Friday, May 17, 2024
Homeरविवार विशेषभाषासंपन्न होण्याची गरज...

भाषासंपन्न होण्याची गरज…

भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांच्याबाबत काम करता येण्याचे उत्तम माध्यम म्हणजे वाङ्मय मंडळे. या माध्यमातून होणारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन अतिशय मौल्यवान असते. संगीत, नृत्य, नाटक, लेखन, अभिवाचन अशा सर्वांचे आदानप्रदान होणे वाङ्मय मंडळाच्या मंचावरून शक्य होते. महाविद्यालयातला हा काळ टिपकागदाप्रमाणे खूप काही शोषून घेण्याचा काळ आहे.

चित्रपट आस्वाद, कविता समजून घेणे, अभिनय गुण या सर्वातून संवेदनशील माणूस घडण्याचा प्रवास सुरू होतो. अनेक महाविद्यालयांमधून वाङ्मय मंडळे असतात. ती वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. काही ठिकाणी त्या कार्यक्रमांना उदंड गर्दी असते, तर काही ठिकाणी बापुडवाणे कार्यक्रम घडतात. आपल्या भाषेवरच्या अतोनात प्रेमातून वाङ्मय मंडळे बहरतात. मोठी होतात.

कशाला हवी आपली भाषा? या प्रश्नाने जर मूळ धरले तर भाषेविषयीचे कुठलेही काम उभे राहणार नाही. तिच्यासाठीची स्वप्ने आपण पाहायला हवीत. तीच पाहिली नाही तर ती साकार होणार नाहीत. माणसे श्रीमंत होण्याची, यशस्वी होण्याची स्वप्ने पाहतात, त्यामुळे यशस्वी होण्याचे मार्ग, आर्थिक उन्नतीचे उपाय अशी पुस्तके सतत प्रकाशित होतात व त्यांना चांगली मागणी देखील असते.

भाषासंपन्न होण्याकरिता काय करायचे यावर चिंतन, मनन, लेखन या मार्गानी समाज म्हणून आपण किती गंभीर विचार करतो, हे महत्त्वाचे ठरते. भाषासंपन्न होण्याची गरज काय आहे, हे शाळा-महाविद्यालयाच्या काळातच मुलांवर ठसले पाहिजे.

या काळातल्या चर्चा याकरिता उपयुक्त ठरतात. सध्या लोकमान्य टिळकांचे जीवनचरित्र एका वाहिनीद्वारा साकारले जाते आहे. तरुणपणातील आगरकर आणि टिळक यांच्यातील चर्चा व संवाद तसेच समाज, राष्ट्राविषयी भूमिका, स्वराज्य, शिक्षणपद्धतीविषयीचे विचार हे सर्व खरोखर समजून घेण्यासारखे आहे. १९व्या शतकातील घटना प्रसंग, स्थित्यंतरे हा विषयच सखोल आहे. डॉ. अनंत देशमुख यांचे गतकाल नावाचे छोटेखानी पुस्तक या दृष्टीने वाचनीय आहे.

प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुंदर लेणी तयात खोदा…

केशवसुतांच्या या ओळी अतिशय बोलक्या आहेत. हाती असलेल्या काळाचा उपयोग करून सुंदर शिल्प घडवण्याचा प्रयास माणसाला करता यायला हवा.

काळ बदलत असतो. त्या त्या काळाच्या सांस्कृतिक व सामाजिक गरजा बदलत असतात. त्यांचा अभ्यास करणारी व्यक्तिमत्त्वे ही समाजाची गरज असते. अशा माणसांचा समाज अखंड ऋणी असतो. अशा माणसांची जडणघडण शिक्षणातून होते. म्हणून शिक्षणाकडे व त्यातील बदलांकडे आपण अभ्यास म्हणून पाहिले पाहिजे.

-डॉ. वीणा सानेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -