पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे परिसरात लागलेल्या वणव्यात येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या वाड्याला आग लागून वाडा पूर्णतः जळून खाक झाला. तर वाड्यातील ३ गुरे होरपळून गतप्राण झाली.
कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सूर्यकांत नथुराम सावंत रा. रानबाजिरे यांच्या मालकीचा गोठा मोरगिरी भागातून वणवा आल्याने आग लागून जळून खाक झाला. या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आणि काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर व सर्व सदस्यानी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तीन गुरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
यावेळी तहसील कार्यालयाचे परशुराम पाटील व तलाठी वैराळे यांनी ग्रामस्थांसमवेत दाखल होत परिसराची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून कापडे भागात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे जनावरांचे, वनसंपत्तीचे तसेच ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.