Sunday, May 4, 2025

अग्रलेख

भारताकडून पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी

पहेलगाम हल्ल्यानंतर सर्वात पहिला परिणाम भारताकडून पाकिस्तानविरूद्ध कठोर पावले उचलण्यात झाला आणि त्यातही पहिला होता तो इंडस वॉटर ट्रीटी स्थगित करण्यात आला. हा करार दोन देशांतील पाणीवाटपाचा करार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी गेले आहे. हे साहजिक होते कारण पाकिस्तानच्या मांडीवर बसून भारतातील निरपराध लोकांच्या हत्या घडवणाऱ्या अतिरेक्यांना धडा शिकवणे गरजेचे होते आणि तेच मोदी सरकारने केले. मोदी सरकार म्हणजे नेहरू सरकार किंवा काँग्रेस नव्हे. मोदी सरकारने ताबडतोब पाकिस्तानचे पाणी बंद केले आणि पाक आता बोंबा मारत सुटला आहे. पण दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंच्या पर्यटकांच्या हत्या केल्या आणि त्यांची सुंता झाली आहे की नाही हे पाहिले अशा क्रूरकर्मा दहशतवाद्यांच्या बाबतीत इतकेच कठोर उपाय योजणे गरजेचे होते. तेच भारत सरकारने केले.

१९६० सालचा हा करार नेहरू सरकारमुळे भारताच्या माथी मारण्यात आला. यात पाकिस्तानचा सर्वंकष फायदा होता, पण तो आता स्थगित करण्यात आला आहे आणि त्यामुळेही पाकच्या नाकातोंडात पाणी गेले आहे. याबरोबरच पाकिस्तानला अनेक प्रकारे धडा शिकवण्यात येत आहे.भारताने पाकिस्तानकडील सर्व आयात बंद केली आहे. त्यामुळे अगोदरच कंगाल झालेला पाकिस्तान आणखी कंगाल होण्याच्या बेतात आहे. त्यातच आज एक आणखी बातमी अशी आहे की पाकिस्तानची एअर लाईन्स संकटात गटांगळ्या खात आहे. कारण भारताने आपल्या हवाई हद्दी वापरण्यास बंदी केली आहे. पाकिस्ताननेही भारतीय विमान कंपन्यांना त्यांची हवाई हद्द वापरण्यास मनाई केली आहे. पण भारताचे त्यामुळे नुकसान होणार नाही, तर पाकिस्तानसाठी हा कुठाराघात ठरणार आहे. त्याशिवाय भारताच्या दबावामुळेच पाकिस्तानला होणारी आर्थिक मदत आता ठप्प होणार आहे. मोदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार पक्का केला आहे आणि त्याचे पहिले प्रत्यंतर आले आहे. पाकिस्तानच्या शेतकऱ्यांनी आमचे पाणी बंद केल्यामुळे आम्ही उपाशी मरणार आहोत असा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. पण ती वस्तुस्थिती असली तरीही हिंदू पर्यटकांना धर्म विचारून त्यांची हत्या करणाऱ्या नराधम दहशतवाद्याच्या कृत्याबद्दल पाकिस्तानी नागरिकांना शिक्षा होत असेल, तर त्याला कुणाचाच इलाज नाही. याबाबतीत शिवाजी राजांचे उदाहरण आठवते. त्यांनी त्यांच्याशी युद्ध करणाऱ्या इग्रजांच्या वतीने लढताना युनियन जॅक गर्वाने लहरवणाऱ्या इंग्रजांना असाच धडा शिकवला होता आणि इंग्रजांना मुश्कीलीत टाकले होते. तोच कित्ता मोदी यांनी गिरवला आहे. पाकिस्तान एअर लाईन्स संकटात आहे, तर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानचा सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे, तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि युरोपीय युनियन यांच्याकडून कर्ज मिळू नये म्हणून भारताने दबाव टाकला आहे. या सर्वांचा पाकला तोटा असा की त्याच्या आर्थिक नाड्या चांगल्याच आवळल्या गेल्या आहेत. यातून पाक कधीच सावरणार नाही हे निश्चित आहे.

भारताने पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला आहे आणि त्यानुसार पाकिस्तानकडून संपूर्ण आयात बंद केले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा श्वास गुदमरणार आहे. पाकिस्तानला आर्थिक आघाडीवर मोठा झटका बसणार आहे. विशेषज्ञांचे असे म्हणणे आहे की या निर्णयामुळे पाकिस्तानचे नुकसान प्रचंड होणार आहे. अगोदरच कर्ज, महागाई आणि बेरोजगार यांच्याशी लढत देणाऱ्या पाकिस्तानला या भारताच्या कठोर पावलामुळे जिणे अवघड होणार आहे. भारताच्या निर्णयामुळ पाकिस्तानची जनता दाण्यादाण्याला पारखी होणार आहे असे काहींचे म्हणणे आहे. पण आपण तितके वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कारण पाकिस्ताननेच हे संकट ओढवून घेतले आहे. भारताने शनिवारी एका अधिसूचना जारी करून म्हटले आहे की एक नवीन तरतूद एफटीपी जोडण्यात आली आहे. त्यामुळे भारताकडून केल्या जाणाऱ्या आयातीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे पाकचे कंबरडे मोडणार आहे आणि पाकला हीच शिक्षा योग्य आहे, भारताकडून पाकला जाणाऱ्या वस्तुंमध्ये कापूस, केमिकल्स आणि फूड प्रोडक्टस यांचा समावेश होतो. पण भारतावर आयात किंवा निर्यात बंद केल्याचा काहीच परिणाम होणार नाही. कारण भारताची अवस्था इतकी काही नाजूक नाही. उलट पाकची अवस्था दयनीय आहे आणि त्याला भरताच्या या कृतीचा फटका बसणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आणि विशेषतः निरपराध हिंदू पर्यटकांना मारल्यानंतर भारताचा रूद्रावतार आता पाकला सहन करावा लागत आहे. त्यात भारताने पाकचे पाणी बंद केले आहे तसेच हवाई हद्द बंद केली आहे.

पाकची डबधाईला आलेली अर्थव्यवस्था आणखीच गर्तेत गेली आहे आणि तसेच व्हावे अशी भारतवासीयांची इच्छा आहे. सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर आपल्याकडील काही लोक त्याला हलक्यात घेत आहेत, पण पाकिस्तानी जनता त्याचे भीषण परिणाम समजून चुकली आहे. जागतिक बँकेचा ताजा अहवाल असे सांगतो की २०२५ च्या शेवटपर्यंत पाकिस्तानचे ७४ टक्के लोक उपासमारीने मरू शकतात. पाण्याची कमतरता ही स्थिती आणखी बिघडवू शकते. पहलगाम हल्ल्यानंतर पाकची आधीच डळमळती अर्थव्यवस्था आणखीच कंगाल झाली आहे. आता जागतिक बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता नाही, चीन-पाकला मदत करू शकणार नाही अशी स्थिती आहे, कारण चीनचे स्वतःचे प्रश्न आहेत. कर्ज, चलन फुगवटा आणि आंतरिक अस्थिरतेशी झुंजणाऱ्या पाकला नवे संकट पेलवणार नाही. पाकच्या जनजीवनावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. युद्धसदृष्य परिस्थिती उद्भवते, तर पाकची अवस्था आणखीच अवघड होणार आहे. कारण आता युद्ध झाले तर पाकला ते परवडणार नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची स्थिती काही काळ चिंताजनक होती. पण पाक तर पुरता उद्ध्वस्त झाला आहे. पाक आपल्याच जाळ्यात गुंतला गेला आहे आणि त्याला कोणीही वाचवू शकणार नाही अशी स्थिती आहे.

Comments
Add Comment