Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBoys 4 and Lavanyavati : वाचा ‘बॉईज ४’ चित्रपट आणि ‘लावण्यवती’ अल्बमविषयी...

Boys 4 and Lavanyavati : वाचा ‘बॉईज ४’ चित्रपट आणि ‘लावण्यवती’ अल्बमविषयी…

‘बॉईज ४’; चार भाग असणारा मराठीतील पहिला चित्रपट

ऐकलंत का! : दीपक परब

मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सीरिजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ धमाका करायला येत आहेत. नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असे म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर रोजी सर्वांच्या भेटीला येत आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत, तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत.

यापूर्वी ‘बॉईज’च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता आहे. आता यंदाच्या वर्षी धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहण्याची सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. ‘बॉईज ४’ बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकरने सांगितले की, आतापर्यंत ‘बॉईज’च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईस होते. ‘बॉईज ४’ मध्येही असेच सरप्राईज आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला ‘बॉईज ४’ करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा चित्रपटही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल.’

अवधूतचा ‘लावण्यवती’ अल्बम प्रदर्शित

लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडते. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहेत. ‘लावण्यवती’ हा त्यांचा नवीन अल्बम भेटीला आला आहे. एकविरा म्युझिकतर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती’ ह्या अल्बमचा एक टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. यातील घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे या अल्बमविषयीची उत्सुकता प्रचंड वाढली होती. आता या ‘लावण्यवती’तील पहिली लावण्यलतिका लावणीप्रेमींच्या भेटीला आली असून ‘गणराया’ ही श्रीगणेशाला वंदन करणारी पहिली लावणी प्रदर्शित झाली आहे. ह्यात नृत्यांगना भार्गवी चिरमुले आपल्या अदाकारीने भुरळ घालताना दिसत आहे. व्हीडिओचे नृत्य दिग्दर्शन सिद्धेश दळवी यांनी केले आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलेल्या या गाण्याची शब्दरचना देखील अवधूत गुप्ते यांचीच असून वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे. अनुराग गोडबोले यांनी संगीत संयोजन केले असून, गुरु पाटील यांनी संकलित केलेल्या या अल्बमची निर्मिती गिरिजा गुप्ते यांची आहे. ‘लावणी नाही कापणी’ अशी या ‘लावण्यवती’ची टॅगलाइन आहे, तर अनेकांना हा प्रश्न आहे, याचा नेमका अर्थ काय? तर हा अल्बम पाहून, ऐकून याचा उलगडा होईल. चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी श्रीगणेशाने करायची असते. म्हणूनच या अल्बममधील पहिले पुष्प म्हणजेच ‘गणराया’ ही लावणी तुमच्या भेटीला आली आहे. हळूहळू बाकी पुष्पही तुमच्या भेटीला येतील. ‘लावण्यवती’ या अल्बममध्ये वेगळ्या धाटणीची चार गाणी आहेत. प्रत्येक लावणीची एक खासियत आहे. हा नवीन प्रयत्न संगीतप्रेमी आणि नृत्यप्रेमींना नक्कीच भावेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -