निविदा अंतिम झाल्यानंतर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
रुग्णालयात रुग्णांना बाहेरुन औषधे आणण्याची चिंता मिटणार
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील मोफत औषधांचा पुरवठा करण्यासाठी मागील २०२२ पासून रखडलेली औषध खरेदीचा मार्ग खुला झाला असून याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच या औषधांचे वितरण रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे अखेर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुरा औषध साठा आणि बाहेरुन रुग्णांना आणाव्या लागणाऱ्या औषधांच्या तक्रारींचे निवारण होवून रुग्णांची होणारी गैरसोय दूर होईल.
मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह विशेष आणि उपनगरीय रुग्णालये आणि दवाखाने,आरोग्य केंद्र आणि प्रसुतीगृहांमधील रुग्णांना महापालिकेच्या अनुसुचीवर औषधे मोफत पुरवठा करण्यात येत असतात. परंतु मागील २०२२मध्ये औषधांच्या पुरवठ्याचे कंत्राट रद्द झाल्यानंतर याची प्रक्रिया रखडली होती. त्यातच झिरो प्रिक्रिप्शनच्या नावावर अनुसूची सुधारीत करून सर्व प्रकारच्या औषधांची सुधारीत यादी करण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचीवरील सुधारीत यादीनुसार सुमारे २ हजार कोटींची औषधांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती. परंतु याला यश न आल्याने महापालिकेने आता १२ अनूसूचीवर जुन्याच यादीनुसार आवश्यकतेनुसार औषधांची खरेदी करण्यासाठी निविदा मागवली होती. त्यानुसार सुमारे १५० ते २०० कोटी रुपयांच्या औषध खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असून पात्र कंपन्यांची निवडही करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे पात्र कंपन्यांची निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे लवकरच याबाबतचा प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासकांच्या मंजुरीनंतर या औषधांच्या खरेदीची कार्यादेश जारी केले जातील. त्यानुसार याऔषधांचे वितरण सर्व रुग्णालयांमध्ये केले जाईल आणि यामाध्यमातून गरीब रुग्णांना या मोफत औषधांचा लाभ मिळणार आहे. मागील २०२२ पासून औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याने प्रत्येक रुग्णालयांकडून आवश्यकतेनुसार औषध वितरकांकडून औषधांची खरेदी केली जात होती. परंतु यासर्वांचे पैसे मंजूर न झाल्याने यासर्व वितरकांनी संप करून यापुढे औषधांचे वितरण न करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर स्वत: आयुक्तांनी यामध्ये पुढाकार घेत वितरकांच्या औषधांची बिले प्राधान्याने काढण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार वितरकांच्या देयकांचे पैसे अदा केल्यानंतर त्यांनी पुढील औषधांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली होती.