Saturday, June 1, 2024
Homeमहत्वाची बातमीलळा लावणारी शाळा

लळा लावणारी शाळा

डॉ. वीणा सानेकर

मराठी अभ्यास केंद्र या संस्थेने नुकतेच दोन प्रयोगशील शिक्षकांना पुरस्कार दिले. सुषमा पाध्ये आणि दीपा पळशीकर. दोघीही गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता अखंड परिश्रम करणाऱ्या! सुषमा पाध्ये ऐना दाभोण परिसरात आदिवासी मुलांच्या शिक्षणाकरिता धडपडते आहे. रमेश पानसे यांच्या ग्राममंगल या संस्थेशी जोडली गेलेली सुषमा अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांचा वारसा चालवते आहे.

मराठीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली सुषमा कार्यशाळा, कल्पक उपक्रम, नावीन्यपूर्ण शैक्षणिक साधने, अभ्यासवर्ग यात सतत रमलेली असते.

विविध शिक्षणतज्ज्ञांचे विचार सुषमाने मराठीत आणायचा प्रयत्न केला. इंग्रजीतील ज्ञान मायभाषेत आणून ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याची तिची ही कामगिरी निश्चित महत्त्वाची म्हटली पाहिजे. आदिवासी मुलांकरिता इंग्रजी शाळा सुरू करून त्यांच्याकरिता प्रगतीची दारे धाडधाड उघडण्याचा आव अधून-मधून सत्तेवरचे लोक करतात तेव्हा काय बोलावे असा प्रश्न पडतो. मुळात आदिवासी मुलांना प्रमाण मराठी देखील परकी वाटते. अशा वेळी येणारी आव्हाने स्वीकारून सुषमासारखी कार्यकर्ती नवनवे प्रयोग करते.

मध्यंतरी अशाच एका प्रयोगशील शिक्षकाने आगळा-वेगळा प्रयोग केल्याचे स्मरते. प्रमाण मराठीतील विविध कविता त्यांनी मुलांना त्यांच्या-त्यांच्या बोलीत अनुवादित करायला सांगितल्या. कवितांबद्दल प्रेम निर्माण करायचा हा किती सुंदर प्रयत्न!

नाशिकमधील ‘आनंद निकेतन’ ही मराठी माध्यमाची शाळा. ही शाळा पाहण्याचा योग आला अरुण ठाकूर सरांमुळे. २००९ च्या आसपास मराठी शाळांच्या मान्यतांच्या प्रश्नासंबंधाने मोठा लढा उभा राहिला. या दरम्यान महाराष्ट्रभरातील मराठी शाळांच्या चळवळीतले कार्यकर्ते, संस्थाचालक, शिक्षक एकमेकांशी जोडले गेले. शासकीय अनुदान नाकारून आदर्श मराठी शाळा उभी करणे, चालवणे, टिकवून मोठी करणे हे सोपे नाही. पण अरुण ठाकूर, विनोदिनी काळगी, दीपा पळशीकर अशा ध्येयवेड्या माणसांनी हे करून दाखवले. अरुण ठाकूर आज जगात नाहीत, पण त्यांची आनंद निकेतन मोठ्या गौरवाने सरांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगते.

मला सरांचा एक लेख आठवतोय. या लेखात ‘भंपक प्रतिष्ठेची ढापणं काढा’ असा खणखणीत इशारा सरांनी पालकांना दिला होता. आजही तो किती खरा आहे. इंग्रजीच्या भूलभुलैयाला भुलून पालकांनी मुलांना रेसचे घोडे बनवले आहे.

तर आनंद निकेतनच्या वाटचालीतले आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे दीपा पळशीकर. संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला आर्थिक लाभाच्या कितीतरी संधी सहजच उपलब्ध होतात. पण दीपाताईंनी आनंदी शिक्षणाची वाट घडवली. आनंद निकेतनमध्ये भाषेचा मळा फुलवला. विज्ञानविषयक कितीतरी माहिती मराठीतून आणली. सोप्या भाषेत हलकं फुलकं विज्ञान आणून मुलांच्या मनात विज्ञानाविषयी गोडी निर्माण केली.

भाषेचे खेळ, कविता रचणे, छंद व लयीच्या अंगाने कवितांची निर्मिती, नाटुकली बसवणे यातून मुलांच्या मनात दीपाताईंनी मराठीची आवड रुजवली. वर्गाच्या चौकटीपलीकडे जाऊन मुलांमध्ये नवीन काही रुजवण्याची ताकद सुषमा, दीपाताई यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षकांमध्ये असते. अनेक शिक्षक असे धाडसी प्रयोग करत नाहीत, उलट ते स्वत:च काहीतरी रेडिमेड आणि आयते शोधत असतात. जे शिक्षक स्वत: शोध घेत नाहीत ते मुलांना कसे काय शोध घ्यायला शिकवणार?

मग केवळ मार्कांचे हिशेब घालणारे विद्यार्थी घडतात. सृजन, नवनिर्मिती, संशोधन यापासून दूर जाणारे विद्यार्थी का तयार होतात, हा कळीचा मुद्दा आहे. खरे तर शाळा म्हणजे मुले घडवणारा कारखाना नव्हे. प्रत्येक मूल हे वेगळे असते ही जाणीव शाळेने जपली पाहिजे. लाखभर रुपये प्रत्येकवर्षी उकळणारी इंग्रजी शाळा अशी जाणीव जपते, असे सरसकट समजणारे पालक केव्हा जागे होणार?

हा लेख लिहीत असताना माझ्या मनात बालपणीचे गाणे रुंजी घालते आहे. ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा’ मायभाषेतील अशा शाळेपासून आपल्या मुलांना तोडू नका, हीच सकल पालकांना विनंती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -