Friday, May 17, 2024
Homeरविवार विशेषपिंगुळीचे आदिवासी कलाग्राम

पिंगुळीचे आदिवासी कलाग्राम

आपली संस्कृती जतन करण्याची जबाबदारी त्या त्या भाषक समाजाची असते. चित्रे, साहित्य, गीते, नाणी, वस्तू अशा विविध गोष्टींच्या आधारे तिची ओळख जपून ठेवता येते. कोकणातील लोककला संवर्धन अकादमीच्या कलावंतांना भेटण्याचा योग नुकताच सोमय्या संकुलात आयोजित रामायणावरील परिषदेत आला. हे कलावंत आदिवासी ठाकर! शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर म्हणून ते काम करत. वेगवेगळ्या मंदिरांमधून ते कला सादर करत. गुप्तहेरी करत असताना ते दोन प्रकारच्या भाषा वापरत. एक खुणांची भाषा व दुसरी बोली भाषा. ही भाषा कोकणातील मालवणी बोलीपेक्षा वेगळी आहे व ती ‘खिवारी’ भाषा म्हणून ओळखली जाते.

सावंतवाडीच्या ‘खेम’ राजांनी या कलावंतांना आश्रय दिला होता. नवरात्रात हे कलावंत कार्यक्रम करायचे. समाजाच्या मनोरंजनाची व प्रबोधनाची जबाबदारी त्यांच्या खेळांधून पार पाडायचे. ‘नोकरी करायची देवाची आणि भाकरी तुमची’ अशी साद ते समाजाला घालायचे. या आदिवासी ठाकर कलावंतांना काळाच्या एका टप्प्यावर जातिभेदाचा अन्याय व गरिबीचे तीव्र चटके सोसावे लागले. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील ते पूर्वापार संस्कृतीचे जतन करत राहिले. चित्रकथी, कळबाहुली, कळसूत्री बाहुली, चामड्याच्या बाहुल्या असे विविध कलाप्रकार या कलावंतांनी जपले आहेत.

कळसूत्री बाहुल्या साधारण दीड फूट उंचीच्या असतात. काही भाग लाकडाचा, काही भाग घोळदार कपड्याचा असतो. ३ सूत्रांसह या बाहुल्यांद्वारा रामायण, महाभारतातील कथानके सादर केली जातात. चित्रकथी ही अजून एक कला. आदिवासी ठाकर या कलेला पोथी म्हणतात. दसरा व नवरात्राच्या दिवसांमध्ये ही कला देवळांमध्ये दाखवली जाते. ६० किंवा १२० चित्रांच्या आधारे कथा दाखवली जाते.

चामड्यांच्या बाहुल्यांच्या सहाय्याने देखील खेळ दाखवले जातात. खरे तर महाराष्ट्रातली ही कला अतिप्राचीन आहे. अन्य ठिकाणी या कलेपासून प्रेरणा घेऊन लोककलावंतांनी या कलेत भर घातली. हातबाहुली हा अजून एक प्रकार. पूर्वी घरोघर फिरून ठाकर कलावंत लोकांचे मनोरंजन करत. पारंपरिक पद्धतीने हा कलाप्रकार सादर करणारी ठाकर ही एकमेव जमात आहे.

नुकताच भेटलेला कृष्णा मसगे हा तरुण कलावंत म्हणतो की, आमच्या जवळपास सहा पिढ्या हे काम करीत आहेत. कृष्णा हा गणपत सखाराम मसगे यांचा मुलगा. २००५ साली गणपत मसगे यांना त्यांच्या कलासंवर्धन कार्याकरिता राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. कलासंवर्धनाचा ध्यास घेणाऱ्या या कलावंताची नोंद महाराष्ट्राआधी दिल्लीने घेतली. गणपत मसगे यांचे फार मोठे काम म्हणजे त्यांनी उभारलेले ठाकरवाडी कलाग्राम! २००८ मध्ये त्यांनी या दालनाची उभारणी केली. सुरुवातीची काही वर्षे हे दालन नावारूपाला आणता आले नाही; परंतु हळूहळू त्यास नवसंजीवनी प्राप्त होत आहे. हे कलाग्राम कुडाळमधील पिंगुळी गावात वसले आहे. हा परिसर शीतल व निसर्गरम्य आहे. भिंतीवरची चित्रे व काळ्या दगडावरील संदेश ठाकर आदिवासींचा इतिहास सांगतात. ६०० वर्षे जुनी चित्रकथी, ९०० पेक्षा जास्त जुनी नाणी, आदिवासी लोकजीवनातील वस्तू या लोकग्रामात पाहता येतात. राजकीय संदर्भातून प्राप्त आर्थिक सहकार्याविना असे काम उभे करणे कठीण आहे. त्याकरिता गणपत मसगे यांचा महाराष्ट्र ऋणी आहे.

लोककलावंतांच्या ज्ञानाचा अनेकदा वापर करून घेतला जातो. मात्र त्यांच्या करता आर्थिक पाठबळाचा विचार किती केला जातो? शासनाने तो प्रथमत: करायला हवा आणि त्याचबरोबरीने समाजानेही सोबत उभे रहायला हवे. हे दोन्ही आपल्याकडे घडते का? गणपत मसगे यांची पुढली पिढी आदिवासी ठाकर कला जपते आहे. पौराणिक नि पारंपरिक कथानकांच्या पलीकडे जाऊन स्वच्छता अभियान, बेटी बचाओ अशा नव्या विषयांवर काम करते आहे. कृष्णा मसगे व दायती अकादमीने आता वीर सावरकरांची जीवनकथा निवडली आहे. पुढल्या पिढीने हा कलेचा वसा जपणे ही फार मोठी गोष्ट आहे. समाजानेही या उपक्रमासोबत राहायचे, तर आवर्जून कुडाळ येथील पिंगुळीच्या ठाकरवाडी कलाग्रामाला भेट द्यायलाच हवी.

-डॉ. वीणा सानेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -