Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीकोकणचे धडाकेबाज नेते

कोकणचे धडाकेबाज नेते

  • एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकेकाळी ज्यांनी आपल्या फायरब्रँड व्यक्तिमत्त्वाने सगळ्यांना चकित करून सोडलं होतं आणि आजही त्यांचा दबदबा कायम आहे अशा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो…! राणेसाहेबांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य मिळो आणि त्यांचं मार्गदर्शन राजकारणातल्या नव्याने येणाऱ्या पिढीला मिळत जावो हीच सदिच्छा प्रहारच्या या विशेषांकाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो.

शिवसेनेत माझी सुरुवात झाली, त्यावेळेपासून नारायण राणे या नावाविषयी खूप उत्सुकता असायची. जबरदस्त आक्रमक नेते अशी त्यांची ओळख होती. एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचतो हे अप्रूपच होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे घडू शकलं. राणे साहेबांनी सुद्धा आपल्यावर सोपविलेली जबाबदारी अतिशय गांभीर्यानं आणि संवेदनशीलता दाखवून पार पाडली. फार मोठा काळ त्यांना नाही मिळाला. पण या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची झलक पाहायला मिळाली.

राणे साहेबांचा अर्थशास्त्राचा अभ्यास दांडगा आहे. अर्थसंकल्पाची आकडेवारी त्यांची तोंडपाठ असते. त्यांचं वाचन प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक बाबतीची माहिती असते. विधिमंडळात प्रश्न मांडताना ते अभ्यासू आणि परिपूर्ण रितीने मांडतात. युतीचं सरकार असताना त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी येण्यापूर्वी महसूल खातं होतं. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी प्रत्येक मुद्दा, विषय समजून घेतला. खातं किंवा विभाग कोणतंही असो त्यासंबंधी प्रत्येक माहिती त्यांच्यापाशी असते. प्रत्येक गोष्ट जाणून घेत असल्याने त्यांना चुकीची माहिती कधी कोणत्या अधिकाऱ्याने दिली नाही. त्यामुळेच त्यांची प्रशासनावर पकड राहिली.

त्यांनी घेतलेले निर्णय हे धडाकेबाज, लोकहिताचे होते. शिवाय, कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी नारायण राणे यांचं योगदान नाकारता येणार नाही. नारायण राणेंची मुख्यमंत्री म्हणून प्रशासनावर पकडही उत्तम होती. राज्यात असे काही नेते आहेत, ज्यांना प्रशासन चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे राज्यकारभार हाकताना त्यांना अडचण येत नाही. त्यामध्ये नारायण राणे यांचा निश्चित समावेश होतो. अभ्यासपूर्ण आणि लोकप्रिय निर्णय घेणारे नेते लोकांना आवडतात, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोकण म्हणजे नारायण राणे हे समीकरण पूर्वीही होतं आणि आताही आहे. लोकांचे त्यांच्यावर प्रेम आहे. ते केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलण्याची संधी मिळायची. महाराष्ट्राविषयी त्यांचे निश्चित असे व्हिजन होतं. त्यांचा महाराष्ट्रातील प्रश्न आणि समस्यांविषयी असलेला अभ्यास आणि काम करण्याची तळमळ पाहून मी नेहमीच प्रभावित होत असे. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती शिवसेनेतून. वयाच्या १६व्या वर्षी ते शिवसैनिक झाले. आक्रमक स्वभावामुळे ते सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. याच आक्रमकतेमुळे त्यांना चेंबूरचं शाखाप्रमुखपद देण्यात आलं. त्यानंतर राणे साहेबांचा राजकारणातील आलेख चढताच राहिला.

राणेसाहेब ज्यावेळी विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पावर भाषण करत त्यावेळी सभागृह भरलेलं असे. सत्ताधारी-विरोधी पक्षांचे आमदार, प्रेक्षक गॅलरी, पत्रकार गॅलरी ही सारी भरलेली असे, असं त्याचं भाषण हे अभ्यासपूर्ण असे. त्याच्या नोंदीदेखील आपल्याला सहज मिळून जातील. नारायण राणे यांनी पक्षाच्या बाहेरदेखील मैत्री जपली. राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी याचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतील. त्यांचे सर्वच पक्षांमध्ये मित्र आहेत. कार्यकर्त्यांना देखील त्यांनी कायम महत्त्व दिलं आहे. नारायण राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेकजण आदरपूर्वक आपले अनुभव सांगतात, ही त्यांनी कमावलेली फार मोठी ठेव आहे. माझ्यासारख्या शिवसैनिकाला राणे साहेबांनी नेहमीच मार्गदर्शन मिळत आले आहे. ते शिवसेनेत नसले तरी निलेश त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांची वाटचाल नेहमी बाळासाहेबांच्या विचारांवरच सुरू असते. संघर्षातून, कष्टातून पुढे आलेलं ते राजकीय नेतृत्व आहे. राजकारणातल्या नव्या पिढीला निश्चितच त्यांची कारकीर्द मार्गदर्शन करणारी आहे. मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -