Friday, April 17, 2026

शिर्डी साई संस्थान विश्वस्त मंडळाला वेग; साई सेवेसाठी राजकीय ‘फिल्डिंग’ सुरू!

शिर्डी साई संस्थान विश्वस्त मंडळाला वेग; साई सेवेसाठी राजकीय ‘फिल्डिंग’ सुरू!

शिर्डी : देशातील एक अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळ स्थापनेला आता वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या जून महिन्यात हे नवीन मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून रखडलेल्या विकासकामांना त्यामुळे गती मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांची संभाव्य गर्दी शिर्डीकडे वळू शकते. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, गटार यंत्रणा, पार्किंग, लाईटिंग, निवास व्यवस्था या अत्यावश्यक सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. शासनाकडून पूर्वतयारीचा आराखडा तयार करण्यात आला असला, तरी त्यात शिर्डीचा समावेश नाही. त्यामुळेच साई संस्थानच्या पूर्ण वेळ विश्वस्त मंडळाची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते.

सध्या संस्थानचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे आहे, मात्र उच्च न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास त्यांच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे प्रमुख विकासकामे – जसे की रिंगरोड, पार्किंग प्रकल्प, गार्डन आरक्षण आणि भू-संपादन – हे सर्व थांबले आहेत. शिर्डी नगरपरिषदेच्या निधीअभावी ही कामं साई संस्थानवर अवलंबून आहेत, मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विश्वस्त मंडळालाच आहे.

नवीन मंडळात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांचे वर्चस्व असलेले २१ सदस्य असणार आहेत. यामध्ये डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील, पदवीधर अशा अनुभवी तज्ज्ञांचा समावेश अनिवार्य आहे. त्याशिवाय सात सदस्य हे अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यामुळे शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्यात ‘फिल्डिंग’ लावण्याची चुरस सुरु झाली आहे.

या प्रक्रियेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका अत्यंत निर्णायक राहणार आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि विधी व न्याय खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस टिकाऊ आणि पारदर्शक विश्वस्त मंडळ देणार, अशी भाविकांची आशा आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून संधीची वाट पाहणारे आणि गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक आता थेट मुंबईच्या दौऱ्यांवर असून, हे प्रतिष्ठेचे पद आपल्या नावावर लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. साईबाबांच्या सेवेसाठी म्हणून ओळखले जाणारे आणि प्रतिष्ठित मानले जाणाऱ्या या पदाची लॉटरी कुणाच्या नशिबात आहे आणि हे पद नक्की कुणाच्या नशिबी येणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा