- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लाडके खासदार नारायणराव राणे आणि कोकण यांचे एक अतूट आणि भक्कम असे नाते आहे. कोकणच्या लाल मातीवर निर्मळ, निस्सिम प्रेम करणारे आणि कोकणासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटून काम करणारे नेतृत्व म्हणून नारायणराव राणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
नारायणराव राणे यांनी त्यांच्या सार्वजनिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षांपासून केली. सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, कार्यकर्त्यांचे अपार प्रेम, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि त्याचबरोबर कोकणसह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची क्षमता, सतत अभ्यास करण्याची वृत्ती आणि त्याचबरोबर प्रशासनावर असलेली मजबूत पकड या गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर नारायण राणे यांनी केवळ सिंधुदुर्ग आणि कोकण साठीच काम केले असे नाही तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच स्वतःचे कार्यक्षेत्र बनवले. प्रचंड संघर्ष करत राजकीय आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी स्वतःचे असे स्थान निर्माण केले.
गेली पाच दशके नारायण राणे हे सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. लोकांचे प्रश्न सोडवायचे तर सत्ता हाती असायला हवी कारण सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देता येतो, लोकांचे प्रश्न सोडवता येतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास या खात्याचे सर्वप्रथम कॅबिनेट मंत्री केले होते. त्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री सुधीर जोशी यांचा एक अपघात झाल्यानंतर राज्याचे महसूल खाते देखील नारायण राणे यांच्याकडे आले. पद आणि खाते कोणतेही असो त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याला न्याय देण्याचे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत सत्तेचा लाभ पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नारायण राणे यांनी या माध्यमातून सातत्याने केले आहे. कोणी आरे केले तर त्याला कारे विचारण्याच्या आक्रमक वृत्तीमुळेच शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणे यांना शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात महाराष्ट्राचे सहा महिने मुख्यमंत्री केले. नारायण राणे यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कोकणातील एका कार्यकर्त्याला शिवसैनिकाला शिवसेनाप्रमुखांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर खऱ्या अर्थाने नारायण राणे यांनी महाराष्ट्राचा कारभार कसा चालू शकतो याचा प्रत्यय त्यावेळी सर्वांना दाखवून दिला.
मुख्यमंत्रीपदानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदही नारायण राणे यांच्याकडे होते. त्या काळात देखील महाराष्ट्राचे आणि कोकणाचे विविध प्रश्न, समस्या सातत्याने अत्यंत आक्रमकपणे आणि अभ्यासूवृत्तीने विधानसभेत मांडून सरकारचे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम त्यावेळी नारायणराव राणे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून अत्यंत सक्षमपणे केले. नारायण राणे यांचा राज्याच्या राजकारणात उदय होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात कोकणचा तसा फारसा प्रभाव जाणवत नसे. मधू दंडवते आणि सुरेश प्रभू हे जर दोन केंद्रातले मंत्री सोडले तर कोकणच्या वाट्याला मंत्रीपदे ही फारशी येत नसत. मात्र नारायण राणे यांच्या राजकीय उदयानंतर महाराष्ट्राचा कोकणकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला. महाराष्ट्राचा विचार करताना आता तर कोकणशिवाय महाराष्ट्राचा विचारच केला जात नाही हे खऱ्या अर्थाने नारायण राणे यांच्या संघर्षाचे श्रेय आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणाला केंद्रबिंदू करण्याचे श्रेय देखील नारायण राणे यांच्याकडेच जाते.
नारायणराव राणे यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेली उत्तम पकड हे आहे आणि प्रशासनावर पकड असण्यासाठी अत्यावश्यक असलेला अभ्यास तसेच पाठपुरावा यामध्ये नारायण राणे यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळेच प्रशासनातील कोणताही अधिकारी त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाही आणि त्याचबरोबर जनहिताचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना नाही देखील म्हणू शकत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रावर जेव्हा दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे अस्मानी संकट आले होते त्यावेळी देखील नारायण राणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन कोविड रुग्णालय उभारले. तसेच त्या माध्यमातून कोविड रुग्णांवर तेथेच उपचार देखील सुरू केले आणि त्यावेळी आवश्यक असलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा देखील त्यांनी उपलब्ध करून दिली.
नारायणराव राणे यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा एका मोठ्या नेत्याचा अखंड संघर्षाचा प्रवास आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात त्यांनी आजवर जे काही अविरत कष्ट घेतले. जनतेचे प्रश्न सोडवले आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळेच आज स्वतः नारायणराव राणे हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्क्याने भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्याबरोबरच काही कालावधीनंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे दोन्ही सुपुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विधानसभेवर आमदार म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.
नितेश राणे हे तर आता राज्याच्या मंत्रिमंडळात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री म्हणून सक्रिय आहेत आणि अत्यंत दमदार कामगिरी ते करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे दुसरे चिरंजीव निलेश राणे हे देखील आता शिवसेनेचे आमदार असून ते देखील मतदारसंघातील प्रश्नांना तसेच कोकणातील समस्यांना राज्याच्या विधिमंडळात समर्थपणे मांडत आहेत.
खऱ्या अर्थाने नारायणराव राणे यांच्या सार्वजनिक आयुष्यातील हा काळ म्हणजे एक अमृत काळ आहे. हा एक दुग्धशर्करा योग आहे की, ज्यावेळी त्यांचा एक सुपुत्र राज्यात कॅबिनेट मंत्री आहे. दुसरा सुपुत्र आमदार म्हणून निवडून आलेला आहे आणि ते स्वतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेमध्ये कोकणचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजच्या त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर त्यांना सुयश चिंतित असतानाच त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा आणि त्यानंतर शतक महोत्सवी सोहळा देखील अत्यंत दिमाखदार शैलीमध्ये साजरा व्हावा, अशा शुभेच्छा यानिमित्ताने त्यांना देतो.