Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणअमेरिकेला भारतीय आंब्यांची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारला मंजुरी

अमेरिकेला भारतीय आंब्यांची निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारला मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अमेरीकेच्या कृषी विभागाकडून या हंगामात भारतीय आंब्यांची अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळविली आहे.आता अमेरिकेतील ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातून पाठविलेले आंबे उपलब्ध होणार आहेत.

कोविड-19 महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकांना आंब्यांवरील विकिरण सुविधेची तपासणी करण्यासाठी भारतात येणे शक्य नसल्यामुळे वर्ष 2020 पासून भारतीय आंब्यांच्या अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते.

23 नोव्हेंबर 2021 रोजी 12 वी भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाची बैठक झाली. त्यातील निर्णयांना अनुसरून नुकताच भारताचे कृषी मंत्रालय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यादरम्यान परस्परांच्या कृषीबाजारांमध्ये सुगमतेने प्रवेश देण्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या आराखडा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार, भारतीय आंबे तसेच डाळिंबे यांची अमेरिकेला निर्यात आणि अमेरिकेच्या चेरी आणि अल्फाल्फा हे या पिकांची भारतात आयात करताना दोन्ही देश विकिरण संबंधी संयुक्त नियमावलीचे पालन करतील असे ठरविण्यात आले आहे.

परस्परांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून, भारत हापूस आंब्याच्या येत्या मार्च महिन्यापासून सुरु होणाऱ्या हंगामात अमेरिकेला आंब्यांची निर्यात करू शकणार आहे.भारताने 2017-18 मध्ये 2.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या 800 टन आंब्यांची अमेरिकेला निर्यात केली होती. त्यामुळे अमेरिकेत भारतीय आंब्यांना मोठी पसंती आणि तेथील ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. तसेच भारताने, 2018-19 मध्ये 3.63 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या 951 टन आंब्यांची तर 2019-20 मध्ये 4.35 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या 1,095 टन आंब्यांची अमेरिकेला निर्यात केली होती.

निर्यातदारांकडून व्यक्त झालेल्या अंदाजांनुसार, 2022 मधील आंबा निर्यात 2019-20 पेक्षा अधिक असेल, अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या निर्यात मंजुरीमुळे, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश तसेच तेलंगणा या आंबा उत्पादक पट्ट्यात पिकणाऱ्या आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की या निर्णयामुळे, भारताच्या उत्तर तसेच पूर्व भागातील उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या लंगडा, दशहरी, फझली इत्यादी इतर जातींच्या चवदार आंब्यांच्या निर्यातीला देखील संधी मिळेल. डाळिंबाच्या निर्यातीला एप्रिल 2022 मध्ये सुरुवात होईल तर अमेरिकेच्या अल्फाल्फा हे आणि चेरी यांची आयात देखील एप्रिल 2022 मध्येच सुरु होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -