Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेAjit Pawar : समस्या सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

Ajit Pawar : समस्या सोडवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

उल्हासनगरवासियांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात आल्यावर शहरातील धोकादायक इमारतींची समस्या, पिण्याच्या पाण्याची कमतरता, उद्यानाचा रखडलेला विकास अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी नियोजन मंत्री व अर्थमंत्री या नात्याने शहर विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उल्हासनगरवासियांना दिले. हे आश्वासन त्यांनी माजी सभागृह नेते भरत गंगोत्री यांच्या प्रभागात झालेल्या छोटेखानी सभेत दिले.

तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या अजित पवार यांनी शहर विकासासाठी तत्कालीन सभागृह नेते भारत गंगोत्री यांना तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीच्या माध्यमातून उल्हासनगर महापालिकेने चार उद्यानांचे सुशोभीकरण आणि तब्बल तेरा रस्त्यांचे काँक्रिटीकरण ही कामे हाती घेतली होती. त्यातील अर्ध्याहून अधिक विकास कामे पूर्ण झाली असून या विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी उल्हासनगर शहरात आले होते. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर खासदार सुनील तटकरे, आनंद परांजपे, प्रमोद हिंदुराव, नजीब मुल्ला, आमदार कुमार आयलानी, डॉ. बालाजी किणीकर, सोनिया धामी आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

फार वर्षानंतर उल्हासनगर शहरातील प्रभात चौक ते प्रभात गार्डन या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून शहर विकास आराखड्यातील रुंदीनुसार हा रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्याचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रभात गार्डन उद्यानाची पाहणी करीत छोटेखानी सभा असलेले पुष्प वन उद्यान गाठले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मानले आभार

यावेळी प्रदेश सचिव सोनिया धामी यांनी शहर विकासासाठी अजित पवार यांनी कशाप्रकारे निधी उपलब्ध करून त्याची माहिती दिली. तसेच भविष्यात शहर विकासासाठी आणखीन निधीची गरज लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगतले. पालिका आयुक्त अजिज शेख यांनी यावेळी केलेल्या भाषणात शहर विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

मोदींच्या विकास कार्यांमुळेच महायुतीत सहभागी

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणात देशाचा विकास मोदी करत असल्याने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी महायुतीत सहभागी घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. शहरातल्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी चर्चा करून विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन शहरवासियांना दिले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे असल्यामुळे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे स्थानिक कल्याण लोकसभेचे खासदार असल्याने ते स्वतः उल्हासनगर शहराच्या समस्यांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता शासन पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -