Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBook Exchange: वाचकांची बदलती अभिरुची जपणारा आदान-प्रदान सोहळा

Book Exchange: वाचकांची बदलती अभिरुची जपणारा आदान-प्रदान सोहळा

  • विशेष: वैशाली गायकवाड

व्यास क्रिएशन्स आणि राज्ञी वुमन वेल्फेअर असो. यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग मंदिर ठाणे येथे नुकताच तीनदिवसीय भव्य असा पुस्तक आदान-प्रदान सोहळा पार पडला. यात नागरिकांनी दर्जेदार पुस्तकांचे भरभरून दान केले.

माणसांप्रमाणे पुस्तकांशी देखील मैत्रीरता आली पाहिजे. पुस्तकी ज्ञान आणि अनुभव याची सांगड घालता आली पाहिजे. आजूबाजूची माणसं, आपला समाज, देश वाचता आला पाहिजे. हे ज्याला जमलं तो माणूस जगण्यास लायक. खऱ्या अर्थाने सर्व उपलब्ध साहित्याचे मूळ हे साक्षात महर्षी व्यास आहेत. महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की, त्यानंतर वेगळे काही उरलेच नाही, हे सांगणारी ‘व्यासोच्छिष्टं जगत्सवेम्’ ही उक्ती प्रसिद्ध आहे. या उक्तीप्रमाणेच निर्माण होणारे साहित्य म्हणजे ‘श्रीरामाच्या चरणी शबरीने उष्टवून अर्पण केलेल्या बोरांप्रमाणे आहे.’ लेखक, वाचक, प्रकाशक यांची सांगड घालून त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा, लिखित साहित्य जपण्याचा हाच वारसा व्यास क्रिएशन्स अखंडपणे पुढे चालवत आहे.

व्यास क्रिएशन्स आणि राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग मंदिर ठाणे येथे नुकताच तीनदिवसीय भव्य असा पुस्तक आदान-प्रदान सोहळा पार पडला. वृक्षदिंडी आणि पुस्तक दिंडी अशा अनोख्या संकल्पनेने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. विशेष बाब म्हणजे ज्या ताई वृक्षांची राखण करतात, त्यांना खतपाणी घालतात, त्या ताईंचा सन्मान करून दिंडीची वाटचाल सुरू झाली.

झाडाचे आणि आपुले जन्मोजन्मीचे नाते।
ज्ञानरूपी पुस्तकातून ते आपल्या जाणिवेत जिवंत राहते।।

झाडांमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो, प्राणवायूमुळे आपण जिवंत राहतो. झाडांपासून पुस्तके बनतात, या पुस्तकरूपी प्राणवायूमुळे आपल्याला ज्ञान मिळतं. यातून लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे घडतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकी जिवंत राहते. म्हणून आयुष्यात एक तरी झाड लावा आणि रोज पुस्तके वाचा.

‘पुस्तकांचे वृक्षाशी असलेले नाते’ या आनुषंगाने वृक्ष संवर्धनाचा संदेश देत आदान-प्रदान महोत्सव सुरू झाला. या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रंथ संग्रहक, लेखक, ग्रंथ सखा या नावाने वाचनालय प्रसिद्ध असणारे माननीय श्याम जोशी यांच्या हस्ते झाले. या तीन दिवसांमधल्या एकूण पाच सत्रांमध्ये ४१ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनात अभिनव आणि वेगवेगळ्या संकल्पना वापरून पुस्तक वाचनासाठी प्रेरणादायक वातावरण निर्माण करण्यात आले. ४१ पुस्तकांपैकी ३६ पुस्तके ही बालसाहित्यावर आधारित असल्याने त्या पुस्तकांच्या प्रकाशनाची एक भन्नाट संकल्पना सगळ्यांना खूपच भावली. वडाचे झाड तयार करून त्या झाडावर जणू बालसाहित्य बहरले आहे. अशी थीम करण्यात आली होती हे विशेष. २८००० पुस्तकांचे आदान-प्रदान झाले. या वर्षीच्या आदान-प्रदान महोत्सवात वय वर्षे ५ पासून ते वय वर्षे ९३ पर्यंतच्या सर्व अाबालवृद्धांनी पुस्तकाचे व त्या आनुषंगाने विचारांचे आदान-प्रदान केले. विशेष निरीक्षण म्हणजे ४० टक्के इंग्रजी पुस्तकांचे आदान-प्रदान झाले. त्यामध्ये तरुणाईचा वाटा मोठ्या प्रमाणात होता, यावेळी पुस्तकांचा आणि पन्नास वर्षे जुन्या असलेल्या झाडाची किंमत किती असते याचे एक विश्लेषण करणारा अनोखा सेल्फी पॉइंटही तयार करण्यात आला होता.

आपापल्या मनोगतातून अनेक लेखक, कवी, समीक्षक, कलावंत आणि ग्रंथप्रेमींनी पुस्तकं लिहिण्याचा प्रवास, अनुभूती, त्यामागची भूमिका, संकल्पना या विषयीचे आपले मौलिक विचार मांडले. खऱ्या अर्थाने विचारांचे आदान-प्रदान झाले. पहिल्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रवीण दवणे म्हणाले, “नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी त्यासाठी हा आदान-प्रदान हा एक संस्कार आहे.” यावेळी ग्रंथप्रेमी डॉ. श्रीधर ठाकूर, लेखिका हर्षदा बोरकर हे उपस्थित होते. गणेश वंदन व बालनाटिकेनंतर ज्येष्ठ लेखिका, समाजसेविका रेणुताई दांडेकर यांच्या ११ पुस्तकांचे तसेच दीपा जोशी, रश्मी जोशी यांच्याही प्रत्येकी एक एक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे ख्यातनाम शास्त्रीय गायिका पद्मविभूषण प्रभा अत्रे यांची लाभलेली उपस्थिती. त्या म्हणाल्या, “माझं सारं जीवन हे संगीताभोवती फिरते, संगीताने मला माणसं दिली, शाश्वत ज्ञान दिले. मुलांवर चांगले संस्कार होतील या दृष्टीने बाल वाङ्मय तयार झाले पाहिजे.” त्यांच्या हस्ते इंदिरा अत्रे, मधुकर लेले, भारती मेहता यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखक

प्रा. अशोक चिटणीस, श्रीराम बोरकर आणि डॉ. अनंत देशमुख उपस्थित होते. दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन चांगलेच रंगले, बहरले. यामध्ये १६ कवींना सहभाग घेऊन आपल्या काव्याप्रतिभेचा आनंद उपस्थित रसिकांना दिला, तर संध्याकाळच्या सत्रात सदानंद राणे, शिबानी जोशी, सुमन नवलकर आणि प्रियंवदा करंडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन पद्मा हुशिंग आणि लेखक, नाटककार अभिराम भडकमकर यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, “एखादी संध्याकाळ एन्जॉय करण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो; परंतु आयुष्याची संध्याकाळ संस्मरणीय करायची असेल, तर पुस्तक खरेदीला पर्याय नाही.”

शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात रसिका मेंगळे, कल्पना मलये आणि रमेश सावंत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, अभिनेत्री संध्या म्हात्रे, लेखिका मेघना साने, डॉ. विजया पंडितराव, कथाकार किरण येले आणि कवयित्री, समीक्षक प्रतिभा सराफ यांचे हस्ते झाले. दुपारच्या सत्रात ‘पुस्तकवल्ली हा अभिवाचनाचा आगळावेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला, तर संध्याकाळच्या सत्रात कवी, चित्रकार रामदास खरे, अनुसूया कुंभार, लीला शहा, एकनाथ आव्हाड आणि मेधा रानडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन लेखक, समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ कवी डॉ.
र. म. शेजवलकर आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक, संगीत नाटक अकादमी विजेते कुमार सोहनी यांचे हस्ते झाले. या तीनही दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय नेटके आणि खुमासदारपणे करणाऱ्या धनश्री प्रधान-दामले यांचा विशेष उल्लेख करावाच लागेल. व्यासचे संचालक नीलेश गायकवाड यांनी पुढील वर्षीच्या पुस्तक आदान-प्रदान महोत्सवाची घोषणा करून संपूर्ण तीनदिवसीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या समस्त वाचक रसिकांचे, ग्रंथप्रेमींचे, मान्यवरांचे आभार मानले.

कोरोना काळात ऑनलाइन, किंडल, स्टोरी टेल अशा अॅपची सवय झालेली असताना देखील या वर्षीच्या महोत्सवात हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाच असतो, तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. सगळ्या वाचकांचा पुस्तकांना लाभलेला स्पर्श वाचकांचा सहवास पुस्तकांना नवसंजीवन देणार होता. वाचकांच्या कुतूहल नजरा पुस्तकांवरून फिरत असताना त्या पुस्तकांनासुद्धा वाचकांच्या प्रेमात पडावसं वाटत असेल, हीच तर असते खऱ्या मैत्रीची सुरुवात, रुजवात ती ज्या वास्तूत सुरू होते, त्या वास्तूसारखी पवित्र वास्तू या जगात नाही.

पुस्तकांशी असलेलं नातं वृद्ध्रिंगत करणारा महोत्सव, वाचक, लेखक, प्रकाशक या नात्यांतील गुंफण घट्ट करणारा महोत्सव अशा अभिप्रायांनी रसिकांनी उत्तम दाद देत महोत्सवाला भरभरून हजेरी लावली. आपण कायमच हल्लीच्या मुलांना बोलत असतो की, अवांतर वाचन केलं पाहिजे. सेल्फ स्टडी केला पाहिजे. महोत्सवाला आल्यानंतर सेल्फी पॉइंटवर फक्त सेल्फी न काढता एक वेगळा सेल्फ रिसर्च किंवा अवांतर वाचनाचा सेल्फ स्टडी दिसून आला, आपल्याला नेमकं कोणतं पुस्तक हवे आहे. आता आपल्याला काय वाचायचं आहे. याबद्दलच्या चर्चा तिथे रंगू लागल्या, पुस्तकांच्या गोष्टी आणि गोष्टींची पुस्तकं अशी वेगळीच समीकरणं तिथे जुळू लागली. आत्ताची पिढी गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टा, ट्विटर, टेलिग्राम अशा अनेक डिजिटल माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असते; परंतु पुस्तकरूपी ज्ञान हे खऱ्या अर्थाने संवाद साधायला शिकवते. याचे अनुभव मुलांना, पालकांना, आजी-आजोबांना तिथे घेता आले.

इंग्रजी पुस्तकांबरोबरच मराठीतील जुने साहित्यिक, कवी यांच्या पुस्तकांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशी दुर्मीळ पुस्तके वाचकांना इथे मिळाल्यानंतर वाचकांचा चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला इथे टिपता आला. शेवटी जुनं ते सोनं हे म्हणणं खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्यासारखे वाटतेय. या वर्षीच्या महोत्सवात जास्तीत जास्त जुने लेखक, जुने कवी यांचे साहित्य शोधण्यासाठी वाचकप्रेमी महोत्सवात आलेले दिसले आणि जुन्या लेखकांच्या पुस्तकांची मागणी केल्याचे आढळले. उदाहरणार्थ
व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर इत्यादी.

ई-बुकच्या जमान्यात पुस्तकांचे काय होणार आणि इतर अनेक बाबींवर चर्चा किंवा चिंता साहित्यिक प्रकाशक यांच्यात होत असतात. मात्र या सगळ्या गोष्टींना विराम देणारा आदान-प्रदान महोत्सव ठाण्यात सलग सहा वर्षे पार पडत आहे. यंदाच्या महोत्सवात वाचकांच्या हजेरीच्या वाढत्या आकड्यामुळे ई-बुकच्या जमान्यात वाचकांचे पुस्तकांवरचे प्रेम अबाधित असल्याचे दिसून आले. या महोत्सवात नागरिकांनी दर्जेदार पुस्तकांचे भरभरून दान केले. आपले वाचून झालेले पुस्तक हे रद्दीत टाकून न देता साहित्यप्रेमींनी या महोत्सवातून दान केल्याने ठाणेकर नागरिकांची साहित्याविषयी असलेली आस्था आणि प्रेम दिसून आले. म्हणूनच म्हणावेसे वाटते,

‘पुंडलिका भेटी पुस्तक ब्रह्म आले,
आनंदाचे आदान-प्रदान झाले”

(कार्यकारी संचालक, राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशन)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -