
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.तसेच, भारतीय लष्कराने युद्धाभ्यास सुरू केल्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. विशेष म्हणजे, अमेरीका आणि रशियासह अनेक देशांनी भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच, आता जपानदेखील भारताच्या बाजूने आला आहे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांच्यात आज, सोमवारी एक मोठी बैठक झाली. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींबाबत चर्चा झाली. याशिवाय, दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थिती आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावरही भर देण्यात आला. महत्वाचे म्हणजे, गेल्या 6 महिन्यांत दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची ही दुसरी बैठक आहे.भारत-जपान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत मजबूत एकता दाखवल्याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानू इच्छितो. बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी X वर पोस्ट केले की, "नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी सॅन यांना भेटून आनंद झाला. भारत आणि जपानमध्ये एक विशेष, धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आहे. बैठकीदरम्यान, आम्ही संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आणि सीमापार धोक्यांचा सामना करण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्न वाढवण्याच्या गरजेवर भर दिला."