Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडी'पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू नको, झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या'

‘पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू नको, झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या’

राज ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना आवाहन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि चाहते शिवतिर्थावर येत असतात. मात्र यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कुणीही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येऊ नका. तर येताना एखादं झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या, असे आवाहन राज यांनी पत्राद्वारे केले आहे. तसेच या शैक्षणिक वस्तू गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातील, असेही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझा तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे, असे भावनिक आवाहन राज यांनी केले आहे.

दरम्यान, प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याची सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढावा म्हणून राज ठाकरेंनी नाका तिथे शाखा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -