्षण करते, तर त्या संस्थेच्या निकषांत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात. फिनलँडमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आणि अनिवार्यसुद्धा आहे. त्यासाठी त्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये तिथले सरकार चालवते आणि सर्व खर्च सरकार उचलते. या देशात एकही शाळा खासगी नाही.
या शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना उच्च दर्जाचं दुपारचं जेवणही मोफत दिलं जातं. विद्यार्थ्यांना गणवेष नसतो. इथलं कोणतंही मूल सात वर्षांचं होईपर्यंत शाळेत जात नाही. सात वर्षांपर्यंत मुलांनी आपलं बालपण जगून घेतलं पाहिजे, असं तिथं मानलं जातं. सात वर्षांच्या आतील मुलांना खेळणं, मोकळेपणानं जगणं, इतरांशी मैत्री करणं, दुसऱ्या मुलांना समजून घेणं, परस्पर सहकार्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल हे पाहणं, अशा गोष्टी त्यांच्या शाळेत जाण्याची पूर्वतयारी म्हणून शिकवल्या जातात. त्यानंतर सात ते सोळा या वयोगटासाठी तिथं शिक्षण अनिवार्य आहे. प्रवेशपरीक्षा नसतात केवळ इच्छा व अभ्यासाची प्रेरणा जाणून घेतात. प्रत्येक वर्गात फक्त वीस मुलं आणि तीन शिक्षकांना ठेवलं जातं, दिवसातले फक्त चार तास. त्यातच दुपारची जेवणाची सुट्टीही असते आणि घरी जाताना मुलांना गृहपाठ अजिबात दिला जात नाही. अर्थात तिथंही काही मुलं अभ्यासात कच्ची असतात. पण अशा मुलांना कुणी नावं ठेवत नाही, अशा मुलांवर शिक्षक आणि शाळा विशेष लक्ष देतात. विद्यार्थ्यांच्या वेगळेपणाचा आदर केला जातो. फिनलँडमध्ये शिक्षक होणं हे फारच महत्त्वाचं आणि मानाचं समजलं जातं. निवडक आणि पारखून घेतलेल्या लोकांनाच शिक्षक केलं जातं. शिक्षकाला पदविकेबरोबर इतरही सवयी, वर्तणूक योग्य असावी लागते, वयाच्या सोळाव्या वर्षांपासूनच शिक्षक होण्याचं प्रशिक्षण सुरू केलं जातं. बाकीच्या शिक्षणाबरोबरच त्यांना शिक्षक होण्याचा वेगळा आणि विशेष अभ्यास करावा लागतो. त्यात अभ्यासूपणा, कल्पकता, ज्ञान, नावीन्याची ओढ आणि विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव तपासला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जुन्या गोष्टींचा घाण्याचा बैल होण्यापेक्षा प्रत्येक शिक्षकानं अभ्यासात, शिकवण्याच्या पद्धतीत सतत नावीन्य आणावं, नव्या नव्या गोष्टी कराव्यात आणि नियमितपणे काळाच्या पुढं राहावं, अशी अपेक्षा असते.
फिनलँडच्या शिक्षण व्यवस्थेत मुलांची परीक्षा घेण्याची पद्धत नाही. त्यामुळं मुलांवर परीक्षेचा ताण अजिबात नसतो. तिथं मुलांनी शिकणं महत्त्वाचं मानलं जातं, परीक्षा देणं नाही. आपलं नऊ वर्षांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी प्रत्येक मुलाची राष्ट्रीय स्तरावर एक चाचणी घेतली जाते. त्या मुलाला पुढच्या शिक्षणात प्रवेश घेता येण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची असते आणि तिच्यात उत्तीर्ण व्हावं लागतं. त्या चाचणीत सहसा कुणी अनुत्तीर्ण होत नाही. पण पुढं मूल कोणत्या क्षेत्रात जाणार हे या चाचणीत ठरतं. मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जगण्यातल्या आणि व्यवहारी गोष्टी शिकवल्या जातात.
इथली शिक्षणपद्धती मुलांना नुसतं शिक्षित बनवत नाही, तर सुशिक्षित बनवते आणि त्याबरोबर प्रत्येक मूल चांगलं माणूस होईल, आदर्श जगेल-वागेल, हेही शिकवते. इथल्या शिक्षणात जास्त जोर असतो, तो गणित आणि विज्ञानात. त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो आणि शिक्षक विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणिताच्या बाबतीत आधुनिक राहिले पाहिजेत, याची दक्षता घेतली जाते. कोणतंही मूल त्याला हवा तेवढा वेळ वर्गात बसू शकतं. त्याला वाटलं, वर्गाच्या बाहेर जावं, खेळावं किंवा मस्त आराम करावा, तर ते मूल ते करू शकतं. सर्व शाळांमध्ये मुलांच्या अभ्यास सोडून खेळण्याच्या किंवा आराम करण्याच्या सोयी असतात. प्रत्येक वर्गात दर पंचेचाळीस मिनिटांनंतर मुलांना पंधरा मिनिटांची सुट्टी दिली जाते. मुलं त्या वेळात खेळू-बागडू शकतात, शाळेच्या बागेत फेरफटका मारू शकतात, हवं ते करू शकतात. अर्थात वर्ग चालू असतानाही मुलं हवं ते करू शकतात आणि बाहेरही जाऊ शकतात.
वर्गात मुलांची आणि शिक्षकांची बसण्याची व्यवस्थाही मजेशीर असते. शिक्षक सहसा टेबल-खुर्ची वापरत नाहीत. मुलंही स्वतःला हवं तिथं बसतात. त्यांनी बाकड्यांवरच बसलं पाहिजे, असं बंधन नाही. वर्गाला वाटलं तर, वर्ग शिक्षकांच्या भोवती गोल करून जमिनीवर बसतो. शिक्षकही मुलांमध्ये जमिनीवर बसतात. कधी-कधी वर्ग शाळेच्या गच्चीत किंवा बागेतही बसतो. मुलं आणि शिक्षक मित्र होऊन ती गोष्ट ठरवतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक मुलांचे चांगले मित्र असतात. प्रसंगी विद्यार्थी शिक्षकांचे मूल्यमापन करतात. अशी ही शिक्षण व्यवस्था आजच्या जगात पहिल्या क्रमांकाची मानली जाते.
आज फिनलँड श्रीमंत देशांमध्ये खूप वरच्या स्थानावर आहे. नागरिकशास्त्र व स्त्रीपुरुष बाबतीत जगात क्रमांक एकवर आहे, शांत आणि सुखी जगण्याच्या बाबतीतही क्रमांक एकवर आहे. भ्रष्टाचारमुक्त व्यवहारात, लैंगिक समानतेत, सुरक्षितेत व शांततेत फिनलँड जगात एक नंबर देश आहे, म्हणूनच जगात सर्वात आनंदी देशांमध्येही फिनलँड क्रमांक एकवर आहे. फिनलँडचं नेतृत्व करताहेत जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मरिन. बालवाडीच्या कोंडवाड्यात घुसमटलेली, अभ्यासाच्या ओझ्यात दबलेली, मार्क्स व परीक्षापद्धतीत फसलेली, शिक्षकांचं मूल्यांकन नसलेली आपली शिक्षण व्यवस्था फिनलँडच्या दिशेने नेता येईल काय?

Recent Posts

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

4 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

5 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

5 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

5 hours ago

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…

6 hours ago

मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे बसले गप्प; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…

7 hours ago