
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ शहर आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच बांदा शहराला तब्बल दोन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्याने बांदा शहरात तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरची वाहतूक देखील विस्कळीत झाली.
अनेकांच्या दुकानांचे तसेच घरांचे पत्रे उडून गेलेत. मुसळधार पावसान सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पवसाने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ पिकांचे मात्र नुकसान झालं आहे. आज दुपारपासून ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणात उष्मा देखील वाढला होता. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे सुरु झालेत. काही वेळातच विजांच्या गडगडाटत मुसळधार पावसास सुरुवात झाली. जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने सर्वांनीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. तब्बल दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.