फायर सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही संशय!
रोहे (धाटाव) : रोहेजवळील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुमारे ९०० मीटर लांबीच्या गोदामाला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामातील मोठ्या प्रमाणावरील साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दीपक नायट्रेट कंपनीची गाडी घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली.
फायर सुरक्षा यंत्रणांचा अभाव – कर्मचार्यांचा जीव धोक्यात
सुरक्षाविषयक बाबतीत कंपनीने गंभीर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. गोदामात फायर अलार्म, स्प्रिंकलर, हायड्रंट यंत्रणा कार्यरत नव्हत्या. कर्मचारीवर्गालाही योग्य प्रशिक्षण नव्हते. आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणतीही तयारी नसल्याने ही आग नियंत्रणात आणताना मोठा वेळ वाया गेला.
शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज – पण खऱ्या कारणांचा शोध आवश्यक
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट हे संभाव्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, इतक्या मोठ्या गोदामात कोणतीही प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना न ठेवता व्यवसाय चालवल्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित होत आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा संशयास्पद मौन
या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम झाल्याची शक्यता आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही तात्काळ कारवाई किंवा घटनास्थळी तपासणी करण्यात आलेली नाही. औद्योगिक क्षेत्रात जबाबदारीने काम करावे लागणाऱ्या मंडळाचे हे मौन जनतेच्या आरोग्याशी खेळणारे ठरत आहे.
नागरिक संतप्त – कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर औद्योगिक कंपन्यांच्या निष्काळजी कारभाराचा आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या शासकीय यंत्रणांचा बुरखा फाटल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांकडून कंपनी प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळावर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी औद्योगिक सुरक्षेविषयी प्रशासन आणि कंपन्यांनी जागरूक होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या दुर्घटना टळणार नाहीत.