इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अजून सहा-सात महिने बाकी आहेत, पण आतापासूनच भाजपा आणि जनता दल (युनायटेड)प्रणीत एनडीए विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस पक्षांनी दंड थोपटायला सुरुवात केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि नितीश कुमार यांची जनता दल (यु) यांची युती टिकेल का, इथपासून पुन्हा एनडीएला सत्ता मिळाली तर बिहारचे मुख्यमंत्रीपद भाजपा नितीश कुमार यांना देईल का, अशा चर्चांना उधाण आले आहे. सध्याच्या वातावरणात आणि निवडणूक लढविण्यासाठी भाजपाला नितीश कुमार यांची गरज आहे आणि नितीश कुमार यांनाही भाजपाच आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवेल अशी आशा वाटत आहे. भाजपाने पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यावर जंगल राज, गुंडा राज असे जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार हे राज्याचे गेली वीस वर्षे मुख्यमंत्री असून भाजपा व लोक जनशक्ती पार्टी त्यांचे समर्थन करीत आहे. निवडणुकीच्या अगोदर शतप्रतिशत भाषा बोलणाऱ्या भाजपाला बिहारच्या राजकारणात पुन्हा नितीश कुमार यांचाच चेहरा पुढे करावा लागतो आहे. सन २०२० मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत खरे तर भाजपाने बाजी मारली होती. २४३ जागांच्या विधानसभेत भाजपाने ११० जागा लढवल्या आणि ७४ आमदार निवडून आले. जनता दल (यु) पक्षाने ११५ जागा लढवल्या व या पक्षाचे केवळ ४३ आमदार निवडून आले. महाराष्ट्राप्रमाणे तेव्हासुद्धा भाजपाला पाटण्याच्या सिंहासनावर मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकता आला असता, पण भाजपाने उदारमनाने कमी आमदार असलेल्या मित्रपक्षाचे नेते नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. या घटनेला आता पाच वर्षे उलटली आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक आमदार विजयी झाले, तर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्या झोळीत टाकेल का? विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांना महाराष्ट्राप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासारखी भूमिका बजावावी लागेल का, असे तर्क आतापासूनच लढवले जात आहेत.
गेल्या वेळेप्रमाणेच बिहारच्या निवडणुकीत एकमेकांचे राजकीय शत्रू तेच आहेत. एका बाजूला भाजपा, जनता दल यु, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती आणि जीतन राम मांझी यांचा हम आणि समोर राष्ट्रीय जनता दल,काँग्रेस आणि महाआघाडीतील छोटे पक्ष असणार आहेत. जातीपातीची व्होट बँक आणि जागा वाटप हा दोन्ही बाजूला कळीचा मुद्दा आहे. राजद आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाची खेचाखेची ही मोठी कसोटी आहे. २०२०ची विधानसभा आणि २०२४ ची लोकसभा, या दोन्ही निवडणुकीत बिहारमधील मतदारांनी भाजपा-जनता दल (यु) ला मोठे झुकते माप दिले. लोकसभा निवडणुकीत, तर ४० पैकी तीसपेक्षा जास्त जागांवर एनडीएचे खासदार निवडून आले. नंतर झालेल्या पोटनिवडणुकांतही महाआघाडीत मतभेद आणि खदखद बघायला मिळाली. राजीव रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना पूर्णिमा मतदारसंघाची जागा सोडायला लालू यादव यांनी साफ नकार दिला. पण प्रतिकूल वातावरण असतानाही पप्पू यादव या मतदारसंघातून निवडून आले व त्यांनी लालूंनाच धडा शिकवला. काँग्रेस व राजदमध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयु) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्यावरून वादंग चालूच आहे. ते भाजपा विरोधी आहेत हे सर्वश्रुत आहे. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाची (भाकप) विद्यार्थी शाखा असलेल्या एआयएएसएफमधून भाकपमध्ये सक्रिय झाले व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाकपचे उमेदवार म्हणून बेगुलसरायमधून लढले, पण ते पराभूत झाले. २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाने त्यांना बिहारमधून उमेदवारी देण्याचे ठरवले होते, पण लालू यादव यांनी कन्हैयाकुमार यांच्या उमेदवारीला विरोध केला त्यामुळे काँग्रेसने त्यांना उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांचा तेथेही पराभव झाला. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत कन्हैयाकुमार यांनी काँग्रेससाठी भरपूर प्रचार केला, पण ७० जागांच्या विधानसभेत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसला ना राहुल गांधींचा उपयोग झाला, ना कन्हैयाकुमार यांचा.… आता काँग्रेस पक्षाने या अपयशी कन्हैयाकुमार यांना बिहार विधानसभेत सक्रिय करण्याचे ठरवले आहे. एनएसयूआयच्या वतीने बिहारमध्ये चालू असलेल्या पलायन रोको, नौकरी दो या अभियानात कन्हैयाकुमार सध्या सक्रिय दिसत आहेत. काँग्रेसने बिहार प्रदेश काँग्रेसची जबाबदारी दलित आमदार राजेश कुमार यांच्यावर सोपवली आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेला आपला पुत्र तेजस्वी यादव याला कोणी आव्हान देऊ शकेल, असा दुसरा नेता महाआघाडीत अन्य कोणत्याही मित्रपक्षात असता कामा नये, अशी दक्षता लालू यादव घेताना दिसत आहेत. बिहारमध्ये सवर्ण किंवा उच्चवर्णीय मतदारांची संख्या नगण्य आहे. म्हणूनच दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्य म्हणजेच मुस्लीम व्होट बँकेवर सर्वच राजकीय पक्षांची मदार असते. मुस्लीम मतदार हे भाजपाच्या विरोधात आहेत असे मानले जाते तरीही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची काही मते भाजपाला मिळाली आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नितीश कुमार मागास जातीतून आले आहेत. ते दोन दशकांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदावर आहेत पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. प्रचंड विरोध असूनही त्यांनी राज्यात दारूबंदी जारी केली. महिलांचा फार मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. नितीश कुमार यांच्या पाठीशी महिलांची व्होट बँक भक्कमपणे उभी आहे. रस्ते, वीज अशा विकासकामांत केंद्राचा निधी मोठा मिळाला आहे. पण शिक्षण, उद्योग, गुंतवणूक व रोजगार यात बिहार खूपच मागासलेला आहे. बिमारू राज्यात बिहारचा कायम नंबर आघाडीवर आहे. रोजगारासाठी अन्य राज्यांत वर्षानुवर्षे होत असलेले तरुणांचे पलायन नितीश कुमार थांबवू शकलेले नाहीत हे त्याचे मोठे अपयश आहे. महाआघाडीतील मतभेद व असंतोषाचा पुरेपूर लाभ उठविण्याचे भाजपाने ठरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच झालेल्या बिहार दौऱ्यात येत्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचे कप्तान नितीश कुमार हेच असतील असे पक्षाच्या बैठकीत जाहीर करून टाकले. भाजपा जे ठरवेल तोच एनडीएचा निर्णय असतो त्यामुळे चिराग पासवान किवा जीतन राम मांझी यांच्या मताला काडीमात्र किंमत नसते. बिहारमध्ये २४३ पैकी २२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने ठरवले आहे. जी रणनिती भाजपाने महाराष्ट्रात राबवली तशीच आता बिहारमध्ये राबवली जात आहे. बिहारचे प्रभारी विनोद तावडे, बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व विजय सिन्हा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल तसेच पक्षाचे आमदार, खासदार यांच्या बैठकीत अमित शहा यांनी नितीश कुमार हे निवडणूक काळात एनडीएचे कप्तान राहतील असे जाहीर केले. त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत बिहारमध्ये एनडीएचे नंबर १ नेते नितीश कुमार असतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बिहारमधील दौरे वाढले आहेत. प्रत्येक भेटीत पक्ष संघटनेला ऊर्जा देत आहेत. प्रत्येक दौऱ्यात ते राजदवर टीकेची झोड उठवताना लालू प्रसाद यादव यांनाच टार्गेट करीत आहेत. अमित शहा यांची नुकतीच गोपालगंज येथे जंगी सभा झाली. ते म्हणाले – लालू को लाज नहीं, गाय का चारा खा गए, सिर्फ अपने परिवार को सेट किया, बिहार को तय करना हैं कि लालू – राबडी के जंगलराज की ओर जाना हैं या मोदी – नितीश के विकास की राह पर जाना हैं… अगर हमारी फिर से सरकार बनती है तो हम बिहार को बाढ से मुक्त करा देंगे, बंद चिनी मिलों को फिर शुरू करेंगे…!