Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रवाढत्या तापमानाचा कोकणातील आंबा पिकावर विपरीत परिणाम

वाढत्या तापमानाचा कोकणातील आंबा पिकावर विपरीत परिणाम

संशोधन करण्याची मागणी

नांदगाव मुरुड (वार्ताहर) : ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या हवामानात झपाट्याने व अचानकपणे होत असलेल्या बदलाने कृषी तथा फलोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित होत असताना कोकणातील जगप्रसिद्ध मधूर, रसाळ हापूस आंबा तरी त्यातून कसा सुटणार. हवामानाच्या वैचित्र्यामुळे सध्या कोकणातील अनेक आंब्यांच्या झाडांना एकाच वेळी सुपारी एवढ्या कैऱ्या, काही फांद्यांना मोहर तर दुसऱ्या फांद्यांना पालवी फुटलेली दिसून येत आहे. असे यापूर्वी कधी झाले नसल्याने या नव्या बदलाची दखल घेऊन कृषी तज्ज्ञांनी त्याबाबत संशोधन करून आंबा पिकाला वाचवावे, अशी आर्त हाक महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने कोकणात अक्षरशः कहर केला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम झाला व पीक ३२ ते ३४ टक्क्यांवर आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पाऊस किमान जानेवारीपर्यंत झाला नाही, परंतु यावर्षी थंडीचा असलेला अनियमितपणा व वारंवार निर्माण होणाऱ्या अभ्राच्छादित वातावरणामुळे मोहरावर मावा, तुडतुडे, फुलकीडे आदींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आंबा बागायतदारांनी महागड्या औषधांचा वापर फवारणीसाठी केला; परंतु सतत बदलणाऱ्या हवामानामुळे त्याचा म्हणावा तेवढा फायदा त्यांना झाला नाही.

याच दरम्यान फेब्रुवारीपासून पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचा तयार आंबा विक्रीस बाजार समित्यांतून दाखल होऊ लागला. अर्थात मागच्या वर्षाच्या तुलनेने ही सुरुवात निश्चितच सुखद होती. पण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोकणात साधारणतः ३२ ते ३५ अंश सेल्सियस असलेले तापमान वाढून अचानक ते ३८ ते ३९ अंशापर्यंत वाढले आणि बागायतदारांसमोर हे नवीन संकट उभे राहिले. परिणामी फळगळतीने सुपारी फळाच्या आकाराएवढ्या कैऱ्यांचा खच बागेतून पडला. त्याहीपेक्षा मोठ्या झालेल्या फळांना तडे जाऊन ते काळे होऊन फळगळती झाली, त्यामुळे तर बागायतदारांच्या तोंडचे पाणीच पळाले. कारण एकतर हा आंबा नोव्हेंबर, डिसेंबरच्या नियमित मोहरातील होता व मार्चमध्ये त्याचा हंगाम सुरू होणार होता. परिणामी बागायतदारांना चार पैसे मिळण्याची आशा मावळली होती.
अशा प्रतिकूल परिस्थितीत आंबा बागायतदारांनी हंगाम वाचविण्यासाठी पुन्हा मेहनत घेत कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या सहा औषध फवारण्या पूर्ण केल्या. साधारणतः तयार आंब्यांचा हंगाम १५ फेब्रुवारीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वेंगुर्ले, मालवण, खारेपाटण, वैभववाडी येथून सुरु होतो, त्यानंतर पंधरा दिवसांनी रत्नागिरी राजापूर, गणपतीपुळे, पाली, देवरुख, चिपळूण येथील तर त्यानंतर १५ दिवसानंतर रायगड जिल्ह्यातील आंबा बाजारात विक्रीसाठी दाखल होतो; परंतु यावर्षी मार्च महिन्याच्या १६ तारखेपर्यंत अवकाळीने थैमान घातल्याने, तर बागायतदारांच्या पायाखालची वाळूच सरकून पुरती वाट लागली आहे.

यंदाच्या हंगामाचे विशेष म्हणजे हवामान बदलामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर फार तर डिसेंबरमध्ये आंब्यांच्या झाडांना येणारी पालवी चार-पाच महिन्यांनंतर ती आता चुकीच्या हंगामात येत आहे. या अवेळी पालवी फुटण्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. ही पालवी आंब्यांचे शोषण करीत आहे. ती यापूर्वी कधी आंबे झाडावर परिपूर्ण होत असताना दिसून येत नव्हती, असे बुजुर्ग आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. काही पालवीला मोहर लागत असल्याने आता आंब्याच्या झाडावर आंबे, मोहर आणि पालवी एकाच वेळी दिसून येत आहे. हा हवामान बदलाचा परिणाम आहे.

दिवसेंदिवस होत असलेल्या तापमान वाढीमुळे पुढील वर्षी सुरू होणाऱ्या हंगामात येत्या सात-आठ महिन्यांत लगेचच त्याच झाडांना पालवी फुटण्याची प्रक्रिया वेळेत सुरू होईल का?, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. कारण अतिउष्णता हापूसला चालत नाही. याचा फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. आधीच बागायतदार शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा कायम दलाल, अडते उठवत असतात. सर्वच जातीचे आंबे एकाचवेळी बाजारात आल्याने भाव मिळत नाही. आता त्यात भरीला लहरी हवामानाने बागायतदारांना मेटाकुटीला आणले आहे. अशा या बदलावरील संशोधन करून त्यावरील उपाय कृषितज्ज्ञांनी शोधले पाहिजेत. शासनानेही अवकाळीग्रस्त बागायतदारांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे़.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -