Saturday, May 4, 2024
Homeअध्यात्मअनंत पाटणकरांना नवसंदेश

अनंत पाटणकरांना नवसंदेश

पुण्याचे पाटणकर शिर्डीला आले व साईबाबांना नमस्कार करून म्हणाले, अनेक शास्त्रांचे, पुराणांचे श्रवण केले, पण मला समाधान लाभले नाही. जोपर्यंत हे मन शांत नाही तोपर्यंत माझे अध्ययन, श्रवण ज्ञान व्यर्थ आहे असे मला वाटते. आपण ब्रह्मज्ञानी आहात. आपली कीर्ती ऐकूनच मी येथे आलो आहे. कृपाकरून मला मार्गदर्शन करा. माझे मन स्थिर होईल, असा आशीर्वाद द्या. पाटणकरांची तळमळ पाहून बाबांना दया आली. ते म्हणाले, ”एक सौदागर आला होता. त्याच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकल्या. सौदागराने तत्परतेने त्या सर्व लेंड्या एका कापडात घट्ट बांधून घेतल्या. त्यामुळे त्याचे चित्त एकाग्र झाले.” बाबा पुढे काहीही बोलले नाहीत.

पाटणकरांनी बाबांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यावर खूप विचार केला, पण बोध होईना. त्यांनी दादा केळकरांना याचा अर्थ विचारला. ते म्हणाले, ‘बाबांना यातून काय सुचवायचे आहे, ते मलाही नेमके सांगता येत नाही. पण त्यांच्याच प्रेरणेने जो काही थोडाबहुत अर्थबोध होतोय तेवढा सांगते. घोडा म्हणजेच ईश्वराची कृपा आणि नऊ लेंड्या म्हणजे नवविधा भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन याद्वारे श्रद्धापूर्वक भक्ती केल्याशिवाय आणि स्वतःला त्या परमेश्वराशी जोडल्याशिवाय त्याची कृपा होत नाही. अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम नसेल, भक्तिभाव नसेल तर वेदाध्ययन, योगसाधना, तत्त्वज्ञान, जप, तप, व्रतादी सर्व खटाटोप व्यर्थ होत.

परमेश्वर भावाचा भुकेला आहे. जो त्याच्यावर मनःपूर्वक प्रेम करतो त्याला अन्य साधनांची आवश्यकताच भासत नाही. नवविध भक्तिप्रकारांतून कोणत्याही एका साधनाने प्रेमपूर्वक भक्ती केली व सदाचरण ठेवले तर देव प्रसन्न होतो. भगवद्गीता सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांविषयी प्रेम व सद्भाव असला की मन आपोआप शांत होते. त्यास स्थैर्य लाभते. सद्भावनेशिवाय मनाचे चंचलत जात नाही, समाधानही लाभत नाही. येथे तुम्ही स्वतः सौदागर आहात हे ओळखा. कथेतल्या सौदागराने नऊ लेंड्या तत्परतेने उचलून घेतल्या तशा या नवविधा भक्तींना आपलेसे करा. भक्तीने ज्ञान प्रकट होते. विरक्ती येते, आनंद मिळतो, वृत्ती अंतर्मुख होते आणि आपल्या जीवनाला मोक्षाची वाट सापडते. बाबांनी तुम्हाला प्रेमपूर्वक भक्ती करण्याचा संदेश दिला आहे. ‘

-विलास खानोलकर

vilaskhanolkardo@gmail.com

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -