Monday, May 5, 2025

क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Performance of cricketers : पत्नींमुळे क्रिकेटर्सच्या कामगिरीवर परिणाम होतोय का?

Performance of cricketers : पत्नींमुळे क्रिकेटर्सच्या कामगिरीवर परिणाम होतोय का?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना आता एका मोठ्या निर्णयाचा सामना करावा लागणार आहे. बीसीसीआयनं (BCCI) नुकताच एक कडक नियम लागू केलाय, ज्यामुळे खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही फटका बसलाय. तर नेमका काय आहे हा नियम? आणि (Performance of cricketers) यामागचं बीसीसीआयचं मोठं कारण काय आहे? चला, सविस्तर माहिती घेऊया.

बीसीसीआयनं ठरवलंय की आता खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबीयांना विदेश दौ-यात संपूर्ण वेळ त्यांच्यासोबत राहता येणार नाही. जर दौरा ४५ दिवसांपेक्षा जास्त असेल, तर कुटुंबीय फक्त १४ दिवस खेळाडूंसोबत राहू शकतात. आणि जर दौरा छोटा म्हणजेच ४५ दिवसांपेक्षा कमी असेल, तर त्यांना फक्त ७ दिवसांची परवानगी असेल.

?si=wcCU3_ZSkGDEG4oc

हा निर्णय नेमका का घेतला गेलाय? यामागचं कारण आहे लॉजिस्टिक्स आणि व्यवस्थापनाचा ताण. खेळाडूंच्या कुटुंबीयांसोबत प्रवास करणं म्हणजे बीसीसीआयसाठी मोठं आव्हान बनतं. जेव्हा खेळाडूंच्या कुटुंबीयांना परदेश दौ-यावर सोबत नेलं जातं, तेव्हा त्यांच्या राहण्या-जेवण्यापासून ते वाहतूक, तिकिटं, हॉटेल्स, आणि सामन्यांच्या तिकिटांपर्यंत सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करावं लागतं. हे सगळं सांभाळणं खूप कठीण होतं.

 

२०२० च्या ऑस्ट्रेलिया दौ-यात, भारतीय संघासोबत ४० हून अधिक कुटुंबीय होते. त्यावेळी दोन बसही पुरेशा नव्हत्या! २०१९ च्या विश्वचषकादरम्यान बीसीसीआयच्या अधिका-यांनाही या समस्येचा सामना करावा लागला. याशिवाय, संघातील खेळाडूंचं लक्ष विचलित होऊ नये, हे सुद्धा एक कारण आहे.

बीसीसीआयचं असं म्हणणं आहे की, खेळाडूंनी एकमेकांबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. परंतू कुटुंबीय सोबत असतील, तर खेळाडू मोकळ्या वेळेत त्यांच्यासोबत बाहेर जातात. यामुळे संघाचा एकत्रित वेळ कमी होतो. कुटुंबीय सोबत असल्यावर टीम बॉन्डिंगवर परिणाम होतो. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करण्यावर परिणाम होतो, असं बीसीसीआयचं मत आहे.

जर खेळाडूचे कुटुंब लांब दौ-यांवर त्याच्यासोबत असेल तर इतर काही गोष्टी देखील विचारात घेतल्या जातात. उदाहरणार्थ, जर पत्नी किंवा गर्लफ्रेंड दौ-यावर खेळाडूंसोबत राहिली तर खेळाडू त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांच्यासोबत दिसतात. ते बाहेर जातात आणि त्यांच्यासोबत फिरतात. जर कुटुंब एकत्र नसेल तर खेळाडू अधिक मोकळेपणाने बोलू शकतात. तुम्ही एकमेकांच्या खोलीत कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकता. कुटुंबासमोर मात्र संकोच संभवतो. खेळाडूचे लक्ष पूर्णपणे खेळावर केंद्रित ठेवण्यासाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो. जगातील अनेक मोठे संघ मोठ्या स्पर्धा किंवा सामन्यांपूर्वी असे निर्णय घेतात.

विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नगाठ बांधल्यापासून, क्रिकेटपटू पतींसोबत नियमितपणे परदेश दौ-यावर जाताना दिसतात. अनुष्का शर्मासह रितिका सजदेह, आयशा मुखर्जी आणि इतर स्टार पत्नी खेळाडूंसोबत अनेकदा दौ-यावर गेल्या होत्या. कोहलीची पत्नी अनुष्का संपूर्ण दौ-यात संघासोबत फिरताना दिसल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीची सोशल मीडियावर टीकाही झाली. यामुळे खेळाडूंची सपोर्ट सिस्टीम मजबूत होते की विचलित होते हा वादाचा विषय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ चालत आलाय.

ऑस्ट्रेलिया दौ-यात भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये १-३ असा मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधलं स्थानही भारतानं गमावलं. याआधीही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संघ अपयशी ठरला होता. या पराभवानंतर बीसीसीआयनं कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय.

बीसीसीआयच्या या निर्णयाला समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन्ही गट आहेत. समर्थन करणा-यांना वाटतं की कुटुंबीय दूर राहिल्यामुळे खेळाडूंचं लक्ष फक्त खेळावर केंद्रित होईल. तर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पराभवाचं खरं कारण खेळाडूंची खराब कामगिरी आहे, कुटुंबीय नाहीत. खेळाडूंना वर्षातील ३०० दिवस क्रिकेट खेळावं लागतं. अशावेळी कुटुंबासोबत वेळ घालवणंही गरजेचं आहे. तर काही तज्ज्ञांना वाटतं की, कुटुंबीय दूर राहिल्यास खेळाडूंचं लक्ष फक्त खेळावर केंद्रित होईल. संघ एकत्रित वेळ घालवून खेळ सुधारू शकेल.

बीसीसीआयचा हा निर्णय योग्य आहे का? खेळाडूंनी कुटुंबासोबत वेळ घालवणं त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या चांगलं आहे, पण यामुळे संघाची कामगिरी खरंच प्रभावित होते का? बीसीसीआयच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय संघावर काय होईल, या निर्णयामुळं भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा होते का, आणि आगामी मालिकांमध्ये संघ कशी कामगिरी करतो, हे येणा-या सामन्यांमध्ये कळेल. तुमचं यावर काय मत आहे? बीसीसीआयने योग्य पाऊल उचललंय, की खेळाडूंवर अवास्तव दबाव टाकलाय? आम्हाला तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत, टीम इंडियाला शुभेच्छा!

Comments
Add Comment