Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीमंत्रीपद देतो सांगून एका महाठगाने भाजप आमदारांना फसवले!

मंत्रीपद देतो सांगून एका महाठगाने भाजप आमदारांना फसवले!

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला मंत्रीपद देतो, १ कोटी ६७ लाख द्या; नड्डांच्या बोगस पीएचा भाजप आमदारांना फोन

नागपूर : ‘मी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय्य साहाय्यक आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील’, असे सांगून एका भामट्याने मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून भामट्याला अहमदाबादेतील मोरबी येथून अटक केली. नीरजसिंग राठोड, असे अटकेतील तोतया पीएचे नाव आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर गेल्या सात दिवसांपासून नीरज हा विकास कुंभारे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधायचा. नगर विकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना एक कोटी ६७ लाख रुपयांची मागणी करायचा. नीरज हा ठकबाज असल्याचे कुंभारे यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. अमितेशकुमार यांनी याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे सोपविला. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे नीरजचा शोध घेतला. नीरज हा अहमदाबाद येथील मोरबीत राहात असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांचे पथक मोरबी येथे गेले. मंगळवारी नीरज याला अटक करीत पोलिसांचे पथक त्याला घेऊन नागपूरकडे रवाना झाले.

पोलिसांनी नीरजची प्राथमिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नीरज याने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यापैकी काहींकडून नीरज याने पैसे घेतल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे कोणीही मंत्रीपदाच्या शर्यतीत नसताना त्यांना नीरजने मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आपण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे खरेखुरे पीए आहोत हे पटवून देण्यासाठी नीरजने आपल्या एका साथीदारालाच नड्डा बनविले होते. त्याच्या सापळ्यात सापडलेल्या आमदाराला तो फोनवरून तोतया नड्डासोबत बोलणे करून द्यायचा. नीरजच्या सापळ्यात कोण कोण अडकले आणि किती रुपयांनी लुटले गेले ते तपासातून पुढे येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -