अरुण बेतकेकर
भारतात मुघल राज्याची मुहूर्तमेढ बाबराने रोवली. बाबराचा जन्म १४८३ साली फरगाना खोऱ्यातील (आताचे उझबेकिस्तान) अंदिजान येथे झाला. इ. स. १४९४ मध्ये १२ वर्षांचा असताना बाबर गादीवर बसला. राज्याच्या विस्ताराच्या लढाईत १५०१ मध्ये त्यास पराभवाचा सामना करावा लागला. देशातून परागंदा व्हावे लागले. अशा या बाबराने १५२६ ते १५३० या काळात भारतावर राज्य केले. त्याच्याच पिढीतील ‘औरंगजेब’ हा सहावा मुघल. १६५८ ते १७०७ या काळात तो भारताचा मुघल बादशाह होता. औरंगजेबाचा कालावधी म्हणजे रक्तरंजित, क्रौर्याची परिसीमा, स्वकीयांची हत्या, हिंदुद्वेष व हिंदू धर्म नेस्तनाबूत करण्याची मनोवृत्ती, मंदिरे विध्वंस केली, मूर्ती भंग केल्या, हिंदूंना बाटवले. त्यासाठी लाखो हिंदूंचे शिरच्छेद केले, बायका – पोरी पळवल्या.
शाहजहाँ यांना चार मुले. त्यातील औरंगजेब हा तिसरा आणि तीन मुली असे एकूण सात दाम्पत्य. सिंहासनावर आरूढ होण्यासाठी औरंग्याने स्वतःच्या बापास नजरकैदेत ठेवले. त्याचे खाण्या-पिण्याचे हाल हाल केले. त्यास दिवसातून एक कटोरा पाणी पिण्यास दिले जाई. शाहजहाँ यांनी उन्हाळाच्या गर्मीत अधिक पाण्याची मागणी केली असता औरंग्याने ते अमान्य केले. त्वेषाने शाहजहाँने लिहून ठेवले आहे. ‘तू अजिब मुसलमान पैदा हुवा जो अपने जिंदा बाप को पानी के लिए तडपा रहा है. तुझसे भली तो वो कौम (म्हणजेच हिंदू) है जिस कौमपर हम राज कर रहे है, उसे ना हम समज सके ना तुम. यहाँ रहनेवाले जो है वो पितृपक्ष मे अपने मरे हुई बाप – परदादा के मुहमें पानी देते है. उनसे तुमने कुछ अच्छा नही लिया”
‘दाराशिकोह’ हा शाहजहाँचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा आवडताही. हाच माझा उत्तराधिकारी असे शाहजहाँने दरबारात जाहीर केले होते. दारा औरंग्याप्रमाणे इस्लाम धर्मवेडा नव्हता. तो हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन याही धर्माचा अभ्यास करून त्या त्या धर्माचे उपासक आपल्या दरबारात बाळगून असायचा. त्याने हिंदू धर्मग्रंथांचे उर्दू-अरबीमध्ये भाषांतर करून प्रसारित केले. यामुळे औरंग्या, दाराला काफिर म्हणत असे. दुसऱ्या मुलाचे नाव ‘शाहशुजा’. तो खूप शूर, विवेकी व दृढनिश्चयी असा त्याचा लौकिक होता. त्यानंतर औरंगजेब व धाकटा ‘मुरादबक्ष’. राजतख्तासाठी दारा व औरंग्या यांच्यात तुंबळ लढाई झाली असता दारा पराभूत झाला. त्यास औरंग्याने कैदेत टाकले. या गृहकलहात मुरादबक्ष औरंग्याच्या बाजूने लढला. जख्मी अवस्थेत असताना औरंग्याने त्यास पुढील प्रतिस्पर्धी मानून काही दिवसांनी त्याचा तशा अवस्थेतच काटा काढला. तर दुसरा भाऊ शाहशुजा बंगालच्या युद्धामध्ये औरंग्यानेच सुपारी दिलेल्या मिर्झाराजा जयसिंग यांच्याकडून पराभूत झाला. त्याने तेथून पळ काढला तो ब्रह्मदेश दिशेने (आताचे म्यानमार) त्यानंतर त्याचा थांगपत्ता कधीच लागला नाही. दाराशिकोह हा शाहजहाँप्रमाणेच औरंग्याच्या कैदेत होता. शाहजहाँ यास आपला लाडका पुत्र दारा यास भेटण्याची इच्छा होई. परत परत ही इच्छा त्याने औरंग्यास सांगितली. त्यास औरंग्याने एकदा होकार दिला. पिता भेटण्यास उत्सुक असता एका सजवलेला नजराणा झाकलेल्या स्थितीत पित्यासमोर पेश केला गेला. त्याने तो उघडला असता त्यात दारा शिकोहचे छाटलेले शीर होते. शाहजहाँचा अंतिम समय औरंग्याच्या कैदेतच गेला. त्याचे खाण्या-पिण्याचे हाल होत राहिले. अशातच तो आजारी राहून औरंग्याचा कैदी म्हणूनच मरण पावला. औरंग्या हा निव्वळ नराधम.
एप्रिल १६८० छत्रपती शिवाजी महाराजांचा देहवास झाला. औरंग्यास वाटले आता मराठा मुलुख आपणासाठी मोकळे झाले. महाराजांच्या कारकिर्दीत कधीही न उतरलेला पण आपल्या सेनापतींना वारंवार महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविणाऱ्या औरंग्याने सप्टेंबर, १६८१ रोजी स्वयं महाराष्ट्राची मोहीम हाती घेतली.अनपेक्षितपणे त्यास प्रचंड प्रतिकारास सामोरे जावे लागले. येथे त्यास सामोरे जाण्यास छत्रपती संभाजी महाराज सह्याद्री समान उभे ठाकले, त्यास सळो की पळो केले, त्याची झोप उडवली, त्याचे जगणे हराम केले. पण फंदफितुरीने संभाजीराजे त्यांच्या हाती लागले. त्यांचा अतोनात हाल करत अंत केला गेला. तो केवळ त्यांचा शत्रू म्हणून नव्हे, मराठा म्हणून नव्हे तर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारणे अमान्य केले म्हणून. त्याऐवजी संभाजी महाराजांनी मृत्यू स्वीकारला. कालांतराने संताजी – धनाजी सारखे शूरवीर उभे राहिले. अशाने औरंग्यास मराठा मुलुख कधीच जिंकता आला नाही. लाजेखातर माघारी दिल्लीही जाता आले नाही आणि याच मराठा मातीत तो गाडला गेला. दुर्दैवाने, औरंगाबाद (आजचे संभाजीनगर) येथील खुलताबाद येथे त्याची कबर आजही अस्तित्वात आहे. वास्तविक अशा या औरंग्याचे नामोनिशाण जगाच्या पाठीवरून नाहीसे होणे हेच उचित! तसे ते आहे म्हणूनच औरंग्याचे भूत महाराष्ट्राच्या बोडक्यावर येऊन बसले. त्याच्या समर्थनार्थ अनेक जण उभे राहिले हे समजण्यासारखे आहे. ‘पण औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहू द्या’ म्हणत त्याच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे सेना रिंगणात उतरली हे अनाकलनीय. उबाठास वाटते ती कबर महाराष्ट्रासाठी गौरवशाली आहे. तशी ती किती गौरवशाली आहे हे महत्त्वाचे नाही, परंतु मुसलमानांसाठी ती आहे एवढे निश्चित. याची प्रचिती निव्वळ कबर नामशेष होणार ह्या अफवेतून नागपूर हिंसाचारातून दिसून आली. भले मग उबाठाद्वारे त्यास कोणतेही विचित्र, विक्षिप्त तर्क – वितर्क दिले गेले तरी.
अक्रांता, क्रूर, नराधम, हिंदूधर्म नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधणाऱ्या औरंग्याच्या काळात त्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. तसे ते क्रौर्य कालानुरूप होते. कायदे, नियम अस्तित्वात असलेल्या आजच्या सुसंकृत युगातही अशा प्रवृत्ती समाजात वावरत असतात. कालानुरूप केवळ त्याचे स्वरूप बदलले. मी ठाकरे कुटुंबाचा निकटवर्तीय व त्यांच्या प्रत्येक हालचालींवर कटाक्ष ठेवणारा, त्यामुळे आत्मचिंतन करता, औरंग्या – उद्धव यात काही बाबतीत साम्य जाणवले. ‘औरंग्याची कबर’ या संपूर्ण घडामोडीतील उद्धव ठाकरे यांची भूमिका आश्चर्यचकित करणारी पण औरंग्याप्रती सहानुभूतीपूर्वक भासते.
बाळासाहेब ठाकरे यांना तीन दांपत्य, तीनही मुले. बिंदामाधव, जयदेव आणि उद्धव. औरंग्याप्रमाणेच उद्धवही तिसरे दाम्पत्य. ठाकरे कुटुंब राजकीयदृष्ट्या बलाढ्य मानले जाते. त्यांचे वारसदार होण्यास गृहकलह माजलाच. बाळासाहेबांच्या हयातीत बिंदा व जयदेव यांनी आपापले व्यवसाय सुरू केले होते. मात्र उद्धव बाळासाहेबांबरोबर केवळ राजकारणात गुंतून राहिला. याचा अर्थ दोन मोठे भाऊ राजकारणात इच्छुक नव्हते असे नव्हे. बरीच वर्षे राजकारणात राहिल्याने उद्धव यांनी शिवसेनेवर मगरमिठी घेतली होती. त्यांनी पुढील अनर्थांच्या शक्यतेचा विचार करत आपले भविष्यातील स्थान बळकट करण्याच्या उद्देशाने सर्वत्र आपले विश्वासू, खुशमस्करे, भाट, चाटू पेरून ठेवले. बाळासाहेबांच्या उतरत्या व उद्धवजींच्या उगवत्या काळात बाळासाहेबांशी फंदफितुरी, कटकारस्थान, बेईमानी करण्यास सज्ज असणाऱ्यास आपल्या अस्तिनेत पाळले. त्यामुळे निर्णायक वेळी प्रतिकार, उठाव असा झालाच नाही. सत्तेचे हस्तांतरण सहजी साध्य झाले. कुटुंबात यावरून प्रचंड वाद निर्माण झाले. प्रकरण काही वेळा हाताबाहेरही गेले. बाळासाहेबांच्या संपत्तीचीही सामोपचाराने विभागणी झाली नाही. राजसत्तेबरोबरच संपत्तीही एकट्या उद्धवजींनी हडपली. बाळासाहेबांचे मृत्यूपत्रही संशयाच्या भोवऱ्यात अडकले. यास त्यांचे बंधू जयदेव यांनी आव्हान देत कोर्टाची पायरी चढली. संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली. निव्वळ स्वतःच्या कुटुंबासह उद्धव औरंगजेब ठरले.
शिवसेनेत बाळासाहेबांचे निर्णय घेण्याचे अधिकारही उद्धवजींनी हिरावून घेतले. त्यांना संपूर्णतः शक्तिहीन करण्यात आले. त्यांना एकाकी पाडण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते एवढेच नव्हे तर नाते, हितचिंतक व जनतेशी त्यांचे संपर्क संपुष्टात आणले गेले. त्यांच्या खाण्या-पिण्यावरही अंकुश आणले गेले, यावर कुटुंबातूनच प्रश्न उपस्थित केले गेले. थोडक्यात काय तर शाहजहाँप्रमाणेच बाळासाहेबांना आपल्या अंतिम काळात त्यांच्याच निवासस्थानी मातोश्री येथे नजरकैदेत ठेवले गेले. बाळासाहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणे सहज शक्य होते. पण ठाकरे निवडणूक लढणार नाहीत, सत्तेत जाणार नाहीत तर रिमोटने सत्तेवर नियंत्रण ठेवेल असा त्यांचा दृढनिश्चय होता. शिवसेनेची निश्चित ध्येयधोरणे तसेच हिंदुत्वाशी ते कायम इमानदार राहिले, त्यात कोणतीही तडजोड केली नाही. कोणाचीही फसवणूक केली नाही. कुणाचाही मुलाहिजा राखला नाही. सत्तेसाठी औरंग्याप्रमाणेच उद्धवजींनीही स्वकियांशी गद्दारी केली. शिवसेना संपूर्णतः स्वयंकेंद्रित केली. कर्तृत्ववान, तुल्यबळ व प्रतिस्पर्धी तसेच बाळासाहेबांशी एकनिष्ठ अशांचा अत्यंत निर्दयीपणे – क्रूरपणे काटा काढला. त्यांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न झाले. बाळासाहेबांनी मांडून दिलेल्या चौकटी पलीकडे जाऊन असंगताशी संगत केली. त्यांच्या विचारसरणीला मूठमाती देत अंतिमतः औरंग्याप्रमाणेच सत्तास्थानी ते आरूढ झाले.
औरंग्याने पित्यासह आपल्या भावांचीही हत्या केली. असे करणे आजच्या युगात शक्य आहे का? बिंदामाधव व जयदेव यांच्या हाती काय लागले? बाळासाहेबांची राजकीय विरासत व संपत्ती एकट्या उद्धवने हडपली. भावांना व नात्यागोत्यांना खाईत लोटले. मातोश्रीतून त्यांना परागंदा केले गेले. त्यांचे नाव तरी आज कुणाच्या कानी पडते का? म्हणजेच काय तर औरंग्याने जसे आपल्या स्वकीयांवर मरण आणले तसे यासमयी यांच्या नशिबी मरण यातना आल्या.इस्लाममध्ये ‘कर्मा’ यास स्थान नाही. ऐवजी त्यांच्यात ‘किफारा’ म्हटले जाते. याचा अर्थ तुम्ही जे कराल तेच तुमच्यावर उलटते. औरंगजेबास आपल्या किफाराची इतकी भीती असे की त्यास वाटे जे मी केलं तेच माझ्या नशिबी येणार. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या मोहिमेवर आला तत्पूर्वी त्याने आपल्या मुलांना दूरच्या मोहिमेवर धाडले. त्याला भीती होती आपल्या पश्चात आपली मुले दिल्लीतील आपले तख्त बळकावतील आणि माझाही शाहजहाँ होईल. उद्धवही आपल्या तुल्यबळांशी असेच वागतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हेरगिरी करतात. त्यांच्या नाजूक बिंदू हाती राखतात. यातून स्वयं बाळासाहेबही सुटले नाहीत. संपत्तीची लालसा औरंग्याची कमजोर बाजू. त्याने केवळ हिंदूंवर जिझिया कर लादला. त्याचप्रमाणे संपत्तीची लालसा ही उद्धवजींचीही कमजोर बाजू. उमेदवारी, पदे इ. मिळवण्यासाठी इच्छुकांकडून येथे खंडणी घेतली जाते. औरंग्यास टोपी विणण्याचा छंद तर उद्धवजी टोपी घालण्यात माहीर. औरंग्याने मंदिरे लुटली. उद्धवजी महानगरपालिकावर डल्ला मारतात.
बाळासाहेब हे हिंदुहृदयसम्राट. त्यांच्यात दुरान्वयेही वरील एकही दुर्गुण नव्हता. पण असे काय घडले की, त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे यांच्यात हे औरंग्यासमान दुर्गुण आले? यास एकमेव कारण सत्तालोलुपता. सत्तालोलुपता ज्याच्या अंगवळणी पडली त्याचा वैचारिक ऱ्हास होणे निश्चित, नैतिकता गळून पडणे निश्चित आणि मी जे करतो तेच योग्य असा त्याचा समज होणे निश्चित. तो त्यास विनाशाकडे नेतो याचेही भान त्यास राहात नाही हेही निश्चित. औरंग्याने जे जे त्याकाळी केले त्याची पुनरावृत्ती उद्धवजींच्या कर्मातून आज दिसून येत आहे. औरंग्या अवतरल्याचा भास होत आहे. या दोघांमध्ये साम्य पाहिल्यास पुनर्जन्मावर विश्वास होऊ लागतो.
(माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना).