अहल्याबाई स्मारक समिती, नागपूर

Share

सेवाव्रती: शिबानी जोशी

वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी १९३६ साली परमपूज्य केशव हेडगेवार यांच्याशी विचारमंथन करून राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली अखंड ८८ वर्षे कार्यरत असणारी ही समिती एकमेव सर्वात मोठी अखिल भारतीय स्त्री संघटना मानली जाते. महिलांनी केवळ शिक्षित नव्हे तर सक्षम बनावे, तसेच मानसिक, शारीरिक व बौद्धिकरीत्या सक्षम बनावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून लक्ष्मीबाई केळकर यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली.

देशभरात तीन हजारांहून अधिक शाखा व अन्य सेवा कार्यात समितीचे योगदान आहे. संपूर्ण देशभरात राष्ट्रसेविका समितीचे कार्य सुरू असून, सुमारे बारा देशांत हिंदू सेविका समितीच्या नावाने कार्य सुरू आहे. स्थापनेनंतर मावशी केळकर यांनी भारतभर भ्रमण करत समितीच्या शाखा उघडून महिलांना स्वावलंबी, सक्षम बनवण्यासाठी काम सुरू केले. संरक्षण म्हणजे केवळ स्वतःच संरक्षण नव्हे, तर स्वभाषा व स्वसंस्कृती, स्वधर्म व स्वपरिवाराच, स्वतःसहित रक्षण करण्यासाठी महिला सज्ज असल्या पाहिजेत, अशी त्यांची भावना होती. ज्याप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असतानाच सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असते, त्याप्रमाणेच जणूकाही एखाद्या स्त्रीने स्वतःचा विकास करत असतानाच समाजाच्या विकासाकडेही लक्ष दिले पाहिजे. एक एका स्त्रीत विकास, आत्मविश्वास, संरक्षणाची भावना वाढली की आपोआपच संपूर्ण समाजातील महिला आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंब विकासाकडे जाईल, अशी ती भावना होती.

समिती आदर्श मानत आली आहे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या मूल्यांच्या आदर्श जिजाबाई, अहल्याबाई आणि लक्ष्मीबाई यांना. मातृत्व म्हणजे जिजाबाई, कर्तृत्वाचा आदर्श म्हणजे अहल्याबाई होळकर आणि नेतृत्वाचा आदर्श म्हणजे राणी लक्ष्मीबाई, असे मानून समितीचे काम चालू असते. त्या विचारातूनच १९५६ साली मावशी केळकर यांनी नाशिक येथे ‘राणी भवन’ची स्थापना केली. सामाजिक काम करायचे असेल, तर स्वतःकडे एक वास्तूची गरज असते. त्यातूनच ठिकठिकाणी या तीन आदर्शांच्या नावाने संस्था काढण्यात आल्या. त्यानंतर ठाण्याला जिजामाता ट्रस्ट स्थापन झाले. त्यानंतर नागपूर येथे १९६५ मध्ये मावशींनी देवी अहल्या स्मारक समिती ट्रस्टची स्थापना केली.

अहल्यादेवी होळकर या एक आदर्श प्रशासिका म्हणाव्या लागतील. अतिशय धार्मिक असे हे व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी ठिकठिकाणी जाऊन भेटी दिल्या आणि त्यांच्या लक्षात आले की, प्रांताप्रांतामध्ये आपल्या मंदिरांचे विध्वंस झाले आहेत. या सर्व मंदिरांचे पुनरुज्जीवन, जीर्णोद्धार करणं, घाट बांधणं अशी कामे अहल्याबाईंनी केली. त्यांच्या नावाने ही संस्था स्थापन केली, त्यानंतर १९९०-९१ मध्ये एक मोठी इमारत तिथे उभी राहिली. आपल्याकडे आचरणासाठी चार योग सांगितले जातात. ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग आणि कर्मयोग. या चारही योगांना अनुसरून १९८४ साली महिलांसाठी येथे काकू परांजपे यांच्या नावाने वाचनालय सुरू करण्यात आले. ६००० पुस्तके या ठिकाणी वाचनासाठी उपलब्ध आहेत. पुस्तक वाचन करून ज्ञान मिळवावे आणि ज्ञानयोग साधावा हा हेतू. यासोबतच लहान मुलांसाठी तसेच महिला वर्गासाठी सर्व सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. वनवासी मुलींसाठी छात्रावासही इथे चालतं.

सुरुवातीला या ठिकाणी गडचिरोली, भंडारा इथल्या मुली येत असत, पण नंतर ईशान्य भारतातील मुलींनाही ज्ञानाच्या प्रवाहात आणून सक्षम बनवणं आणि त्यांना आपण भारतीय असल्याची भावना निर्माण होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन १९८६- ८७ पासून ईशान्येकडील मुलींच्याही निवासाची व्यवस्था इथे केली जाते. सध्या येथे ४० ईशान्य भारतातील मुली वस्तीला आहेत. या मुलींना केवळ निवासाची व्यवस्था नाही तर खेळ, स्वसंरक्षणासाठी कराटे, तायक्वांडो असे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. तिथे राहणाऱ्या मुली एमएसडब्ल्यू, फायनान्स, लॉ अशा प्रकारचं शिक्षण घेऊन पुन्हा परत जातात आणि आज त्या चांगल्या हुद्द्यांवर नोकरी करत आहेत. काही जणींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. एका मुलीने तर मिझोराम येथे स्वतः छात्रावास स्थापन केले आहे.

संस्थेमध्ये दिवसातून तीन वेळा योगासनाचे वर्ग चालतात, त्याचाही लाभ अनेक जण घेत असतात. त्याशिवाय फिजिओथेरपीची काही उपकरणे येथे ठेवण्यात आली आहेत, त्याचा लाभही नागरिक घेऊ शकतात. मालतीबाई पटवर्धन रुग्ण सेवा केंद्र सुरू करून त्याद्वारे महिलाच नाही, तर सर्वच नागरिकांना वैद्यकीय उपकरणं वापरासाठी पुरवली जातात. घरातील वृद्धांना किंवा रुग्णांना काही वैद्यकीय उपकरण थोड्या कालावधीसाठी वापरायला हवी असतात आणि ते त्यांना विकत घेणे शक्य नसते अशी सर्व उपकरणे येथे उपलब्ध असून, ती गरजूंना वापरण्यासाठी दिली जातात. यात बेड, व्हीलचेअर, वॉकर, काठी, कमोड इत्यादींचा समावेश आहे. त्याशिवाय होमिओपथिक, आयुर्वेदिक केंद्रही येथे चालवले जाते. यामध्ये होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टर येऊन उपचार तसेच औषध देतात. संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांना असे लक्षात आले की खापरी, कोराडीसारख्या नागपूरजवळच्या ग्रामीण भागातल्या महिला लहान मुलांना नायलॉनचे, सिंथेटिक कपडे घालतात. लहान मुलांना अशा कपड्यांमुळे त्वचारोग होऊ शकतात, हे लक्षात घेऊन त्यांना कॉटनचे कपडे तसेच स्वेटरसुद्धा संस्थेमार्फत दिले जातात.

अहल्या मंदिरातर्फे केवळ स्वतःच्याच संस्थेमध्ये सेवा पुरवल्या जातात असे नाही, तर वेगवेगळ्या वेळी अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा मदत दिली जाते. चिपळूणला आलेला पूर किंवा कोल्हापूरला कृष्णाला आलेला पूर, जम्मू-काश्मीरमधली परिस्थिती, विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, कोरोना काळात बाळंत झालेल्या गरीब महिलांना कपडे, पौष्टिक पदार्थांचे वाटप, अगदी मध्यंतरी मणिपूरला झालेल्या कठीण प्रसंगाच्या वेळीसुद्धा तिथल्या महिलांना स्वेटर, कपडे पाठवले आहेत. कोल्हापूरची पूर्ण इथल्या पूर परिस्थितीत त्या ठिकाणच्या महिलांना वस्त्र, शिलाई मशीन, घरघंटी देऊन मदत केली जाते.

स्वदेशीचा वापर वाढावा, तसेच पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर वाढावा यासाठी सुद्धा संस्थेतर्फे प्रयत्न केले जातात. समाजाला थोडेसे वापरलेले कपडे देण्याचे आवाहन केले जाते आणि त्या सुती साड्यांच्या पिशव्या शिवून त्यांचे वाटप केले जाते. स्वदेशी वस्तू भांडारही या ठिकाणी चालत. महिलांमध्ये विविध कौशल्य, कला, अन्य गुण असतात. ते वाढीस लागावे, हे लक्षात घेऊन भजनी मंडळ चालत. या भजनी मंडळात अनेक महिला भजन म्हणायला येतात, त्याशिवाय पौरोहित्य वर्गही चालतात. या ठिकाणी महिलांना पौरोहित्याचं प्रशिक्षण दिलं जात. केवळ पुरुषांनीच नव्हे, तर महिलांना सुद्धा पौरोहित्याचं प्रशिक्षण दिले, तर त्यांना सुद्धा हे कवाड खुले होईल यासाठी महिलांसाठी पौरोहित्य वर्ग चालतात. या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या महिला पौरोहित्यातून किंवा भजनी मंडळातून मिळणारी रक्कम स्वतःसाठी न ठेवता समाजकार्यासाठी वापरतात.

कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी दोन पुरस्कार दिले जातात. २०१४ पासून एक पुरस्कार राणी माँ गाईदिनल्यू यांच्या नावाने कर्तृत्ववान महिलेला दिला जातो. राणी माँने पूर्वांचल भागामध्ये खूप मोठं काम केलं होत. त्यांना कैदी बनवण्यात आलं होतं आणि त्यांना तिथे खूप यातना भोगाव्या लागल्या होत्या. त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. राणी माँ गाईदिनल्यू पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी खूप वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत.

बस्तर क्षेत्रात काम करणाऱ्या पौरीमट्टामी, बुधरी ताती, नागालँडची तासिले झिलि्यांग, कारागृह अधीक्षिका – यवतमाळ इथल्या कीर्ती चिंतामणी, बचत गट चालवणाऱ्या नवेगाव बांध येथील रचना गहाणे, भिकमकोर, राजस्थानमधील मधुजी वैष्णव, बस्तरमधील गिर्यारोहक नैना धाकड यांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. दुसरा पुरस्कार “शतायु” पुरस्कार आहे. हा आत्यांच्या नावाने दिला जातो. आत्याबाई मनोरमाबाई दाते यांनी निरामय असं शतायु आयुष्य जगल होत. त्या शंभरी पर्यंत समाजकार्यात होत्या, त्यामुळे त्यांच्या नावाने अशा एखाद्या ज्येष्ठ महिलेला शतायु पुरस्कार दिला जातो. अशा तऱ्हेने देवी अहल्या स्मारक समितीमध्ये जवळजवळ दहा ते बारा प्रकल्प नियमितपणे सुरू असतात. या सर्व प्रकल्पांत अर्थातच कार्यकर्त्यांची गरज असते. या सर्व प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठीसुद्धा “माहेर” या नावाने एक स्नेहमिलन कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. त्या निमित्ताने या सर्व महिला एकमेकींना भेटतात, तसेच त्यांना माहेरच्या माणसात आल्याचा आनंद मिळावा या हेतूने स्नेहमिलन आयोजित केले जाते.  असे ही देवी अहल्या स्मारक समिती  ६८ वर्षे काम करत असून, त्यांच्या कामाचा नावलौकिक ऐकून समितीला अनेकांनी भेटी दिल्या आहेत.

स्व. अटलबिहारी वाजपेयी, सुमित्रा महाजन, हृदयनाथ मंगेशकर, मॉरीशसचे माजी पंतप्रधान रामगुलामजी, पांडुरंगशास्त्री आठवले, जैन साध्वी – प्रीतीसुधाजी, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, स्मिता तळवलकर यांसारख्या अनेकांनी इथे भेट दिली. काकू रानडे व्याख्यानमाला ही व्याख्यानमाला ५२ वर्षांपासून सुरू आहे. यात आतापर्यंत अनेक मान्यवरांची विविध विषयांवर भाषणे झालीत. त्यातील काही वक्ते म्हणजे भारतीय ज्ञानाचा खजिना या विषयावर प्रशांत पोळ यांचं व्याख्यान, श्रीमद शंकराचार्य जीवन चरित्र या विषयावर नागपूरच्या प्रतिभा लोथे बोलल्या होत्या. संतांवर भंडाऱ्याच्या डॉ. जुल्फी शेख, स्वातंत्र्यसंग्रामात महिलांचे योगदान या विषयावर नागपूरच्या डॉ. वर्षा कौशिक, नागपूरच्या डॉ. शुभा साठे, मुंबईच्या डॉ. शुभदा जोशी, नागपूरच्या रमा गोळवलकर अशा ज्ञानवंतांची व्याख्यान संस्थेतर्फे आयोजित करून विचारांना खाद्य पुरवले जाते. अशा रीतीने कन्या, विद्यार्थिनी, महिला, गरीब वंचित महिला अशा सर्वच गटातल्या महिलांना शारीरिक, मानसिक, आर्थिक विकासातून सक्षम बनवण्याकरता ६८ वर्षे समितीतर्फे मावशींच्या विचारानुरूप कार्य सुरू आहे.
joshishibani@yahoo. com

Recent Posts

Sangli Loksabha : सांगलीत मतदान केंद्रावर घडला ‘हा’ वादग्रस्त प्रकार

पोलीस आणि मतदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? सांगली : देशभरात होणाऱ्या लोकसभा…

54 mins ago

Chitra Wagh : तुमचं टायमिंग पाहता यामागे राजकीय हेतू आहे का?

मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंना चित्रा वाघ यांचा पत्रातून टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या…

59 mins ago

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभेनंतर महाराष्ट्रात लगेच होणार विधानपरिषद निवडणूक!

जाणून घ्या कोणत्या जागांवर आणि किती तारखेला होणार मतदान... मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…

2 hours ago

RBI : आरबीआयची नवी नियमावली; कर्ज वाटपासंदर्भात कडक सूचना जाहीर!

कॅश लोनवर असणार 'हे' नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : नवे आर्थिक वर्ष…

2 hours ago

Shivaji Park Meeting : ठाकरेंना मागे सारत शिवाजी पार्कवर होणार मनसेचीच सभा!

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी १७ मे रोजी पहिल्यांदा एकत्र मंचावर येणार मुंबई…

2 hours ago

MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘या’ चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय? मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु…

2 hours ago