Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीSharad Pawar : शरद पवारांना धक्का देत आणखी एका नेत्याला सोबत घेण्याची...

Sharad Pawar : शरद पवारांना धक्का देत आणखी एका नेत्याला सोबत घेण्याची भाजपची रणनिती

पश्चिम महाराष्ट्रातील ‘तो’ नेता कोण?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दृष्टीने भाजपा (BJP) आपला विस्तार अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी भाजपाची शक्ती कमी आहे, अशा ठिकाणच्या बड्या नेत्यांना आपल्यात सामील करुन घेण्याचा भाजपाचा मानस आहे. मागच्या काही दिवसांतच भाजपाने काँग्रेसला (Congress) तीन मोठे धक्के दिले. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी व अशोक चव्हाण या तीन मातब्बर नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने काँग्रेस खिळखिळी झाली आहे. आता भाजप पश्चिम महाराष्ट्रातही आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर येत आहे. या ठिकाणच्या शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असलेल्या बड्या नेत्याला सामील करुन घेण्यासाठी भाजप रणनिती आखत आहे. त्यामुळे आता लवकरच शरद पवारांना धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (शरद पवार) काही जोरदार धक्के देण्याची रणनीती भाजपश्रेष्ठींनी आखली आहे. लोकसभेच्या राज्यातील ४८ पैकी ४२ हून अधिक जागा जिंकायच्या असतील तर या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल, अशी या रणनीतीमागील भूमिका आहे.

अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली. भाजपच्या नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघाला यामुळे फायदा होणार आहे. मराठवाड्यानंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या भागात गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने चांगला शिरकाव केला, पण हवी तशी पकड त्यांना मिळवता आली नाही. येथे शरद पवारांचा प्रभाव अधिक आहे. त्यातच आता शरद पवारांचा विश्वासू नेता भाजपच्या गळाला लागल्याचं समजत आहे.

कोण आहे ‘तो’ नेता?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तो नेता शरद पवार यांच्यासोबत उभा राहिला. शरद पवारांसोबत असलेल्या या नेत्याला पक्षात आणले तर सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल, असं भाजपचं समीकरण आहे. त्या नेत्याकडे प्रशासकीय अनुभवही मोठा आहे. त्याने मंत्रिमंडळात महत्वाची खाती संभाळली आहेत. या नेत्याचे सहकार क्षेत्रातही मोठे नाव आहे. शरद पवारांसोबत असलेल्या या नेत्याची दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा झाल्याचंही समोर आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याला भाजपमध्ये आणल्यास पश्चिम महाराष्ट्रातील ताकद वाढेलच, पण त्यासोबत त्या नेत्याच्या मुलालाही लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. किंवा त्याच नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य असताना त्या नेत्याचं अजित पवारांशी सख्य नव्हतं, पण शरद पवारांचे विश्वासू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं महत्व होतं. आता त्याच शरद पवारांच्या विश्वासू नेत्याला पक्षात घेऊन भाजप आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -