
- कथा : रमेश तांबे
राजने तोंडाने हवा भरून फुगा फुगवला. त्याला दोरा बांधला आणि आकाशाच्या दिशेने उडवू लागला. पण काही केल्याने त्याचा फुगा आकाशात जाईना. त्याला वाटले हा फुगा काळ्या रंगाचा आहे म्हणून तो आकाशात जात नाही. राजने वेगवेगळ्या रंगांचे सर्व फुगे फुगवून बघितले. पण त्याचा एकही फुगा आकाशात जाईना.
एका शाळेबाहेर एक फुगेवाला फुग्याची गाडी घेऊन नेहमी उभा असायचा. आकाशात जाण्यासाठी धडपडणारे ते रंगीबेरंगी फुगे लहान मुलांना आकर्षित करायचे. तो येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना फुगा घेण्यासाठी गाणं गात बोलवायचा. वेडंवाकडं नाचत, गाणं म्हणत मुलांना हसवायचा. मग मुलं फुगे विकत घ्यायची. त्यामुळे फुगेवाल्याचा धंदा अगदी तेजीत चालला होता.
एके दिवशी राज नावाचा एक चुणचुणीत मुलगा फुगेवाल्याची सारी गंमत बघत उभा होता. फुगेवाला एक फुगा वीस रुपयाला विकत होता. राजला वीस रुपये किंमत जरा जास्तच वाटत होती. मग त्याने विचार केला, त्यापेक्षा दुकानातून आपण दहा रुपयांचे फुगे विकत घेऊ आणि फुगवून त्यांना आकाशात सोडू. ही कल्पना डोक्यात येताच राज दुकानाच्या दिशेने पळाला. त्याने दहा रुपयांचे पाच फुग्यांचे पाकीट घेतले आणि तडक घरी गेला.
राजने घरात बसून तोंडाने हवा भरून फुगा फुगवला. त्याला दोरा बांधला आणि आकाशाच्या दिशेने उडवू लागला. पण काही केल्याने त्याचा फुगा आकाशात जाईना. त्याला वाटले हा फुगा काळ्या रंगाचा आहे म्हणून तो आकाशात जात नाही. मग त्याने लाल रंगाचा फुगा फुगवला. पण तोही सारखा जमिनीवरच लोळण घेत होता. आता राजने वेगवेगळ्या रंगांचे सर्व फुगे फुगवून बघितले. फुग्यात तोंडाने हवा भरता भरता तो अगदी दमून गेला. पण त्याचा एकही फुगा आकाशात जाईना. आता मात्र तो हिरमुसला.
मग राज परत फुगेवाल्याकडे गेला आणि म्हणाला, “काका मीसुद्धा तुमच्यासारखेच फुगे फुगवले. पण ते आकाशात जातच नाहीत. सगळे जमिनीवरच राहतात. तुमचे फुगे कसे काय आकाशात वर वर जातात?” मुलाचा प्रश्न ऐकून फुगेवाला हसत हसत म्हणाला, “अरे मुला मी फुग्यात या टाकीतला वायू (गॅस) भरतो म्हणून तो फुगा आकाशात वर जातो बरं का!” “पण काका तुमच्या टाकीतला वायू (गॅस) भरल्यावरच फुगा आकाशात का जातो?” राजच्या या प्रश्नाचे उत्तर मात्र त्या फुगेवाल्याकडे नव्हते.
या दोघांचे बोलणे एक काका दूर उभे राहून ऐकत होते. जेव्हा फुगेवाला राजच्या प्रश्नापुढे गप्प बसला, तेव्हा ते काका राजच्या जवळ आले आणि म्हणाले, “हे बघ बाळा, तुझं वजन किती आहे सांग मला?” राज म्हणाला, “पंचवीस किलो.” मग ते काका पुढे बोलू लागले, “हे बघ बाळा, जसं तुझ्या शरीराला वजन आहे, तसंच इथं प्रत्येक वस्तूलादेखील वजन हे असतेच. अगदी पाणी आणि हवेलादेखील! आता एक गोष्ट लक्षात घे की, जर फुग्यात हवेच्या वजनापेक्षा कमी वजनाचा वायू म्हणजेच गॅस भरला, तर फुगा हलका होऊन तो आकाशाकडे झेपावतो. पण जर फुग्यात हवा भरलीस, तर मग हवेचे आणि फुग्याचे वजन सारखेच भरेल मग तो फुगा आकाशात कसा जाणार?” हे ऐकून राजच्या डोक्यात प्रकाश पडला आणि पुटपुटला, “अरेच्चा हे असे आहे तर!” राज पुढे म्हणाला, “मग काका मला सांगा हवेपेक्षा हलके वायू कोणते कोणते आहेत?” काका म्हणाले, हे बघ हेलियम, हायड्रोजन आणि नायट्रोजन हे वायू (गॅस) हवेपेक्षा हलके आहेत बरे. यातील हायड्रोजन हा वायू चटकन पेट घेतो. त्यापासून आपणास धोका संभवतो. म्हणून हायड्रोजन हा वायू फुग्यामध्ये भरत नाहीत.
आता आपण नायट्रोजनविषयी विचार करू. आपल्या हवेतसुद्धा ७८ टक्के इतका नायट्रोजन असतो. त्यामुळे फुग्यात हवा भरली काय अन् नायट्रोजन भरला काय फुग्याच्या वजनात विशेष फरक पडत नाही. त्यामुळे तो फुगा आकाशात जात नाही. हं जर गरम नायट्रोजन आपण फुग्यात भरला, तर मात्र फुगा हलका होऊन तो नक्कीच आकाशात जाईल. आता राहिला हेलियम वायू. हा हवेपेक्षा हलका तर आहेच, शिवाय तो पेट घेत नसल्याने वापरण्यासही सुरक्षित आहे. म्हणून या फुगेवाल्याच्या टाकीत हेलियम वायू भरला आहे बरं!”
मग त्या काकांनी एक फुगा विकत घेऊन राजला भेट दिला. राजने तो फुगा मोठ्या आनंदाने आकाशात सोडून दिला अन् टाळ्या पिटत ओरडला, “हेलियम... हेलियम” आज या अनोळखी काकांमुळे राजला नवीनच माहिती मिळाली होती. त्यामुळे राज खूपच खूश होता.