Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीBaba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का; बाबा सिद्दीकी यांचा अधिकृतपणे काँग्रेसला 'जय...

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का; बाबा सिद्दीकी यांचा अधिकृतपणे काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’!

४८ वर्षांची साथ सोडली; आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आल्या असून काँग्रेसला (Congress) मात्र धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत. इंडिया आघाडी (INDIA Alliance) तर पार कोलमडली आहे. एवढंच नव्हे तर स्थानिक पातळीवरही काँग्रेसला याचे परिणाम सोसावे लागत आहेत. याचं कारण म्हणजे मुंबईच्या वांद्रे (Bandra) परिसरातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते समजले जाणारे बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आज त्यांनी ट्वीट करत अधिकृतरित्या याबाबत घोषणा केली आहे.

यापूर्वी देखील बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा व काँग्रेसचा सक्रिय नेता झिशान सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या गोष्टींना पुष्टी मिळत नव्हती. आता बाबा सिद्दीकी यांनी स्वतः काँग्रेसमधून राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

बाबा सिद्दीकी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा ४८ वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त व्हायला खूप आवडले असते पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो’.

बाबा सिद्दीकी अजित पवारांची साथ देणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करुन १० फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात अजित पवार गटात (Ajit Pawar Group) म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मात्र, आपल्या ट्वीटमध्ये सिद्दीकी यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी भाष्य केलेले नाही.

काँग्रेसचे मोठे नुकसान

मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत हा मोठा धक्का पचवत असतानाच आता हा दुसरा मोठा धक्का काँग्रेसला पचवावा लागणार आहे.

कोण आहेत बाबा सिद्दीकी?

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. २०००-२००४ या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -