Monday, May 13, 2024
Homeक्रीडाकॅप्टन रोहित शर्मा केंद्रस्थानी; भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका आजपासून

कॅप्टन रोहित शर्मा केंद्रस्थानी; भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका आजपासून

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला रविवारपासून (६ फेब्रुवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. मायदेशातील या झटपट मालिकेत यजमान संघासह कर्णधार रोहित शर्मा केंद्रस्थानी असेल.

पहिल्या सामन्यात कॅप्टन रोहित हा त्याचा मुंबई इंडियन्सचा सहकारी इशान किशनसह भारतासाठी डावाची सुरुवात करेल. रोहित शर्मानेच ही माहिती दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून संघात परतला. परंतु, मालिकेच्या काही दिवस आधी भारताच्या गोटात कोरोना शिरला. बाधित झाल्याने ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि नेट बॉलर नवदीप सैनी यांना वन डे मालिकेला मुकावे लागणार आहे. तसेच, बहिणीच्या लग्नामुळे सलामीवीर लोकेश राहुलही पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे इशान किशनला संघात दाखल करून घेण्यात आहे. ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अवेश खान यांच्यावर गोलंदाजीची मदार आहे. कीरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघात डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, शाई होप, कीमार रोच असे सीनियर क्रिकेटपटू आहेत.

कोरोना महामारीमुळे तिन्ही वनडे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. दुसरीकडे, पश्चिम बंगाल सरकारने ७५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला आहे. १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे तीन टी-ट्वेन्टी सामने होणार आहेत.

संघ पुढीलप्रमाणे – भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अवेश खान

वेस्ट इंडिज : कीरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन अॅलन, एन. बॉनर, डॅरेन ब्राव्हो, शेमराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, कीमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ऑडियन स्मिथ, हेडन वॉल्श (ज्युनियर).

हजार सामने खेळणारा भारत पहिला संघ

कर्णधार रोहित शर्मा जेव्हा नाणेफेकसाठी मैदानात उतरेल, तेव्हा भारत आणखी एक इतिहास रचेल. भारताचा हा एक हजारावा वनडे सामना आहे. अशी मजल मारणारा भारत हा पहिला क्रिकेट संघ ठरेल. भारताने आतापर्यंत ९९९ सामने खेळले असून ५१८ सामने जिंकले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने ४३१ सामने गमावले, तर ९ सामने बरोबरीत सुटले आहेत. ४१ सामने कोणत्याही निकालाशिवाय संपले.

भारताची विजयाची टक्केवारी ५४.५४ आहे. या यादीत भारतानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने ९५८ सामने खेळले आहेत, तर पाकिस्तानने ९३६, श्रीलंकेने ८७० आणि वेस्ट इंडिजने ८३४ सामने खेळले आहेत.

विराटचे संघात विशेष स्थान : रोहित शर्मा

विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं असलं तरी त्याचंही संघात विशेष स्थान असणार आहे, असं रोहित म्हणाला. विराटने कर्णधार असताना ज्या गोष्टी केल्या, त्या चांगल्याच होत्या. पण याचा अर्थ असा नाही की मी नवीन कर्णधार असल्यामुळे त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. उलट सध्या काहीही बदल आणण्याची गरज नाहीये. भारताचा वन डे संघ हा खूपच चांगला आहे. जेव्हा विराट कोहली कर्णधार होता त्यावेळी मी त्या संघाचा उपकर्णधार होतो. त्यामुळे विराटने ज्या यशस्वी पद्धतीने नेतृत्व केलं त्याच प्रकारे मी देखील त्याचा वारसा पुढे सुरू ठेवेन. मी नेतृत्व करत असताना काही वेळा अशी परिस्थिती येईल जेव्हा आम्हाला थोडासा बदल करावा लागेल, त्यावेळी आम्ही नक्कीच बदलाचा विचार करू, असं रोहित म्हणाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -