मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत, शरद पवारांना (Sharad Pawar) चिमटा काढला.
अजित पवारांनी “काकांच्या आशीर्वादाने आमचं सगळं चांगलं चाललंय,” असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत. पण लक्षात ठेवा, अजित पवारांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतेच मर्यादित ठेवलं आहे!” या शब्दांत त्यांनी शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
याशिवाय, वक्फ सुधारणा विधेयकावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. “हे विधेयक संसदेत मांडण्यात आले असून ते निश्चितपणे पास होणार. तसेच वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. हे विधेयक समाज किंवा धर्माच्या आस्थांविरोधात नाही. सद्सद् विवेकबुद्धी असणारे लोक त्याला पाठिंबा देतील. मात्र, विरोधक फक्त मतांच्या तुष्टीकरणासाठी त्याला विरोध करत आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.