Sunday, May 4, 2025

तात्पर्यसंपादकीय

लाभांश आणि मूल्यवृद्धीद्वारे उत्पन्न वाढ

लाभांश आणि मूल्यवृद्धीद्वारे उत्पन्न वाढ

उदय पिंगळे : मुंबई ग्राहक पंचायत

आपल्या वाजवी इच्छा-आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि आपण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे यासाठी गुंतवणूक करावी लागते. ती करण्यासाठी काही रक्कम प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवावी लागते. ती पुरेशी नसेल तर उत्पन्न कसे वाढेल याचे मार्ग शोधावे लागतात. आपल्यासारखेच आपल्या देशाच्या विकासकामासाठी सरकारला पैसे लागतात. कर हे सरकारच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. वेगवेगळ्या मार्गाने अधिकाधिक कर कसा गोळा होईल हे सरकार पहात असते. त्यातील काही कर सरसकट सर्वांना द्यावे लागतात (उदा. जीएसटी) तर काही पगार किंवा व्यवसायाच्या उत्पन्नावर (उदा.आयकर) द्यावे लागतात. काही कर हे विशेष कर म्हणता येतील. (उदा. भांडवली नफ्यावरील कर, आयात निर्यातीवरील कर) आपल्या सरकारचा अर्थसंकल्प तुटीचा आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावे लागते, त्यावर व्याज द्यावे लागते. कमी प्रमाणात चलन निर्मिती करून त्याची तोंडमिळवणी करावी लागते. त्यामुळे सरकारी खर्चात वाढ होते आणि चलनाचे मूल्य कमी होते. पर्यायाने महागाईत वाढ होते. आपल्या देशात लोकांच्या उत्पन्नात प्रचंड तफावत आहे. ९०% संपत्ती १०% लोकांकडे एकवटली असल्याने अनेक लोकांना आपल्या किमान गरजा पूर्ण करता येत नाहीत. अशा लोकांसाठी सरकारी योजना आहेत. तरीही अशी अनेक कुटुंबे आहेत जी आपल्या गरजा कशाबशा भागवत असतात. याहून थोडा वरचा स्तर असलेले लोक थोड्या वाढलेल्या उत्पन्नावर आयकर देत होते. खरं तर या वर्गाने त्यांच्या अडीअडचणीसाठी थोडी गुंतवणूक करणे आवश्यक होते. कारण कोणतेही असेना यावर्षी आयकर मर्यादेत नवीन पद्धतीने मोजणी केल्यास प्रत्येक स्तरावर भरीव वाढ तसेच काही अटी पूर्ण करणाऱ्या ₹ १२ लाखांच्या आत करपात्र उत्पन्न असलेल्याना आयकर सवलतीमुळे कर द्यावा लागणार नसल्याने हा वर्ग अधिक खर्च करू शकेल, त्याचप्रमाणे गुंतवणूकही करू शकणार आहे. ९०% व्यक्तींचे उत्पन्न या मर्यादेत असल्याने आता त्यांना आयकर द्यावा लागणार नाही. टीडीएस आणि टीसीएस मर्यादा वाढल्या आहेत. याचा मागोवा घेण्याच्या हेतूने गेल्या वर्षी आयकर विवरणपत्र ज्यांनी भरली त्या सर्व करदात्यांचा तपशील उपलब्ध झाला आहे. ही आकडेवारी ३१ मे २०२४ पर्यंत विवरणपत्र दाखल केलेल्यांची असून त्यातून मिळालेली महत्त्वाची माहिती अशी की, विवरण पत्र भरणाऱ्या करदात्यांची संख्या ७,९७,१२,१४५ आहे. ७२% लोकांनी नवीन करमोजणी पद्धतीचा स्वीकार केला आहे. ज्यांचा आर्थिक स्तर एकदम कमी त्यांना गुंतवणूक शक्यच नाही आणि ज्यांचा आर्थिक स्तर एकदम वरचा आहे त्याना असंख्य गुंतवणूक पर्याय आहेत. आता १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास कर बसणार नसल्याने एक मोठा वर्ग आयकरापासून मुक्त होईल. करवाढीच्या प्रत्येक टप्प्यात फेररचना झाल्याने सर्वच करदात्यांचा एकंदर कर बऱ्यापैकी कमी होणार आहे. यातील अनेक जण वाचलेला कर खर्च करतील, तर काहीजण बचत आणि त्यातून गुंतवणूक करू शकतील. या गुंतवणुकीतून आपल्याला ‘वाजवी’ लाभ मिळावा अशी अपेक्षा असणे साहजिक आहे. ‘वाजवी’ हा सापेक्ष शब्द असला तरी मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी महागाईवर मात करेल असा परतावा मिळू शकेल आणि रक्कमही सुरक्षित राहील असा एक उत्तम पर्याय म्हणजे शक्य असेल त्या पद्धतीने टप्याटप्याने लाभांश (डिव्हिडंड) देणारे असे शेअर्स घ्यावेत की त्यातून मिळणारा परतावा बँकेत पैसे ठेवले तर मिळणाऱ्या रकमेच्या आसपास असेल. भविष्यात त्या शेअर्सच्या भावात वाढ झाली की भांडवल वृद्धी होईल आणि कमी जोखीम घेऊन बऱ्यापैकी परतावा मिळेल. ₹ बारा लाखांपर्यंत उत्पन्नावर कर नाही आणि दरवर्षी ₹ एक लाख पंचवीस हजारांचा करमुक्त दीर्घकालीन भांडवली नफा या दोन्हींचा लाभ घेता येईल असे नियोजन करता येईल. महागाईशी निगडित पेन्शन न मिळणारे ज्येष्ठ नागरिकही आपली निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम प्रथम स्थिर उत्पन्न देणाऱ्या वरिष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS सध्याचा व्याजदर ८.२%), रिझर्व्ह बँकेच्या बदलत्या व्याजदराच्या रोख्यांमध्ये गुंतवून (RBI FRB सध्याचा व्याजदर ८.०५%) निश्चिन्त राहून अधिकची रक्कम अशा शेअर्समध्ये गुंतवू शकतात. अनेक ब्लू चिप कंपन्यांचे भाव कायमच जास्त असून त्यातून मिळणारा लाभांश परतावा नगण्य असल्याने या गुंतवणूकदार वर्गासाठी त्यांचा विचार जाणीवपूर्वक केला नाही.

स्क्रीनर, मनीकंट्रोल, इटी मनी यांसारख्या संकेतस्थळावरून ५% ते १२% लाभांश परतावा मिळणारे शेअर्स शोधल्यास त्यात खनिजे, तेल शुद्धीकरण, नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्या आहेत, तर २% ते ४% लाभांश परतावा देणाऱ्या यादीत ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्या सरकारी क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्या असून त्यांचा गेल्या ५२ आठवड्यांतील सर्वाधिक भाव आणि सर्वात कमी भाव यात ५०% हून जास्त फरक आहे. फारसे कष्ट न घेता लाभांश घेऊन भाव वर्षभरात १५ ते २०% वर गेल्यास भांडवली नफा मिळवता येणे शक्य आहे. त्यांनी आपल्या भागधारकांना वेळोवेळी बोनस शेअर्सही दिले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीचे हे एक साधन होऊ शकते. या दृष्टीने आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी. सध्या या सर्व कंपन्या त्याच्या ५२ आठवड्यांतील सर्वात कमी भावाच्या जवळपास मिळत असल्याने, येथून त्यांचे भाव खाली जाण्याची शक्यता बरीच कमी आणि वाढण्याची शक्यता बरीच अधिक आहे. याचा विचार करून आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन यातील जोखीम समजून घेऊन गुंतवणूक करता येईल.

[email protected]

Comments
Add Comment