Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यखरेदीचे बदलते मार्ग; वाण्याचे दुकान ते मॉल कल्चर

खरेदीचे बदलते मार्ग; वाण्याचे दुकान ते मॉल कल्चर

ज्योत्स्ना कोट- बाबडे

साधारण वीस एक वर्षांपूर्वी बिस्किटे किंवा घरातील इतर लहान-सहान वस्तूंची खरेदी केवळ चाळींमधील किंवा नाक्यावरील वाण्याच्या दुकानात केली जायची. कपडे खरेदीचे हक्काचे ठिकाण म्हणजे स्टेशनलगतचे छोटे-मोठे मार्केट. जेवणा-सामनासाठी मार्केटमधील किराणा मालाचे दुकान ठरलेले समजा. दुकानात जाऊन हवे ते घ्या किंवा लिस्ट दिली की, दुकानातून हे सामान घरपोच आलेच समजा. संध्याकाळ झाली की, भाज्यांची आपल्या भरड्या, चिरक्या आवाजात मार्केटिंग करणारे परप्रांतीय असोत किंवा बाजारामध्ये भाज्यांच्या जुड्यांवर पाणी शिंपडत बसलेले ते विक्रेते. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपर्यंत खरेदीचा केवळ हाच मार्ग. आजही अशी खरेदी केली जाते; परंतु त्याचबरोबर मॉल संस्कृतीही बऱ्यापैकी रुजली आहे.

२०व्या शतकापर्यंत लालबाग, गिरगावसह अवघ्या मुंबईत दोन ते तीन मजल्यांच्या कौलारू चाळी, बैठी घरे मोठ्या संख्येने होती. इमारतीकरणात या चाळी भुईसपाट होऊन तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आणि मग नाक्यावरची वाण्याची दुकाने कमी होऊ लागली. हीच परिस्थिती लगतच्या ठाणे, कल्याण येथेही. याच स्थित्यंतरात ही मॉल संस्कृती हातपाय पसरू लागली. सुपारीपासून कपडे असू देत किंवा घरातील बारीक-सारीक वस्तू. या सर्वच वस्तू एकाच छताखाली मिळू लागल्या. त्यामुळे चार दुकाने फिरत वेळ घालवण्यापेक्षा एकाच मॉलमध्ये जाऊन खरेदीचा ओढा वाढू लागला. शिवाय खरेदीसोबत येथे मनोरंजनाची साधनेही आहेत. त्यात अनेक व्हरायटीज, विविध ब्रँड्सचे कपडे, किराणा माल, घरातील बारीक-सारीक वस्तूही मॉलमध्ये सहज मिळतात, तेही डिस्काऊंट कूपनसह. जे बाहेर घेताना विविध ब्रँडची दुकाने फिरावी लागतात. मात्र येथे एकाच छताखाली या सर्व वस्तू उपलब्ध असतात. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत, नक्षीदार साड्या यांनी चकचकीत काचेचे डिस्प्ले नटून गेलेले असतात. पांढऱ्या शुभ्र लाइट्सच्या प्रभावामुळे हे कपडे लक्ष वेधून घेतात. रस्त्यावरील दुकानांतील विक्रेत्यांच्या गळेपडणी व्यतिरिक्त येथे निवडीची मनाजोगती संधी, त्यात बिल पे करायच्या आधी एखादी वस्तू न घ्यावीशी वाटली, तर ती पुन्हा ठेवू शकतो, या साऱ्या मोकळ्या वातावरणामुळे मॉल संस्कृती आकर्षून घेते.

लोकांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. मॉल्स हे केवळ खरेदीचे ठिकाण नसून समाजात एकत्र येण्याचे आणि मनोरंजनाचे ठिकाण बनत चालले आहे. अनेकजण तर येथे केवळ विंडो शॉपिंग (केवळ फिरण्यासाठी), एसीची हवा खाण्यासाठी जातात, तर कॉलेजचे तरुण-तरुणीही मित्र- मंडळींसोबत बर्थडे असो वा काही पार्टी करण्यासाठी येथे येणे पसंत करतात. कारण फूड माॅलसोबतच मल्टिप्लेक्स, जॉय राईड, टॉय ट्रेन, किड्स झोन यांसह मनोरंजनाच्या इतर साधनांवरही येथे भर दिला जात आहे. त्यामुळे वीकेंडला पालकांकडून आपल्या बच्चे कंपनीला मॉलमध्ये फिरायला घेऊन येण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय घरातील नेहमीच्या साध्या साध्या उपयोगाच्या वस्तू खरेदीसाठी महिला वर्गाचा ओढाही मॉलकडे वळतो आहे. एक वस्तू खरेदी करता करता मग नजरेसमोर असलेल्या बऱ्याच वस्तू खरेदी करण्याचा मोह ग्राहकांना आवरत नाही. त्यात कडाक्याच्या उन्हात घाम गाळत, हातात सामानाचे अोझे उचलत खरेदी करण्याऐवजी लोक आता या एसी मॉलमध्ये खरेदी करण्यास प्राधान्य देतात. युवा वर्ग तर त्यांच्याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. शिवाय मॉल्समध्ये खरेदी केल्याने ग्राहकांची उत्तम दर्जाची ब्रँडेड उत्पादने खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होते, ज्यामुळे त्यांना समाधान मिळते. काही किशोरवयीन मुले शो ऑफ करण्यासाठीही मॉल्समध्ये जातात. भारतात शॉपिंग मॉल्सने नवीन संस्कृतीला जन्म दिला आहे.

चकचकीत वास्तू, प्रेझेंटिंगचे कौशल्य, खरेदीतला मोकळेपणा आणि हसतमुख सेल्समन/वुमन असले तरी त्यांचे मर्यादित मार्केटिंग यामुळे ही मॉल संस्कृती ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे. अनेकदा या मॉल्समध्ये सवलतीच्या दरात वस्तू विक्री होते. त्यामुळे ग्राहकांच्या पैशाची बचत होते. तेच बरेचदा वाण्याच्या दुकानात मिळत नाही. या मोठाल्या शॉपिंग मॉल्समध्ये तुम्ही एकाच छताखाली सर्व काही खरेदी करू शकता. मग ते ब्रँडेड कपडे, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा अगदी शूज असोत. आपण असे म्हणू शकतो की, मॉल्सने भारतीयांच्या खरेदीचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत आपली आई घरातील वस्तू घेण्यासाठी वाण्याच्या ‘किराणा दुकानात’ जात असे, पण सध्याच्या काळात किराणा दुकानांची जागा या मॉल्सने घेतली आहे. हे सारे बदल होत असूनही, कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागवणारी काही किराणा दुकाने अजूनही दिसतात. मॉल, सामान्य बाजारपेठ, आठवडी बाजार यांच्या संस्कृतीत बरेच फरक आहेत. सर्वसामान्य बाजारपेठेत गरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक वर्गातील व्यक्ती आपल्या सोयीनुसार खरेदी करतात, तर मॉलमध्ये विशिष्ट वर्गाच्या लोकांचीच संख्या जास्त दिसते. त्यामुळे वाण्याचे दुकान आजही पाय रोवून उभे आहे आणि राहील. ही मॉल संस्कृती फोफावली असली तरी आता तर खरेदीच्या पद्धतीत ऑनलाइन खरेदीने हा ‘खरेदीचा मार्ग’ आणखीनच आमूलाग्र बदलला आहे.

असो. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची गरज लक्षा घेता ही मॉल संस्कृती तरुणाईच्या पसंतीला उतरत असली तरी बाजारपेठा, रस्त्यांवरील खाऊगल्ल्या, छोटी-मोठी दुकाने येथेही खरेदीला गर्दी होते, हेही खरे आहे. ऑनलाइन खरेदीही वाढ झाली असली तरी मॉल संस्कृतीने मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय लोकांना प्रचंड आकर्षित केले आहे. भविष्यात ऑनलाइन खरेदी किंवा मॉल कल्चर कितीही एस्टॅब्लिश झाले तरी वाण्याचे दुकान विसरता येणार नाही व त्याला मरण नाही, हेही तितकेच खरे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -