Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यCrisis : संकटे निसर्गनिर्मित की मानवनिर्मित?

Crisis : संकटे निसर्गनिर्मित की मानवनिर्मित?

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘नेमेचि येतो’ म्हणत धो धो पाऊस पडला. अगदी चार महिने धो धो बरसत असतो. मात्र एका ठरावीक कालावधीत तो इतका पडतो की, सर्व काही ठप्प होते, आता हे इतके अंगवळणी पडले आहे. खूप हाल झाले नाहीत, सारे काही ठप्प झाले नाही, काही अघटित काही घडले नाही, पाऊसच पडला नाही किंवा पाऊस कमी पडला, अशी आपण मनाची समजूत घालतो. पाऊस हा मनाला आनंद देणारा, सुखाच्या आनंदमयी सरी शिंपडणारा वाटला पाहिजे. मात्र तो आनंददायी न वाटता त्या वर्षी आपल्या वाट्याला आलेले कटू व भीतीदायक अनुभव व त्यातून आपण कसा मार्ग काढला, याचे गुणगान करत परत पुढल्या वर्षी येणाऱ्या पावसाची वाट बघतो. इतके आपले मन आता कोरडे झाले आहे! आपल्याला आता कशाचे काहीच वाटेनासे झाले, असे वाटू लागले आहे काय? पाऊस या सगळ्यांचा जगण्याचा एक अविभाज्य भागच आहे. मात्र पावसाळ्यात आपल्या आजूबाजूच्या घटना बघितल्या, तर पावसाचा आनंद वाटण्यापेक्षा त्याची भीती जास्त वाटू लागते, अशी आजची परिस्थीती आहे. त्यात आज माहिती तंत्रज्ञान क्रांती, मोबाइल क्रांतीनंतर जी गोष्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी कळत होती, ती त्याच क्षणी चटकन कळते व दिसते सुद्धा. पावसाळ्यात तर पाण्यात वाहून जाणे, धबधब्याखाली, समुद्रकिनारी लाटांमध्ये फसणे, गटार, नाल्यात पडणे, झाड किंवा फांदी अंगावर पडणे अशा गोष्टी हमखास घडत असतात. मात्र आता डोंगर कड्याखाली गावच्या गाव गाडली जाणे अशा भयानक गोष्टी घडू लागल्या आहेत. यापैकी काही गोष्टी टाळणे जरी आपल्या हातात नसले, त्या निसर्गकोपामुळे घडलेल्या असल्या तरी काही गोष्टी मात्र टाळणे आपल्या हाती होते, असा विचार केल्यास जाणवू लागेल.

मानवाच्या हव्यासापोटी निसर्गाची मोठी हानी करून स्वतःच्या ऱ्हासाला स्वतःच कारणीभूत ठरलो आहोत, हे आपल्याला एव्हाना कळून चुकले आहे. आता वेळही टळून गेली आहे. निसर्गावर घाव घातला, तर निसर्गही आपल्याला तोडीस तोड उत्तर देत आहे. तरीही आपण एवढे ढिम्म का? दरवर्षी आपण कधी ना कधी पावसात अडकतो, रेल्वे बंद होतात, रस्त्यावर पाणी असते, रस्ते बंद होतात, सर्व काही ठप्प होऊन जाते. मग असा प्रश्न पडतो की, यात निसर्गाला दोष द्यायचा की मानवनिर्मित चुकांना? पाऊस किती पडावा हे जरी आपल्या हातात नसले तरी नाले, गटारी व्यवस्थित साफ झाले की नाही, की नेहमी थातुरमातूर पद्धतीने कामे केली जातात का? मग यात दोष कोणाचा? मुंबईचा विचार व आकारमान पाहता मुंबई ही एकेकाळी फक्त बेटांची होती. आजही तीन्ही बाजूला पाणीच पाणी आहे. बशीचा आकार वगैरे वगैरे… आपण अशी कारणे किती वेळा पुढे करणार आहोत? काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान आले, तंत्रज्ञानाचा वापर आपण करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार की नाही? मिठी नदीला २६ जुलै रोजी पूर आला होता. त्या नदीने आपले अक्राळविक्राळ रूप दाखवून मुंबईतील आपल्या अस्तित्वाची जाणीन करून दिली होती. मिठी नदी साफ करण्यासाठी, तिची खोली वाढवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी करदात्यांच्या पैशातून ओतला जातो. मात्र आजपर्यंत या नदीचा प्रश्न सुटल्याचे ऐकिवात नाही. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे हे नेहमीचेच आपल्या वाट्याला येतात? मग या खड्ड्यात पडून एखाद्या दुचाकीस्वरांचा नाहक बळी जातो. खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते, नाहक मानवी मनुष्यहानी होते. कोणाला वेळेवर न पोहचता आल्याने त्यांचे प्रचंड नुकसान होते. कोणाचे वर्ष वाया जाते, न भरून निघणारे नुकसान होते. मात्र त्याची सवय झालेलीच आहे असे म्हणण्यापेक्षा सवय करून घेतलेली बरीच! आपल्यापेक्षा कमी प्रगत असलेल्या अनेक देशांत या पावसाच्या नुकसानीवर इलाज शोधून काढण्यात आले आहेत. आपल्या देशात पावसात खड्डे पडतात, मात्र इतर देशात का पडत नाहीत. एवढाच विचार आपल्या डोक्यात येतो का? मग आपल्याकडे रस्त्यांसाठी खर्च केल्या जाणाऱ्या पैशांत भ्रष्टाचार होतो, त्यासाठीची पूर्ण रक्कम वापरली जात नसावी, अशी शंका येते. हे असेच चालत राहणार, असे आपण म्हणतो व पुढे चालतो आणि पावसाला दोष देत पुढे सरकतो.

पाऊस सुरू झाला की पडझड झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो, वाचतो. इमारतीचा भाग कोसळला, इमारत कोसळली, शासनाने धोकादायक ठरवले असतानादेखील माणसे मात्र त्यात जीव मुठीत घेऊन राहतात. त्यांचीही अगतिकता असते. कारण आपण आपली मूळ जागा सोडून गेलो, तर शासन त्यावर कब्जा करेल, आपली मूळ जागा गमावून बसू अशी भावना मनात निर्माण होते. धोकादायक असूनही त्यात राहतात व अपघात झाल्यास जीव गमावून बसतात. वर्षंनुवर्ष हेच होत आहे. पूर्वी असे म्हणायचे की, झाड किंवा फांदी कोणाही मानवाच्या अंगावर पडत नाही. मात्र हल्लीच्या दिवसांत एकदा तरी कोणाच्या तरी अंगावर फांदी अथवा झाड पडून त्याचा मृत्यू होतो, झाडांच्या फांद्या, धोकादायक झाडे वेळोवेळी कापली, तर असे प्रसंग घडणारच नाहीत. मात्र नशिबाचा भाग म्हणून सोडून देतो.

धबधब्यावर जाणे, त्याचा आनंद घेणे, सहकुटुंब नवनवी ठिकाणी साजरे करणे यापूर्वी हमखास व्हायचं. मात्र दारू पिऊन धिंगाणा घालणे, दारू पिऊन पाण्यात उतरणे व आपल्यासोबत इतरांचाही जीव धोक्यात घालणे. यामुळे पावसाळी पर्यटनाला गालबोट लागते. दोन-चार नादान माणसांमुळे पावसाळी पर्यटन बदनाम होत चालले आहे. यात दोष कुणाचा? पावसाचा की मनुष्याचा? आपण मात्र पाऊस पाण्याला दूषणे देत पुढे जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याच्या भूमिकेमुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे. मात्र याच शेतकऱ्यांची पावसाच्या वेळी परीक्षा असते. पाऊस नाही पडला, तर कोरडा अति पडला तर ओला दुष्काळ. मग त्यातून सुरू होतात आत्महत्येच्या घटना. वर्षानुवर्षे हे चक्र सुरू आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज सांगितल्यावर पेरण्या होतात, पाऊस नाही पडला तर दुबार पेरण्या होतात. नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होते. पाऊस जास्त झाला, तर या पेरणी करपण्याचीच जास्त चिंता शेतकऱ्यांना असते. मग शेतकऱ्यांसाठी मोठी मदत घोषित होते. मात्र ती त्यांच्यापर्यंत पोहोचते का? ती सुद्धा आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पावसाचा अंदाज जरी नीट वर्तवला आला तरी आपण बऱ्याच समस्या सोडवू शकू. मात्र आपल्याकडे जेव्हा पाऊस जोरदार पडणार, असे सांगून शाळा बंद ठेवाव्या लागतात. त्याच दिवशी ऊन पडते. ज्या दिवशी पाऊस साधारण पडणार, असे सांगितले जाते त्या दिवशी अतिवृष्टी होते. वर्षानुवर्षे हेच होत आहे. यासाठी हवामान वर्तवणारी यंत्रणा एकदम परफेक्ट असावी. कधीतरी अंदाज चुकला, तर मात्र सर्वांचीच दाणादाण होते. प्रचंड नुकसान होते, जीवितहानी होते. यावर्षी संपूर्ण देशभरानेच अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्वांनी या पावसाच्या रौद्रवताराचे दर्शन बघितले आहे. यात मानवी चुका कोणत्या व कोणत्या निसर्गनिर्मित हे प्रत्येकाने ठरवायचे आहे? पाऊस आपल्या हातात नसला तरी विचार करणे तरी आपल्या हातात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -