Monday, May 5, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीपालघर

वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाले असून वाडा तालुका देखरेख संघ, वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था, चांबळे सेवा सहकारी संस्था, आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल मध्ये होणार आहेत. या संस्थांची निवडणूक १९ एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. तर २४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे.
वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था असून या संस्थेच्या मालकीची वाडा शहरात तीन मजली इमारत सुद्धा आहे. यात व्यापारी गाळे व संस्थेचे प्रशस्त कार्यालय आहे. मात्र तांत्रिक कारणामुळे ही इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकले असून आगामी पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने निवडून येणारे संस्थेचे पदाधिकारी या वादग्रस्त इमारतीचा टिळा कसा सोडवतात याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वाडा ग्रुप सेवा सहकारी सोसायटीमध्ये सदस्य संख्या १६९६ आहेत तर मतदार संख्या १२५१ असून या संस्थेत एकूण २४ गावांचा समावेश आहे. या सोसायटीची वार्षिक उलाढाल आठ ते नऊ कोटींची आहे. या संस्थेमध्ये अनेक मातब्बर राजकारणी सदस्य असल्याने या संस्थेच्या निवडणुकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. तर चांबळे सेवा सहकारी संस्थेची आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा असून या संस्थेच्या माध्यमातून लडकू दत्तात्रय शेलार यांनी वाडा तालुका खरेदी-विक्री संघाचे उपसभापती पद भूषवले होते. या संस्थेत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment