नोएडा : उत्तर प्रदेशमधील नोएडात ५५ वर्षांच्या नुरुल्लाह हैदरने पत्नी आसमा खान (४२) हिच्या डोक्यात हातोड्याने वार केला. या हल्ल्यात आसमाचा मृत्यू झाला. आसमाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नुरुल्लाह हैदरला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी नोएडाच्या सेक्टर १५ मध्ये घडली.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली ४२ वर्षांची आसमा खान नोएडाच्या सेक्टर ६२ मधील एका खासगी कंपनीत कार्यरत होती. निकाह होण्याआधी आसमा दिल्लीच्या पूर्वेकडील भागात वास्तव्यास होती. जामिया मिलिया इस्लामियामधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर आसामाने करिअर सुरू केले होते. तर अटकेत असलेला आरोपी नुरुल्लाह हैदर बेकार होता. त्याची नोकरी सुटली होती.
नुरुल्लाह हैदर आणि आसमा खान यांचा निकाह २००५ मध्ये झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर मुलगी आठवीत शिकते आहे.
नोकरी सुटल्यामुळे घरात बसलेल्या नुरुल्लाह हैदरला पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय आला होता. या संशयातून नुरुल्लाह हैदर आणि आसमा खान यांचा वारंवार वाद होत होता. घटना घडली त्याच्या आदल्या दिवसापासून याच मुद्यावरुन सुरू असलेला वाद वाढला होता. वाद विकोपाला गेला आणि नुरुल्लाह हैदरने पत्नी आसमा खानच्या डोक्यात हातोड्याने वार केला. या हल्ल्यात आसमाचा मृत्यू झाला. आसमाच्या हत्येनंतर पोलिसांनी नुरुल्लाह हैदरला अटक केली. नुरुल्लाह हैदर अभियांत्रिकीचा पदवीधर आहे, तो मूळचा बिहारचा आहे.
जोपर्यंत नुरुल्लाह हैदर आणि आसमा हे दोघे नोकरी करत होते तोपर्यंत तणाव नव्हता. पण नुरुल्लाह हैदरची नोकरी सुटली आणि काही काळानंतर तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसमाची हत्या झाल्याची जाणीव होताच तिच्या मुलाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी नुरुल्लाह हैदरला अटक केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. नातलगांना नुरुल्लाह हैदरच्या कृत्याने धक्का बसला आहे.