माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा गौप्यस्फोट
December 10, 2021 06:13 PM
मुंबई :भारताचा संघ प्रशिक्षक बनू नये, अशी बीसीसीआयमधील काही लोकांची इच्छा होती, असा गौप्यस्फोट माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.
बीसीसीआयमध्ये काही लोक उपस्थित होते, ज्यांना मला हेड कोच बनवायचे नव्हते. २०१४मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेडकसोटीदरम्यान महेंद्रसिंग धोनीच्या जागी विराट कर्णधार झाला. बदल होण्याआधीच मला अचानक बाहेर काढण्यात आले. या निर्णयामुळे मला दु:ख झाले आहे, कारण मला ज्या पद्धतीने हटवण्यात आले ते योग्य नव्हते. जवळपास ९ महिने उलटले आणि हीच मंडळी माझ्याकडे पुन्हा आली. संघात समस्या असल्याचे मला सांगण्यात आले. समस्या काय आहे, हे मला समजत नव्हते, असे शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले.
भरत अरुण यांना मी गोलंदाजी प्रशिक्षक करू नये अशीही या लोकांची इच्छा होती. मी मागे वळून पाहतो तेव्हा ही परिस्थिती कशी बदलली हे मला जाणवते. त्यांना जी व्यक्ती गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नको होती, त्याने दमदार कामगिरी केली. आता त्यांच्या कामावर कुणालाही बोट दाखवता येत नाही. पण, काही खास व्यक्ती होत्या. त्यांनी मी हेड कोच बनू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले, असेही शास्त्री पुढे म्हणाले.
२०१७मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती झाली.
शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने ४३ कसोटी सामने खेळताना २५ जिंकले आणि १३ गमावले. ५ सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने ७९ सामने खेळले ज्यात ५३ जिंकले. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने ६८ सामने खेळताना ४४ सामन्यांत विजय मिळवला.
Comments
संबंधित बातम्या
आणखी वाचा >