मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरूच आहे. दुसरीकडे, अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण देखील निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पुढील एक ते दोन दिवसांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, अकोला येथे ४२.४ सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. तर, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी (दि.१३) गारासह अवकाळी पाऊस झाला.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र संपले आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडून विदर्भाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे.पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत पावसाचा अंदाज आहे.
Hina Khan : रॅम्प वॉक करताना हिना खानसोबत असं घडलं! तरीही ती सावरली…
सोमवार (दि.१४) नंतर लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडेल. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. कोकण, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेले दोन दिवस राज्यात झालेल्या हवामान बदलाचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असून जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली. रविवारी (दि. १३) येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील काही गावांना गारपिटीचा फटका बसला.तर जळगाव, पिंपरी चिंचवड आणि नांदेडमध्ये अर्धा तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. महाराष्ट्रात हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आधीच वर्तवला होता.