Monday, May 5, 2025

देशताज्या घडामोडी

गुजरातमध्ये बोगस ईडी पथकाला अटक

गुजरातमध्ये बोगस ईडी पथकाला अटक

आरोपींमध्ये महिलेसह 12 जणांचा समावेश

गांधीधाम: गुजरातमध्ये बनवाट न्यायालय आणि न्यायाधीशांनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) बोगस पथक आढळून आले आहे. कच्छ इथल्या गांधीधाममध्ये पोलिसांनी ईडीच्या बनावट पथकाचा भंडाफोड केला आहे. यामध्ये एका महिलेसह 12 आरोपींचा समावेश असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील सर्व आरोपी ईडीचे बनावट अधिकारी असल्याचे भासवत बड्या उद्योगपतींवर छापे टाकण्याची योजना आखत होते. छापे टाकून धमकावून व्यावसायिकांकडून लाखो रुपये उकळण्याचे काम ही टोळी करीत होती. आरोपींनी नुकतेच ईडीचे अधिकारी असल्याचे दाखवून एका ज्वेलर्स फर्मवर छापा टाकला होता. या बनावट कारवाईदरम्यान हे लोक 25 लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन बेपत्ता झाले होते.

छापेमारीनंतर व्यावसायिकाला हे बनावट ईडी अधिकारी असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्याही लक्ष ठेवले जात होते. आरोपींना पकडण्यासाठी गुप्तहेर कामाला लावण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बनावट ईडी टोळीचा पत्ता लागला. मात्र, एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांचे सोने आणि गाड्या जप्त केल्या आहेत.

Comments
Add Comment