Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखआधुनिक महान हिंदी लेखनाचा उत्तुंग जादूगार

आधुनिक महान हिंदी लेखनाचा उत्तुंग जादूगार

विनोदकुमार शुक्ला यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.ते शब्दांच्या भाषेचे जादूगार म्हणून त्यांचा लौकिक अटळ आहे आणि सर्वघोषित आहे. शुक्ला यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य हे आहे की,त्यांनी आपल्या लेखनात भाषेच्या अभिव्यक्तीचा खेळ केला आहे आणि ते पिढ्यानपिढ्या लेखक म्हणून ओळखले जातात. ते छत्तीसगढ येथील असून सध्या ते ८८ वर्षांचे आहेत. एका कनिष्ट कारकुनापासून सुरुवात करून ते महान लेखक झाले. त्यांची ही विकसित होण्याची प्रक्रिया पाच दशकांपासून उत्क्रांत होत गेली आणि लेखक म्हणून बदलत्या भारताचे प्रतिबिंब त्यांच्या प्रतिभेत दिसत आहे. आपल्या आयुष्याचा संपूर्ण काळ छत्तीसगढमधील रायपूरमध्ये घालवलेल्या शुक्ला यांना जीवनात जे दिसले ते त्यांनी कागदावर उतरवले आणि त्यातून त्यांची प्रतिभा फुलून आली आणि त्यांच्या लेखनाचा विकास झाला. त्यांनी अनेक कविता लिहिल्या तसेच कादंबरी लिहिल्या. त्यांची ‘लगभग जयहिंद’ (१९७१) आणि कादंबरी ‘नौकर की कमीज’ या प्रचंड गाजल्या आणि त्याच्यावर चित्रपट मणी कौल यांनी काढला होता. लहान शहरातील द्रुतगती जीवनाची लय त्यांनी आपल्या लेखनात पकडली आणि त्यामुळे वाचकही त्यांच्याबरोबर जात राहिले. लहान शहरांचा संघर्ष, त्यांचे दैन्य आणि त्यांच्या व्यथा त्यांच्या कादंबरीत तसेच काव्यात आढळतात. त्यामुळे त्यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला, तर २०२३ मध्ये पेन नोबोकोव्ह पुरस्कार देण्यात आला आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जाणे हे कोणत्याही लेखकाचे भाग्य असते. शुक्ला यांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य हे आहे की, त्यांची भाषेशी खेळण्याची शैली आणि त्यावर असलेले प्रभुत्व. ते नित्य आणि अतिंद्रिय भाषेच्या टोकापर्यंत लीलया संचार करतात आणि त्यातच त्यांना त्यांचे लेखनाचे बीज सापडते. त्यांना कवी म्हटले गेले पण ते वास्तवात एक कादंबरीकार आहेत आणि त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य वास्तववादी आहे. शुक्ला यांच्या कादंबरीतील पात्रे अत्यंत साधी आहेत आणि त्यांच्या जीवनातील नाट्य हेच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. कविता लिहिताना त्यांना सांसारिक गोष्टी व्यापतात आणि त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या कादंबरी किंवा कवितांत असते. जेव्हा देश नव्याने ला होता आणि त्यावेळेसच्या परिस्थितीचे विडंबन त्यांच्या लगभग जयहिंद या काव्यात येते. त्या अर्थाने शुक्लाही वाचकांशी जोडले जातात आणि त्यांचे जोडलेस जाणे हेच त्यांच्या लेखनाचे संचित असते. शुक्ला यांचे सारे जीवन राजनांदगाव येथेच व्यतीत झाले आणि ते इंदिरा गांधी विद्यापीठात कृषी विस्तार विषयाचे प्राध्यापक होते. तेथून ते निवृत्त झाले. त्यांच्या लेखनातील सारे आयुष्य म्हणजे सारे जग व्यापून टाकणारे आहे. पुरस्कार मिळाल्यावर शुक्ला यांनी जे मनोगत व्यक्त केले आहे ते हृद्य आहे आणि एका लेखकाने व्यक्त केलेली ही खंत आहे. ते म्हणतात की, मी प्रचंड जीवनात पाहिले आहे पण त्यापैकी फारच थोडे लेखनात उतरवू शकलो. हीच तर महान लेखकाची खंत असते. ती शुक्ला यांनी व्यक्त केली आहे. पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी म्हटले की, पुरस्काराबरोबरच जबाबदारी येते आणि त्या जबाबदारीची जाणीवच मला लेखनाकडे वळवते.

साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेले शुक्ला यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत आणि त्यात आता ज्ञानपीठाचा समावेश झाला आहे, पण आपल्या मातीशी हा लेखक अजून इमान राखून आहे आणि त्याने कधीही प्रतारणा केलेली नाही जी बाब अनेक लेखकांच्या बाबतीत म्हणता येत नाही. त्यांच्या कवितांचे वर्गीकरण आधुनिकतावादी हिंदी कवितेच्या प्रायोगिक प्रयोगवाद किंवा नवीन कविता या परंपरेत केले जाऊ शकते. ते त्यांच्या विरळ, शक्तीशाली पद्यांद्वारे व्याकरण आणि शब्दकोशाच्या मानकांना आव्हान देतात. त्यांच्या लेखनात किंवा कवितांतही हेच आढळते. त्यांनी सहा कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि लेखनशैली जादूई वास्तववाद या शैलीशी जोडलेली आहे. त्यांच्या ‘दीवार मे खिडकी रहती थी’ या प्रसिद्ध कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. शुक्ला हे जर युरोपियन असते, तर त्यांना याहून अधिक सन्मान मिळाले असते आणि प्रसिद्ध लेखकांपैकी एक असते. हा का भारतीय कवयित्री सुमना रॉय यांचा दावा सत्य आहे. ते छत्तीसगढसारख्या एका तुलनेने मागास भागात जन्मलेले असल्याने आणि तेथेच राहिले असल्याने तेथील साऱ्या व्यथा आणि तेथील सारे वास्तव जीवन त्यांच्या लेखनात येतेच. ते प्रसिद्धीपासून दूर राहणारे लेखक आहेत आणि त्यामुळेच महाराष्ट्रात त्यांना कुणी ओळखत नाही ही वस्तुस्थिती आहे. याबाबतीत नरहर कुरुंदकर यांच्या बाबतीत असे म्हटले गेले की, कुरुंदकर जर मुंबईत किंवा पुण्यात जन्मले असते, तर त्यांना कितीतरी जास्त प्रसिद्धी मिळाली असती. पण ते मराठवाड्यासारख्या भागात जन्मले हे त्यांचे दुर्दैव होते. तेच शुक्ला यांच्या बाबतीतही खरे म्हणता येईल शुक्ला यांचा लेखक म्हणून सरकारने सन्मान केला आहे आणि ८८ व्या वर्षी त्यांचा यथायोग्य सन्मान केला आहे.हे उचित झाले. कारण माणूस गेल्यावर त्याचा उचित सन्मान करणे ही आपली परंपरा आहे. त्याला शुक्ला यानी छेद दिला ही समाधानाची बाब आहे. लेखन ही जबाबदारी आहे हे शुक्ला मानतात आणि त्यांचे हे मानणे हेच त्यांच्या लेखक असण्याचे महान पावित्र्य आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद अमेरिकेत झाले आहेत आणि त्याबाबतीत ते अनुवादकाशी संवाद ठेवतात. खेड्यासारख्या कठोर वातावरणात राहून साहित्य जपणारा लेखक म्हणून शुक्ला हे कायम लक्षात राहतील आणि त्यांच्या कांदबऱ्या खेड्यातील जीवनाचा सुगंध पसरवत राहतील, अशी आशा वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -