नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर राष्ट्रहिताच्या निर्णयांद्वारे दाखवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना पुढील ३ दिवसांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपर्यंतच वैध राहणार आहेत, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
In continuation of the decisions made by the Cabinet Committee on Security in the wake of the Pahalgam terror attack, the Government of India has decided to suspend visa services to Pakistani nationals with immediate effect. All existing valid visas issued by India to Pakistani… pic.twitter.com/P2Du6Dvc9Q
— ANI (@ANI) April 24, 2025
विशेष म्हणजे, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही ७२ तासांच्या आत देश सोडावा लागणार आहे. याअंतर्गत कोणालाही भारतात परतण्याची किंवा थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान, जे भारतीय नागरिक सध्या पाकिस्तानात आहेत त्यांना तातडीने भारतात परतण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर गुरुवारी (२४ एप्रिल) अनेक पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भारत सरकारचा हा निर्णय केवळ सुरक्षा पावले उचलणं नव्हे, तर पाकिस्तानच्या दहशतवाद पुरस्कृत धोरणांना दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे. आता देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार कोणते आणखी कडक निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.