
खेड : मुंबईतील बोरिवलीहून कोकणच्या दिशेने निघालेल्या ओमकार ट्रॅव्हलच्या खासगी बसला मुंबई गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंड परिसरात रविवारी अकरा वाजता अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि ३० पेक्षा प्रवासी जखमी झाले.
ओमकार ट्रॅव्हल्सची एमएच ४७, वाय ७४८७ ही खासगी बस पस्तीस प्रवासी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस उटलली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम, वैद्यकीय पथक आणि स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि पनवेल येथील गांधी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. एमजीएममध्ये २३ आणि दोन जणांवर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
बस बोरिवलीहून सावंतवाडीच्या दिशेने निघाली होती. उन्हाळी सुट्या सुरू झाल्यामुळे सध्या कोकणच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आणि सरकारी बस भरुन जात आहेत. ही बोरिवली - सावंतवाडी मार्गावरील खासगी बस पण भरलेली होती. रात्री चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटून अपघात झाला. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अथक प्रयत्न करुन अपघातग्रस्त बस बाजुला केली आणि वाहतूक काही तासांत सुरळीत केली.
कर्नाळा खिंडीत वारंवार अपघात होत असतात. नागमोडी वळणांवर रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना अपुरी ठरत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.