माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती
कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचे उद्घाटन ११ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील वेगळी अशी ही गोशाळा असणार असून येथे देशभरातील विविध प्रकारच्या गाई पाळल्या जातील. माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी यासाठी याठिकाणी विविध प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी येथे दिली. येथील ‘ओम गणेश’ या आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर
खा. राणे म्हणाले, हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते. गाय असेल तिथे समृद्धी नांदते. यासाठी गुजरातपासून अनेक ठिकाणी मी गोशाळा पाहिल्या, त्यानंतर येथे वेगळी चांगली गोशाळा उभारण्याचा संकल्प केला. या ठिकाणी गीर जातीची तसेच इतर अनेक जातींच्या गाई असणार आहेत. लातूरचीही देखणी गाय असणार आहे. सध्या ८० गीर गाई आहेत, आणखी २० येणार आहेत.
शेणापासून रंगनिर्मिती होणार
शेणापासून रंगाची निर्मिती केली जाते. जयपूर येथे असा रंग तयार करून शासकीय कार्यालयांना दोनशे रु. लिटरपर्यंतच्या दराने दिला जातो. त्यामुळे एक गाय पाळली, तर किती अर्थकारण होऊ शकते, हे येथील शेतकऱ्यांना समजून येईल आणि त्यांचा विकास होईल. गाईंपासूनचा सर्व पैसा येथील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी माझे हे सर्व प्रयत्न आहेत, असे श्री. राणे यांनी सांगितले.
अनेक छोटे प्रकल्प होणार!
गाय पाळल्यामुळे अनेक गोष्टींमधून उत्पन्न मिळवता येते. गोशाळेत गायीच्या दुधाच्या फॅटही तपासले जाईल. गीर गाईच्या दुधापासून मिळणाऱ्या तुपाला दहा हजार प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. लोकांनी असा व्यवसाय करावा, गायी, म्हशी पालनाकडे वळावे आणि समृद्ध व्हावे असा यामागे हेतू आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारावी, दूध संकलनाची व्यवस्था, पैसेही त्वरित देण्याची व्यवस्था केली जाईल, या गोशाळेत शेणही पाच रु. किलो विकत घेतले जाईल गॅस निर्मिती होईल. स्थानिक गायींचे गोमुत्रही विकत घेतले जाईल. खताची फॅक्टरीही होईल असे अनेक प्रकल्प याठिकाणी शेतकऱ्यांसाठी होतील, असे खा. राणे यांनी सांगितले.