Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीAI Technology : पाट्या टाकणारे उपसंपादक, वृत्त निवेदकांचे दिवस भरले!

AI Technology : पाट्या टाकणारे उपसंपादक, वृत्त निवेदकांचे दिवस भरले!

गुगलचे ‘एआय’ वृत्तलेखनही करणार; वृत्तपत्रांना प्रात्यक्षिक दाखवले

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ची (Artificial Intelligence) प्रसारमाध्यमांच्या वृत्तविभागातही चाचपणी झाली आहे. नुकतेच भारतातील पहिली एआय न्यूज अँकर प्रगती (AI Technology) हिने केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, पी. ए. मुहम्मद रियास यांची अभूतपूर्व मुलाखत घेतली. त्यानंतर आता गुगल (Google AI) कंपनीने त्यांचे नवे ‘एआय’आधारित तंत्रज्ञान ‘जेनेसिस’ सादर केले आहे. याद्वारे वृत्तलेखन सुद्धा करता येणे शक्य होणार आहे. यामुळे कार्यालयात बसून पाट्या टाकणारे उपसंपादक आणि वृत्त निवेदकांचे दिवस आता संपल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ची सध्या सर्व क्षेत्रात चर्चा आहे. चॅनेलीयम डॉट कॉम या डिजिटल न्यूज पोर्टलने भारतातील पहिली एआय न्यूज अँकर प्रगती हिची नुकतीच देशाला ओळख करुन दिली. ग्राहकोपयोगी सेवा, उद्योग, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातही ‘एआय’च्या वापराच्या चाचण्या झाल्या आहेत.

गेल्या महिन्यात ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘एनबीसी न्यूज’ आणि ‘गिझमोडो’ या संकेतस्थळाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता. गुगलनेही या नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ची मूळ कंपनी ‘न्यूज कॉर्पोरेशन’ला नुकतेच दाखविल्याची माहिती या प्रक्रियेशी संबंधित तीन व्यक्तींनी दिल्याचे ‘वृत्त ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी या उत्पादनाबाबत माहिती दिली ‘जेनेसिस’ या नावाने हे तंत्रज्ञान ओळखले जाते. ते माहिती घेऊ शकते, चालू घडामोडींचे तपशील देऊ शकते आणि बातम्याही तयार करेल, असे त्यांनी सांगितले.

या तिघांपैकी एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ‘जेनेसिस’ हे पत्रकारांसाठी वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करू शकते आणि त्यांना इतर काम करण्यास मोकळा वेळ मिळू शकेल. यामुळे वृत्तविभागाची कार्यक्षमता आणि उत्‍पादकता वाढेल, असा विश्‍वास गुगलला वाटत आहे. बातम्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करणारे जबाबदार तंत्रज्ञान म्हणून गुगल त्याच्याकडे पाहत आहे.

प्रात्यक्षिक पाहिलेल्या काही अधिकाऱ्यांच्या पसंतीस गुगलचे हे तंत्रज्ञान उतरले नाही, ‘हे अस्वस्थ करणारे तंत्रज्ञान आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अचूक बातम्या लिहिण्यासाठी आणि त्या कलात्मकरित्या सादर करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, ते यात लक्षात घेतलेले नाहीत, असे दोन जणांनी सांगितले.

गुगलच्या प्रवक्त्या जेनिफर यांनी ‘जेनेसिस’चे समर्थन केले. ‘द व्हर्ज’शी बोलताना त्या म्हणाल्या, की पत्रकारांना त्यांच्या रोजच्या कामात ‘एआय’वर आधारित मदत व्हावी, यासाठी ज्या भागीदार प्रकाशकांसमोर विशेष करून लहान प्रकाशनांसमोर मांडलेले हे तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.

वार्तांकन करणे, बातमी लिहिणे आणि माहितीची सत्यता पडताळणे यातील पत्रकारांच्या भूमिकेला हे तंत्रज्ञान पर्याय ठरावे, असा हेतू नाही आणि होणारही नाही. पण मथळे आणि इतर लेखन शैलींसाठी हे तंत्रज्ञान पर्याय देऊ शकते.

आमचे गुगलशी उत्तम संबंध आहेत आणि सुंदर पिचाई यांच्या पत्रकारितेच्या दीर्घकालीन बांधिलकीचे आम्ही कौतुक करतो, असे ‘न्यूज कॉर्प’च्या प्रवक्त्याने सांगितले. गुगलच्या या तंत्रज्ञानाबद्दल उलटसुलट मते व्यक्त होत असली तरी पत्रकारितेच्या क्षेत्रात त्याबद्दल खूप कुतूहल आहे. अनेक वर्षांपासून स्वतंत्र लेखन करणारे पत्रकार, ‘असोसिएट प्रेस’सारख्या काही वृत्तसंस्थांमध्ये उत्सुकता आहे.

गुगलच्या या नव्या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. जर या तंत्रज्ञानाकडून सत्य माहिती खात्रीलायकपणे मिळू शकत असेल, तर पत्रकार त्याचा वापर करू शकतात. पण बारकावे आणि सांस्कृतिक सामंजस्याची गरज असलेल्या विषयांत पत्रकार आणि वृत्तसंस्थांनी याचा गैरवापर केल्यास केवळ या तंत्रज्ञानाचेच नाही तर त्याचा वापर करणाऱ्या वृत्तसंस्थांच्याही विश्‍वासार्हतेला तडा जाऊ शकतो. – जेफ जार्वीस, पत्रकारितेचे प्राध्यापक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -