नवी दिल्ली : भारत मंडपम येथे झालेल्या तीन दिवसांच्या स्टार्टअप महाकुंभात भारतासह ५० देशांमधील तीन हजारांपेक्षा जास्त स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या. अनेक प्रतिभावान तरुणांनी त्यांच्या नानाविध कल्पनांचे सादरीकरण केले. पण स्टार्टअप महाकुंभात सर्वांचे लक्ष वेधले ते एका पुण्यातून आलेल्या विद्यार्थ्याने. या विद्यार्थ्याने जगातील सर्वात लहान रुग्णवाहिका तयार केली.
पुण्यातून आलेल्या विद्यार्थ्याने जगातील पहिली आणि सर्वात लहान सौरऊर्जेवर चालणारी रुग्णवाहिका तयार केली. या रुग्णवाहिकेची लांबी २.९ मीटर आहे, जी टाटा नॅनोपेक्षा ०.२ मीटर लहान आहे. अतिशय लहान जागेतही ही रुग्णवाहिका सहज जाऊ – येऊ शकते. यामुळे अपघाताच्या ठिकाणी रुग्णांच्या, जखमींच्या मदतीसाठी ही रुग्णवाहिका घेऊन जाणे सोपे आहे. रुग्णवाहिकेत आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकीय सोयीसुविधा या रुग्णवाहिकेतही आहेत. पण आकाराने लहान असल्यामुळे या रुग्णवाहिकेचा दैनंदिन खर्च हा इतर रुग्णवाहिकांच्या तुलनेत कमी आहे.
पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकणाऱ्या सुधांशू पालने ही जगातील पहिली आणि सर्वात लहान सौरऊर्जेवर चालणारी रुग्णवाहिका तयार केली आहे. आतापर्यंत तयार वाहनाचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्याची पद्धत रुढ होती. पण या प्रयोगाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रुग्णवाहिका म्हणून नवे वाहनच तयार केले आहे. अवघड वळणावर वा अरुंद जागेत जाऊन ही रुग्णवाहिका प्रभावीरित्या काम करू शकते.